Jump to content

जॉन ग्रिशम

जॉन ग्रिशम
जॉन ग्रिशॅम - २००८
जन्म नाव जॉन रे ग्रिशॅम
जन्मफेब्रुवारी ८, १९५५
जॉन्सबोरो, अर्कान्सास, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्रवकील
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकारकादंबरी
संकेतस्थळजॉन ग्रिशॅम

जॉन रे ग्रिशम ज्युनिअर (८ फेब्रुवारी, १९५५:जोन्सबोरो, आर्कान्सा, अमेरिका[] - ) हे अमेरिकन लेखक, वकील, कार्यकर्ते आहेत.[] ते प्रामुख्याने कायदेविषयक रहस्यमय आणि गुन्हेविषयक कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात. त्यांची पुस्तके जगभरातील अनेक देशांत आणि ४२ भाषांत भाषांतरित झाली आहेत.

मिसिसिपी विद्यापीठातून १९८१ साली कायदेविषयक पदवी मिळवल्यानंतर १९८४ ते १९९० पर्यंत ग्रिशम हे मिसीसीपीच्या कायदेविषयक समितीत कार्यरत होते.

लेखन

‘‘अ टाईम टू किल’‘ ही त्यांची पहिली कादंबरी १९८९ साली प्रकाशित झाली. या कादंबरीवर ते सुमारे ४ वर्षे काम करत होते. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या २० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या एकूण पुस्तकांच्या २८ कोटींहून अधिक आवृत्त्यांची विक्री झाली आहे.

ग्रीशम/ग्रिशम यांचे पहिले यशस्वी पुस्तक म्हणजे १९९१ साली प्रकाशित झाललेली ‘द फर्म’ ही कादंबरी. त्यानंतर या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अनुक्रमे १९९३ आणि २०१२ साली प्रदर्शित झाल्या. ‘द फर्म’ व्यतिरिक्त ‘द चेंबर’, ‘द क्लायंट’, ‘द चेंबर’, ‘द पेलिकन ब्रीफ’, ‘ए पेंटेड हाऊस’, ‘द रेनमेकर’, ‘द रनअवे ज्यूरी’, ‘अ टाईम टू किल’ आणि ‘स्कीपिंग ख्रिसमस’ या पुस्तकांवर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

लेखनाची सुरुवात

१९८४ साली न्यायालयाच्या आवारात फिरत असताना एका धक्कादायक खटल्याने ग्रिशम यांचे लक्ष वेधून घेतले. एक १२ वर्षांची मुलगी तिच्यावर झालेला हल्ला आणि सामूहिक बलात्कार यासंबंधीची साक्ष मांडत असताना ग्रिशम यांनी ती ऐकली. साक्ष ऐकत असताना खुद्द जुरी सदस्यही कसे रडले हे ग्रिशम यांनी पाहिले. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी गुन्हेगारांना स्वतः ठार मारले तर काय होईल या विचारातून ‘‘अ टाईम टू किल’‘ या त्यांच्या पहिल्या कादंबरीचा जन्म तीन वर्षांच्या लिखाणाच्या मेहनतीतून झाला. कादंबरी लिहून झाल्यावर सुरुवातीला २८ प्रकाशकांनी नाकारल्यानंतर ‘विनवूड प्रेस’ या तुलनेने अप्रसिद्ध प्रकाशनगृहाने ५००० प्रती छापण्याची तयारी दर्शवली आणि अखेरीस कादंबरी जून १९८९ मध्ये प्रकाशित झाली.

खासगी आयुष्य

जॉन ग्रीशम/ग्रिशम यांचा विवाह रेने जोन्स यांच्याशी ८ मे १९८१ साली झाला. त्यांना शीआ आणि टाय अशी दोन मुले आहेत. ग्रिशम यांना बेसबॉल या खेळाबद्दल विशेष प्रेम आहे. महाविद्यालयीन आयुष्यात ते स्वतः उत्तम बेसबॉल खेळत असत. परंतु एका सामन्यादरम्यान ते भयानक जखमी होता होता वाचले आणि त्यानंतर त्यांनी बेसबॉल खेळणे थांबवले. त्यांनी बेसबॉलसाठी वेळोवेळी आर्थिक आणि अन्य स्वरूपात मदत केली आहे.

जॉन ग्रीशम/ग्रिशम यांच्या पुस्तकांची यादी 

कादंबऱ्या

• अ टाईम टू किल (१९८९) • द फर्म (१९९१) • द पेलिकन ब्रीफ (१९९२) • द क्लायंट (१९९३) • द चेंबर (१९९४) • द रेनमेकर (१९९५) • द रनअवे ज्यूरी (१९९६) • द पार्टनर (१९९७) • द स्ट्रीट लॉयर (१९९८) • द टेस्टामेंट (१९९९) • द ब्रेथ्रन (२०००) • अ पेंटेड हाऊस (२००१) • स्कीपिंग ख्रिसमस (२००१) • द समन्स (२००२) • द किंग ऑफ टॉर्टस (२००३) • ब्लीचर्स (२००३) • द लास्ट ज्यूरर (२००४) • द ब्रोकर (२००५) • द इनोसंट मॅन (२००६) • प्लेइंग फॉर पिझ्झा (२००७) • द अपील (२००८) • द असोशिएट (२००९) • द कन्फेशन (२०१०) • द लिटिगेटर्स (२०११) • कॅलिको जो (२०१२) • द रॅकेटीअर (२०१२) • सिकॅमोर रो (२०१३) • ग्रे माऊंटन (२०१४) • रोग लॉयर (२०१५) • द व्हीस्लर (२०१६) • कमिनो आयलंड (२०१७) • द रुस्टर बार (२०१७) • द रेकनिंग (२०१८) • द गार्डीयन्स (२०१९) • कमिनो विन्ड्स (२०२०) • अ टाईम फॉर मर्सी (२०२०)

बाल वाङ्मय 

• थिओडॉर बून : किड लॉयर (२०१०) • थिओडॉर बून : द अ‍ॅब्डक्शन (२०११) • थिओडॉर बून : द अक्युज्ड (२०१२) • थिओडॉर बून : द अ‍ॅक्टिव्हिस्ट (२०१३) • थिओडॉर बून : द फ्युजिटिव्ह (२०१५) • थिओडॉर बून : द स्कँडल (२०१६) • थिओडॉर बून : द अकॉम्प्लिस (२०१९)

पुरस्कार 

  • १९९३ : गोल्डन प्लेट अवॉर्ड ऑफ द अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंट
  • २००५ : पेगी वी हेल्मरिच डीस्टीनग्विग्श्ड ऑथर अवॉर्ड
  • २००७ : गॅलक्सी ब्रिटिश लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
  • २००९ : लायब्ररी ऑफ काँग्रेस क्रिएटिव्ह अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर फिक्शन
  • २०११ : द इनॅग्युरल हार्पर ली प्राईझ फॉर लीगल फिक्शन (फॉर 'द कन्फेशन')
  • २०१४ : हार्पर ली प्राईझ फॉर लीगल फिक्शन (फॉर 'सिकॅमोर रो')

संदर्भ

  1. ^ "John Grisham". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-05-20.
  2. ^ "Home". John Grisham (इंग्रजी भाषेत). 2020-05-30 रोजी पाहिले.