जोशी रेल्वे संग्रहालय
जोशी रेल्वे संगहालय (जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज) हे कोथरूड, पुणे येथे असलेले आगगाड्यांच्या छोट्या प्रतिकृतींचे एक संग्रहालय आहे. बी.एस. ऊर्फ भाऊ जोशी यांनी १९९८ मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली. त्यांनीच स्थापन केलेल्या सौदामिनी इंस्ट्रुमेंटस या कारखान्याकडून हे संग्रहालय चालवले जाते.
पार्श्वभूमी
बी.एस. ऊर्फ भाऊ जोशी यांना लहानपणापासूनच आगगाड्यांची मॉडेल्स गोळा करण्याचा छंद होता. लहानपणी दिवाळीत केल्या जाणाऱ्या किल्ल्यांमध्ये ते आग विझवणारे इंजिन, रस्त्यावर पळणाऱ्या गाड्या अशी अनेक हलणारी मॉडेल्स बनवत.हे किल्ले बघण्यासाठी रांगा लागत. [१]१९८० मध्ये त्यांनी गावागावात सर्कसप्रमाणे घेऊन जाता येईल अशी शहराची लहान प्रतिकृती बनवण्याचे काम सुरू केले. ही प्रतिकृती १९८२ मध्ये पहिल्यांदा गोखले हॉल, पुणे येथे प्रदर्शित करण्यात आली. १९८४ मध्ये ती मुंबईत प्रदर्शित करण्यात आली. आणि १९८६ मध्ये दस्तूर हायस्कूल, पुणे येथे प्रदर्शित करण्यात आली. अशा हलवता येणाऱ्या प्रतिकृतीसाठी पुष्कळ मनुष्यबळ लागत होते आणि खूप खर्च होत होता. तसेच प्रदर्शनासाठी परवानग्या मिळवणेसुद्धा कटकटीचे होत असे.
संग्रहालयाची स्थापना
त्यामुळे त्यांनी आगगाड्यांच्या छोट्या प्रतिकृतींचे एक कायमस्वरूपी संगहालय तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ले-आऊटमध्ये आवश्यक ते बदल केले. हा ले-आऊट आता सारखा तोडण्याची आणि पुन्हा जोडण्याची गरज नसल्याने त्यात अनेक तपशील आणता आले. या संग्रहालयासाठी १९९१ मध्ये एक सभागृह बांधण्यात आले. १ एप्रिल १९९८ रोजी हे संगहालय लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले.
संग्रहालय
जरी याचे नाव रेल्वे संगहालय असले तरी येथे केवळ आगगाड्यांच्या छोट्या प्रतिकृती मांडलेल्या नसून येथे एक हलणारे शहरच तयार करण्यात आलेले आहे, त्यात आगगाड्यांच्या प्रतिकृती असून त्या रुळांवरून चालवल्या जातात आणि त्याचा एक कार्यक्रम (शो) येथे पाहता येतो. कंट्रोल पॅनेलमधून सुमारे १००० वायरी बाहेर येतात, त्यांची लांबी ५ किमी आहे. या प्रतिकृतीमध्ये ६५ सिग्नल, कुंपणे, दिव्याचे खांब, घाट, रस्त्यावरील पूल, पोहण्याचा तलाव, सर्कशीचा तंबू, रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू हाताने रासायनिक इचिंग तंत्राचा वापर करून बनवण्यात आलेल्या आहेत. तसेच यामध्ये वाफेवर चालणारे इंजिन, डिझेलवर चालणारे इंजिन, उच्च वेग असलेली इंटर सिटी एक्स्प्रेस, ट्रॉली बस, रोप रेल्वे, फनीक्युलर रेल्वे, वुपरटल हॅंगिंग रेल्वे यांचा समावेश आहे. प्रकाश आणि ध्वनी तंत्राचा वापरसुद्धा केलेला आहे. वेगवेगळ्या २००० मानवी प्रतिकृती यात आहेत.[२]
गौरव
या संग्रहालयाचा समावेश लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आलेला आहे.[३]
अधिकृत संकेतस्थळ
संदर्भ
- ^ "ब्रॅण्ड पुणे : रेल्वेचा इतिहास उलगडणारे 'जोशी रेल्वे संग्रहालय'". Loksatta. 2020-01-04 रोजी पाहिले.
- ^ "Railway Museum in Pune-Joshi's Museum-Home". Joshi's Museum (इंग्रजी भाषेत). 2020-01-04 रोजी पाहिले.
- ^ Dec 26, Avijit Chatterjee | TNN |; 2017; Ist, 17:30. "Kothrud museum with miniature rail world chugs along | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-01-04 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)