जोन्सटाउन (गयाना)
जोन्सटाउन ही गयानामधील वसाहत होती. अमेरिकेतील पीपल्स टेंपल या धार्मिक संघटनेने जंगलात ही जागा घेउन तेथे सार्वजनिक घरे व इतर सुविधा निर्माण केल्या. जिम जोन्स या धर्मगुरूने मुख्यत्वे अमेरिकेतील लोकांना तेथे स्थलांतर करण्यास उद्युक्त केले. १८ नोव्हेंबर, इ.स. १९७८ रोजी जोन्सने आपल्या सगळ्या अनुयायांना सायनाइडयुक्त पेय पिण्यास भाग पाडून आत्महत्या करायला लावली. तेथे ९००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या. त्याच दिवशी पीपल्स टेंपलच्या अनुयायांनी इतर ठिकाणी अनेक लोकांची हत्या केली. हत्या झालेल्यांत अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी लिओ रायनचाही समावेश होता.
पीपल्स टेंपलचे अनुयायी १९७४ साली गयानाला आपल्या नवीन वसाहतीसाठी जागा शोधण्यास गेले. गयानाच्या अधिकाऱ्यांसह जागा नक्की केल्यावर तेथील ३,८०० एकर (१५.४ वर्गकिमी) जमीन भाडेपट्ट्यावर घेण्याचा करार केला. [१] गयानाची राजधानी जॉर्जटाउनपासून २४० किमी पश्चिमेस जंगलात असलेली ही जागा मुख्यत्वे नापीक होती.[२] येथे पिण्याचे पाणी ११ किमी अंतरावर होते.[२] ही जागा घेण्यात जिम जोन्स आणि पीपल्स टेंपलचा फायदा होता कारण इतक्या लांब जंगलात त्यांचा माग काढत येणे इतरांना मुश्किल होते. गयानाच्या सरकारला ही जागा पीपल्स टेंपलला देणे सोयीस्कर होते कारण ही जागा व्हेनेझुएलाच्या सरहद्दीपासून जवळ होती. वादात असलेल्या या सरहद्दीवरून वेनेझुएलाने चढाई करायचे ठरवलेच तर त्यांनी या भागातून येणे टाळले असते कारण असे केले असता जिम जोन्सच्या वसाहतीतील अमेरिकन लोक धोक्यात आली असती. अमेरिकेचा रोष ओढविण्यापेक्षा वेनेझुएलाने इतर ठिकाणाहून चढाई करणे पसंत केले असते.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Timeline: The Life and Death of Jim Jones. PBS.org. Retrieved April 9, 2007.
- ^ a b Reiterman & Jacobs 1982, p. 275
- ^ Seconds From Disaster, "Jonestown Cult Suicide", aired November 5, 2012