जॉन मॅककेन
जॉन सिडनी मॅककेन तिसरा (ऑगस्ट २९, इ.स. १९३६ - ऑगस्ट २५, इ.स. २०१८ ) हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर आहे. तो १९८७ सालापासून सलग सेनेटरपदावर आहे. मॅमकेनने २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले होते परंतु पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्याला जॉर्ज डब्ल्यू. बुशकडून पराभव पत्कारावा लागला. २००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांसाठी मॅककेनला रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळाले पण ह्यावेळी त्याला पराभूत करून बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला.
आरमारी सेवा
मॅककेनने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे अमेरिकन आरमारात सेवा केली. ऍनापोलिसच्या यु.एस. नेव्हल ऍकेडेमीमधून स्नातक झाल्यावर मॅककेन १९५८मध्ये आरमारी लढाऊ वैमानिक म्हणून काम सुरू केले. तेव्हा तो विमानवाहू नौकांवरून जमिनीवर मारा करणारी विमाने उडवत असे. व्हियेतनाम युद्धादरम्यान मॅककेन यु.एस.एस. फॉरेस्टल या विमानवाहू नौकेवर असताना तेथे लागलेल्या आगीत तो मृत्यूपासून थोडक्यात बचावला होता. त्याच वर्षी हनोईवर बॉम्बहल्ला करीत असताना त्याचे विमान उत्तर व्हियेतनामी सैन्याने तोडून पाडले. पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरलेल्या व गंभीर जखमी झालेल्या मॅककेनला युद्धकैदी बनवण्यात आले. १९७३पर्यंत कैदेत खितपत पडलेला असताना त्याची छळ केला गेला. या सगळ्यामुळे त्याला अनेक शारीरिक व्यंगे आहेत. कैदेत असताना कैद्यांच्या अदलाबदलीच्या वेळी मॅककेन अमेरिकन ऍडमिरलचा मुलगा व नातू असल्यामुळे त्याला आधी सोडवण्यासाठी केलेल प्रयत्न त्याने नाकारले व आपल्या क्रमानुसार त्याने अदलाबदल स्वीकारली.