Jump to content

जेम्स ग्रँट डफ

जेम्स ग्रॅंट डफ
जन्म नाव जेम्स ग्रॅंट डफ
जन्म ८ जुलै, इ.स. १७८९
बॉन्फ, स्कॉटलंड
मृत्यू २३ सप्टेंबर, इ.स. १८५८
इडन, स्कॉटलंड[]
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्रइतिहास, ब्रिटिश भारतीय लष्कर
भाषाइंग्रजी
साहित्य प्रकार इतिहास
विषय मराठ्यांचा इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती A History of the Mahrattas (मराठ्यांचा इतिहास)
वडील जॉन ग्रॅंट
आई मार्गारिट मिल्न
पत्नी जेन कॅथरिन आइन्स्ली
अपत्ये माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ग्रॅंट डफ
स्वाक्षरीजेम्स ग्रँट डफ ह्यांची स्वाक्षरी

जेम्स ग्रॅंट डफ (८ जुलै इ.स. १७८९ - २३ सप्टेंबर, इ.स. १८५८) हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.[]

सुरुवातीचे जीवन

जेम्स ग्रॅंट डफचा जन्म स्कॉटलंडमधील बॉन्फ या ठिकाणी किनकरडाइन ओनीलच्या 'ग्रॅंट' घराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव जॉन ग्रॅंट होते. जेम्स ग्रॅंट डफ याच्या वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच इ.स. १७९९ मध्ये त्याचे वडील वारले. त्याची आई मार्गारिट मिल्न ही ईडनच्या 'डफ' या घराण्यातील होती. तिचा भाऊ इ.स. १८२४मध्ये वारला त्यामुळे भावाच्या मृत्यूनंतर डफ कुटुंबाची मालमत्ता मार्गारिटला मिल्न यांना मिळाल्यामुळे जेम्स ग्रॅंटला आईकडचे ‘डफ’ हे घराण्याचे उपनाम घ्यावे लागले.[]

जेम्सच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेम्स व त्याची आई उत्तर स्कॉटलंडमधील ॲबरडीन या शहरात राहायला आले. जेम्सने तेथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्याच शहरातील मारिशल महाविद्यालयात प्रवेश घेतला. जेम्सने त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून सनदी सेवेत नोकरी करावी अशी त्याच्या आईची इच्छा होती. परंतु नोकरी मिळवण्यासाठी जो वेळ लागणार होता तो जेम्सला नको होता. म्हणून महाविद्यालयीन शिक्षण सोडून त्याने आपला देश सोडला व भारताकडे प्रयाण केले.[]

लष्करी कामगिरी

इ.स. १८०६ मध्ये ग्रॅंट डफ मुंबईत उतरला. त्याने मुंबईच्या लष्करात कॅडेट (सैन्य प्रशिक्षणार्थी) म्हणून प्रवेश मिळवला व एप्रिल १८०७ मध्ये तो लष्कराच्या सेवेत दाखल झाला. इ.स. १८०८मध्ये काठेवाडमधील लुटारुंच्या 'मालिया' किल्ल्यावर इंग्रज सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात ग्रॅंट डफने शौर्य दाखवले. इ.स. १८१० मध्ये त्याची 'लेफ्टनंट' पदावर पदोन्नती झाली. त्याने फार्सी भाषा आत्मसात केली. त्यामुळे इंग्रज पलटणीचा (बटालियन) फार्सी दुभाषी म्हणून तो निवडला गेला.[]

संदर्भ

  1. ^ मांडके, गिरीष. "ग्रॅंट डफ, जेम्स कनिंगहॅम".
  2. ^ अग्रलेख. "इतिहासाचे ध्यासपर्व". 2019-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-23 रोजी पाहिले.
  3. ^ कुलकर्णी पृ. २.
  4. ^ कुलकर्णी पृ. ३.
  5. ^ कुलकर्णी पृ. ४.

नोंदी

  • कुलकर्णी, अ.रा. जेम्स कनिंगहॅम ग्रॅंट डफ.