जितेंद्र अभिषेकी
जितेंद्र अभिषेकी | |
---|---|
जितेंद्र अभिषेकी | |
आयुष्य | |
जन्म | सप्टेंबर २१, १९३२ |
जन्म स्थान | भारत |
मृत्यू | नोव्हेंबर ७, १९९८ |
मृत्यू स्थान | पुणे, महाराष्ट्र, भारत |
मृत्यूचे कारण | वृद्धापकाळ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
अपत्ये | शौनक अभिषेकी |
संगीत साधना | |
गुरू | पं. जगन्नाथबुवा पुरोहित, |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग, |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
जितेंद्र अभिषेकी (सप्टेंबर २१, १९३२ - नोव्हेंबर ७, १९९८) एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते.
गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरू केले व प्रत्येक गुरूकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.
संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दू शेरोशायरीपर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.
सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं.
अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.
अभिषेकींनी जसं स्वतः संगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हणले.
आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. १९९५ सालच्या नाटयसंमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती .
सन्मान
- नाट्यदर्पण (१९७८)
- पद्मश्री (१९८८)
- संगीत नाटक अकादमी (१९८९)
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)
- गोमांतक मराठी अकादमी पुरस्कार ((१९९२)
- बालगंधर्व पुरस्कार (१९९५)
- सुरश्री केसरबाई केरकर पुरस्कार (१९९६)
- मा.दिनानाथ स्म्रृति पुरस्कार (१९९६)
- लता मंगेशकर पुरस्कार (१९९६)
- नाट्यपरिषदेचा बालगंधर्व पुरस्कार (१९९७)
- सरस्वती पुरस्कार(कैलास मठ नाशिक)(१९९७)
अभिषेकींनी संगीत दिलेली नाटके
- मत्स्यगंधा
- ययाति देवयानी
- लेकुरे उदंड झाली
- वासवदत्ता
- कटयार काळजात घुसली
- मीरा मधुरा
- हे बंध रेशमाचे
- धाडिला राम तिने का वनी?
- बिकट वाट वहिवाट
- सोन्याची द्वारका
- गोरा कुंभार
- कांते फार तुला
- देणाऱ्याचे हात हजार
- महानंदा
- कधीतरी कोठेतरी
- अमृतमोहिनी
- तू तर चाफेकळी
शिष्य
- शौनक अभिषेकी
- देवकी पंडित
- राजा काळे
- प्रभाकर कारेकर
- अजित कडकडे
- हेमंत पेंडसे
- शुभा मुद्गल
- महेश काळे
- रामदास कामत
संदर्भ
- नक्षत्रांचे देणे-पं.जितेंद्र अभिषेकी आणि पं.जितेंद्र अभिषेकींचे संकेतस्थळ.[१]