जीवन
भटके जीवन
सर रिचर्ड बर्टन म्हणतात 'मानवी जीवनात सगळ्यात आनंदाचा क्षण तेव्हा उगवतो जेव्हा आपण अनोळखी प्रदेशात भटकत असतो.' माणसाला नवीन नवीन प्रदेशात आणि नवीन नवीन निसर्गाच्या सानिध्यात जगायला वेगवेगळा अनुभव मिळतो. माणसाची जिज्ञासा, उत्सुकता, नाविन्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसाला समुद्र बघायची उत्सुकता असते तर समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसाला डोंगर आकर्षक वाटत असतो. थंड प्रदेशात राहणाऱ्या माणसाला गरम प्रदेशात जायची इच्छा असते तर गरम प्रदेशात राहणाऱ्या माणसाला थंड प्रदेशात जाऊन गारगार हवेचा अनुभव घ्यायचा असतो. कुणाला बर्फ पडताना बघायला आवडते तर कुणाला पाऊस पडताना अनुभवायला जायचे असते. कुणाला अथांग सागर डोळे भरून पाहायला आवडते तर कुणाला खळखळणारी नदी तिच्या रौद्र रूपात पाहायचे असते.