जायफळ
वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ (शास्त्रीय नाव: Myristica fragrans, मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ; इंग्लिश: Nutmeg, नटमेग ;) हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणाऱ्या अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे 'मायरिस्टिका फ्रॅग्रन्स'(Myristica fragrans)होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात.
जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बी होय. याचा आकार अंडाकृती असून ते २० ते ३० मि.मी. (०.८ ते १ इंच) लांब आणि १५ ते १८ मि.मी. (०.६ ते ०.७ इंच) रुंदीचे असते. त्याचे वाळल्यावर वजन ५ ते ७ ग्रॅम (०.२ ते ०.४ औंस) होते. जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली, लालसर रंगाची साल होय. जायफळाचे झाड लावल्यापासून ७ ते ९ वर्षांनी त्याला पहिल्यांदा फळे धरतात व २० वर्षांनंतर झाड पूर्ण जोमाने उत्पादन देऊ लागते. मसाल्यांमध्ये अनेकदा जायफळाची पूड वापरली जाते. एकाच झाडापासून दोन मसाल्याचे पदार्थ निर्मिणारे हे एकमेव झाड आहे.
याव्यतिरिक्त तैलार्क, तैलीय रेसिने, जायफळाचा स्निग्धांश (बटर) इत्यादी व्यापारी उत्पादने या झाडापासून मिळतात.
जायफळ किसणीवर सहज किसता येते, आणि सहाणीवर उगाळता येते.
जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) हा घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री उत्तम झोप येण्यासाठी जायफळ घातलेला पदार्थ उपयोगी पडतो. नाटकाच्या किंवा संगीताच्या कार्यक्रमाच्या मध्यांतरात वेलदोडा-जायफळ घातलेली काॅफी आवर्जून पितात.
भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत.
मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ही जायफळाची सर्वसाधारण जात इंडोनेशियातील बांदा बेटांव्यतिरिक्त, मलेशियातील पेनांग बेटावर तसेच कॅरिबिअन भागातील ग्रॅनडा येथे आढळून येते. दक्षिण भारतात केरळामध्ये ही जात जोपासली जाते. न्यू गिनी येथील पापुअन नटमेग मायरिस्टिका अर्जेंटिया आणि भारतातील बॉंबे नटमेग मायरिस्टिका मलाबारिका या जायफळाच्या इतर प्रमुख जाती होत.[१]
संदर्भ व नोंदी
- ^ "सकाळ मधील लेख".[permanent dead link]
बाह्य दुवे
- जायफळाच्या तैलार्कातील बुरशीरोधक गुणधर्म (इंग्लिश मजकूर)