Jump to content

जॉनाथन हचिन्सन

सर जॉनाथन हचिन्सन यांचा जन्म सेल्बी (यॉर्कशर, इंग्लंड) येथे २३ जुलै १८२८ रोजी झाला. ब्रिटिश शल्यविशारद, विकारविज्ञान विषयाचे तज्ञ आणि जन्मजात उपदंश रोगाच्या अभ्यासाचे प्रणेते होते.

लंडन इस्पितळ येथे शल्यविशारद (१८५९-८३) आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स येथे फेलो( १८६२ पासून) व प्राध्यापक (१८७९-८३) होते. तेथेे नेत्र व त्वचारोग (विशेषतः कुष्ठरोग) यांचे निष्णात वैद्य झाले. मात्र, त्यांनी आयुष्यभर केलेल्या उपदंशाच्या अभ्यासासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी जन्मजात वा आनुवंशिक उपदंशाच्या निदानासाठी ‘हचिन्सन्स–ट्रायड’ (हचिन्सन–निदानत्रयी) या पद्धतीचा शोध लावला. तिच्यात खोबणदार, अरुंद किनारीचा स्थायी कृंतक दात (हचिन्सन दात ), आंतर-कोशिकीय केराटायसिस (डोळ्यांच्या बाहुलीचा अधिधारणयुक्त दाह) आणि लॅबिरिंथिन रोग (अंतर्कर्णाचा विकार) यांचा समावेश आहे. १९०८ मध्ये त्यांना सर (नाइट) हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

हचिन्सन लंडन पॉलिक्लिनिक अथवा पदव्युत्तर शिक्षण शाळास्थापन करणाऱ्या प्रमुखांपैकी एक होते. परदेशी भाषेतील उत्तम वैद्यकीय ग्रंथांचे भाषांतर करवून घेणाऱ्या न्यू सिडनहॅम सोसायटीच्या संस्थापकां-पैकी देखील ते एक होते. ते डर्मॅटॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेचे सदस्य होते. हचिन्सन आर्चिव्ह्ज ऑफ सर्जरी या त्रैमासिकाचे ते संपादक होते (१८९०-१९००).

हचिन्सन यांचे हेझल्मीर (सरी, इंग्लंड) येथे २६ जून १९१३ रोजी निधन झाले.