Jump to content

जॉन हंटर

अठराव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत सर्जरी याविषयाकडे ‘सावत्रपणे' बघायचे. योग्य शिक्षण घेतलेला डॉक्टर देखील सर्जरीची प्रॅक्टिस शक्यतो करीत नसे. कारण, ते कमीपणाचे समजण्यात येत असे. बहुतांश सर्जरीची प्रॅक्टिस त्या काळी बार्बस-सर्जन्स अथवा हलक्या प्रतीची कामे करणारा नोकर वर्गच करीत असे. जॉन हंटर व बरेच समकालीन सर्जनस्टीफन पॅजेट इ. यांच्या प्रयत्नामुळे, अठराव्या शतकातील मध्यावर सर्जरी या विषयाला मेडिसिनमधील स्वतंत्र प्रभाग अशी मान्यता मिळाली. हे मानाचे स्थान मिळवण्यात जॉन हंटर यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं.

जॉन हंटर यांचा जन्म एका मध्यवर्गीय कुटुंबात,१७२८ मध्ये स्कॉटलंड येथे झाला. जॉन हा दहा बहीण-भावंडांत सर्वात् धाकटा होता. जॉन १३ वर्षांचा असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे अत्यंत हुशारी व चौकस बुद्धी असूनही, त्यांच्या शिक्षणाची हेळसांडच झाली. सुदैवाने त्यांचे मोठे बंधू विल्यम् यांचे लंडनमध्ये चांगले बस्तान बसलेले होते. एक स्टायलिश, सुसंस्कृत व्यक्ती वउत्कृष्ट सर्जन व अ‍ॅनाटॉमिस्ट, अशी ख्याती त्यांनी मिळवली होती. सोबतच ‘स्कूल ऑफ अ‍ॅनाटॉमी' देखील ते चालवत असत.

वयाच्या विसाव्या वर्षी जॉन यांनी विल्यम्स यांच्याबरोबर काम करावयास सुरुवात केली. जॉन यांचे विशेष शिक्षण झालेले नसल्यामुळे विल्यम्स यांना जॉनच्या कर्तृत्वाबद्दल शंकाच होती, म्हणून सुरुवातीला अ‍ॅनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये कामाला ठेवले. थोडक्याच अवकाशात जॉन यांची प्रगती बघून, विल्यम् आश्चर्यचकित झाले. एका वर्षाच्या आतच जॉन हे एक्सपर्ट अनॉटॉमिस्ट बनले. अर्थात हे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. शवविच्छेदनासाठी लागणारया शस्त्रांचा बराच तुटवडा असे. त्यासाठी त्यांनी स्थानिक गुंड व दादा लोकांची मदत घेत, बेकायदेशीर मार्गाने देखील मृत-शरीरे मिळवली. फाशी दिलेले कैदी, खून झालेले बदमाश वशव पेट्यांतून शव पळवून हंटर यांच्या अ‍ॅनाटॉमी इंस्टिट्यूटमध्ये गुप्तपणे आणण्यात येई. काय पण विरोधाभास! या बेकायदेशीर चौर्यकर्मातून चांगली गोष्ट म्हणजे, विज्ञानाची प्रगती होत होती.

जॉन हंटर यांच्या शव-विच्छेदनाच्या अनुभवातून त्यांना सर्जरी या विषयाची गोडी लागली. सुदैवाने डॉ.विल्यम् चेसेल्डन व डॉ. पर्सिव्हल पॉट या दिग्गज सर्जनच्या बरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉ. पॉट यांच्या मार्गदर्शना खाली जॉन हंटर यांना मास्टर ऑफ अ‍ॅनाटॉमी ही पदवी मिळाली व त्यांची सर्जरीची आवड ध्येया मध्ये परिवर्तित झाली. त्यांनी, मानवी शरीरातील लिम्फॅटिक सिस्टिम (लिम्फ- शरीरातील रंगविहीन द्रावण ‘लसिका') वर संशोधन करायला सुरुवात केली.

काही वर्षे, ब्रिटिश आर्मीमध्ये काम केल्या मुळे गन-शॉट वुण्ड्स (बंदुकीच्या गोळ्यामुळे झालेल्या जखमा व युद्धामुळे झालेले अपघात, अपंगत्व व जखमा यांचा भरपूर अनुभव गाठीशी घेऊन परतले व ‘‘युद्धजन्य जखमा, रक्तस्राव व सूज यावर एक मोठा प्रबंध लिहिला. त्यामुळे शरीरातील विविध इन्फ्लेमेटरी (सूज येणारे) रोग ऑस्टिओमायेलायटिस्पेरिटोनायटिस्, फ्लेबायटिस् (व्हेनस् वरील सूज) यांची शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. त्याच सुमारास जॉन हंटरयांनी पशू व मानव यांच्या अ‍ॅनाटॉमीचा तुलनात्मक अभ्यास व प्रातिनिधिक नमुने जमवण्यास सुरुवात केली. त्यांच्या अशा आगळ्या वेगळ्या म्युझियममध्ये साडे-तेरा हजार स्प्रेसिमेन्स (नमुने) होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यातील बरेच महत्त्वाचे नमुने-खराब अथवा गहाळ झाले. तरी बरेचसे नमुने आजही लंडनयेथील कॉलेज ऑफ सर्जन्स येथे बघायला मिळतात.

विविध विषयांत त्यांना रुची असल्यामुळे प्लॅसेंटाची अंतर्गत, अ‍ॅनाटॉमी कोलॅटरल सक्र्युलेशन, रक्तवाहिन्यांच्या अन्युरिझम (फुगा) वरील सर्जरी, एवढंच नव्हे तर आर्टिफिशियल अन्सेमीनेशन: (कृत्रिमरेतन) देखील केले. मानवाच्या दंतपंक्ती यावर देखील त्यांनी प्रबंध लिहिला व दातांचे वर्गीकरण इनसायझर, कॅनाइन, मोलर्स इत्यादी करण्याचे श्रेय देखील त्यांनाच जाते. आपल्या आयुष्यात संशोधकवृत्ती ठेवत, अनेक नवनवीन सिद्धांत व सर्जरीचे जनक असल्यामुळे डॉ.जॉन हंटर यांना अनेक बहुमान प्राप्त झाले. फेलो ऑफद रॉयल सोसायटी, चीफ सर्जन ऑफ सेंट जॉर्ज हॉस्पिटल, रॉयल फॅमिलीचे सर्जन, मेंबरशिप ऑफ अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, सर्जन जनरल ऑफ ब्रिटिश आर्मी व इन्स्पेक्टर जनरल ऑफ हॉस्पिटल्स हे मुख्य बहुमान होत.

त्यांच्या विद्याथ्र्यांमध्ये अत्यंत प्रिय असलेले जॉन हंटर ‘‘साधी राहणी उच्च विचारशक्तीचे भोक्ते होते. त्यांच्या खेळकर व विनोदी स्वभावामुळे खूप लोकप्रिय होते. असा हा अग्रगण्य सर्जन वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयरोगाच्या झटक्यामुळे निधन पावला. सर्जरी या विषयातील विज्ञाननिष्ठ व शास्त्रशुद्ध माहितीच्या योगदाना मुळे ‘‘दि फाऊंडर ऑफ साइंटिफिक सर्जरी हा किताब, ब्रिटिश सरकारने मरणोत्तर प्रदान केला.