जानवे
जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते.
उपनयन संस्कारात बटूला सावित्री व्रताचे चिह्न किंवा खूण म्हणून जानवे दिले जाते.[१]
वर्णन
जानवे हे कापसाच्या तंतूंनी तयार करतात.तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात.असे तीन पदर एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात.असे तीन पदर एकत्र करून गाठ बांधली म्हणजे जानवे तयार होते.[२]अशा रीतीने जानव्यात एकून नऊ सूत्रे असतात.त्याची लांबी ९६ अंगुळे असावी असे सांगितले आहे.जानवे तयार करताना विशिष्ट मंत्र म्हणतात.तसेच ते तयार झाल्यावर त्याच्यावर मंत्रपूर्वक संस्कार करतात.जानव्याचे मंत्रपूर्वक अभिमंत्रण केल्यावर ते सूर्याला दाखवितात आणि मगच धारण करतात.
या प्रत्येक तंतूवर ओंकार, अग्नी, नाग, प्रजापती, पितृक, वायू, विश्वदेव, सूर्य आणि सोम अशा नऊ देवांची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. हे नऊ तंतू तीन सूत्रांमध्ये बांधलेले असतात. तेथे ब्रह्मगाठ असते. या ब्रह्मगाठीवर आणि तिन्ही सूत्रांवर चार वेदांची स्थापना केली असल्याचे समजले जाते.[ संदर्भ हवा ]
यज्ञोपवीत धारण विधी
उपनयन समारंभात जानवे धारण केले जाते. जानवे धारण करताना खालील मंत्र म्हटला जातो-
ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः
या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून ते भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.ते आम्हाला उज्ज्वल आयुष्य, बल आणि तेज देवो. ब्रह्मचा-याने एक,गृहस्थाश्रमी व वानप्रस्थ यांनी दोन आणि यतीने एक यज्ञोपवीत धारण करावे असे देवलाने म्हणले आहे.[३]
वापरायचे नियम
याज्ञवल्क्याने जानव्याला ब्रह्मसूत्र असे म्हहटले आहे. ते डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे घालतात. ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे आणि अन्य वेळी म्हणजे मानुषकर्माच्या वेळी निवीती म्हणजे माळेसारखे ठेवावे.[१] जानव्यावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे.शौच व लघुशंका हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे. एकाने दुस-याचे जानवे घालू नये.जानवे तुटले तर ते उदकात टाकून देऊन नवे धारण करावे असे मनू सांगतो.[३]
अन्य माहिती
प्राचीन काळी काळविटाचे चामडे किंवा वस्त्र जानवे म्हणून वापरत असत.तसेच प्राचीन काळी स्त्रियाही यज्ञोपवीत घालीत असत कारण विवाहसमयी वधूने यज्ञोपरीतिनी असावे असे गोभील गृह्यसूत्रात (२.१.१८) म्हणले आहे.ब्राह्मणाने कापसाच्या सुताचे,क्षत्रियाने ताग्याच्या दो-याचे आणि वैश्याने बक-याच्या लोकरीच्या धाग्याचे जानवे वापरावे असे मनूने सांगितले आहे.(मनू २.४४)[३]
हे ही पहा
संदर्भ
- ^ a b Prasad, Ram Chandra; Prasāda, Rāmacandra (1997). The Upanayana: The Hindu Ceremonies of the Sacred Thread (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120812406.
- ^ Madan, T. N. (2010-11-03). The T.N. Madan Omnibus: The Hindu Householder (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780199088317.
- ^ a b c जोशी. होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड सातवा. भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.