Jump to content

जाण कथासंग्रह

"जाण" या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. या संग्रहातील चार कथा "हा माझा मार्ग एकला", "सत्कार", "मान महाविषरूप", आणि "लोभ पाप को बाप बखाना" या समकालीन जैन कथा आहेत. म्हणजे जैन समाजाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः विदर्भातील छोट्या गावांमधील दिगंबर जैन समाज यात चित्रित झाला आहे. तर "भिंत", "समांतर", "जाण", आणि "भोग" या कथा शहरी वातावरणात निर्माण होणाऱ्या असमानतेला अधोरेखित करतात. या कथा पुस्तकरूपाने प्रकाशित होण्याआधी लोकसत्ता, माहेर, आणि तीर्थंकर यातून प्रकाशित झालेल्या आहेत. डॉ. अमित जोहरापूरकर यांनी लिहिलेल्या या कथा आता पुस्तकरूपात एक्सेल पब्लिकेशनने प्रकाशित केल्या आहेत.[]

"भिंत" ही कथा अहमदाबादच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. भारतातील समाज हा मुळात एकजिनसी नाही. जात आणि धर्म यांच्या कुंपणांनी त्यात अनेक भेद निर्माण झाले आहेत. आर्थिक असमानता आणि जातीय उतरंडी यांच्या सरमिसळीमुळे या आपपर भावाला अधिकच खतपाणी मिळते. जागोजागी उभ्या असणाऱ्या झोपडपट्ट्या आणि त्यातून दिसणारी सामाजिक असमानता आपल्याला खुपते. हक्काचे घर न घेता अशा झोपड्यांमध्ये राहणाऱ्या माणसांच्या मनात गुन्हेगारी वृत्तीच असते असे समाजाला वाटते. एखाद्या परदेशी पाहुण्यांच्या भेटीच्या वेळी अशा झोपडपट्ट्या आणि वस्त्या हटवणे किंवा त्यांच्याभोवती भिंती उभारून त्या लपवणे हे भारतात अगदी सर्रास होते. पण वंचितांच्या अशा समूहांना समाजाच्या मुख्य धारेत आणून त्यांनाही कायद्याने जगणे शक्य व्हावे ही आपली जबाबदारी आहे असे समाजातील इतर वर्ग मानत नाही. अशीच एक वंचित जात जेव्हा समाजातील "आहे रे" समूहाच्या नाराजीला बळी पडते तेव्हा समाजातील "आहे रे" वर्गातीलच सहृदय वर्ग या आपत्तीतून त्यांना बाहेर काढू शकतो. समाजाच्या कुठल्याही वर्गाला दूर लोटणे सहज शक्य असते. मात्र त्यांना जवळ घेऊन त्यांच्यातील उणीव दूर करून त्यांना आपलेसे करणे ही समरसता आहे. हे ह्या कथेच्या माध्यमातून नकळत आपल्या मनावर बिंबते.

हीच वृत्ती समाजाच्या पातळीवरून व्यक्तिगत पातळीवर कशी कामी येते हे "जाण" या कथेतून दिसते. एका मुस्लिम गरीब आणि मागासलेल्या घरातील “सलीम” नावाचा मुलगा "कांताबेन" या सधन पण प्रेमळ अशा वृद्ध स्त्रीच्या मायेच्या पखरणीमुळे जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने कसा बघू लागतो हे या कथेत अगदी मोजक्या शब्दांत लेखक आपल्या समोर मांडतो. या दोन्ही कथांची पार्श्वभूमी अहमदाबाद आणि गुजराती समाजाची आहे. धार्मिक आणि अहिंसक वृत्तीचा सधन समाज समाजातील तथाकथित गुन्हेगारी आणि गरीब वर्गाकडे डोळेझाक करून किंवा त्यांना हद्दपार करून जगू शकत नाही, तर त्यांचा उद्धारकर्ता म्हणून नाही तर त्यांच्याशी बरोबरीने वागून, मैत्रीभावानेच त्यांचे कल्याण साधू शकतो हे या कथांमधून दिसते.

"समांतर" आणि "भोग" या दोन कथा समाजातील दुसऱ्या एका दरीकडे आपले लक्ष वेधतात. ती दरी म्हणजे स्त्रीपुरुष असमानता होय. वाढत्या उद्योगीकरणामुळे स्त्रिया व्यावसायिक जीवनात पुढे आल्या खऱ्या मात्र कुटुंबाच्या अपेक्षा आणि व्यावसायिक जीवनातील ओढाताण त्यांच्यावर सतत अन्याय करत असते. या अन्यायाकडे आपण नकळत दुर्लक्षच करत असतो. त्याकडे तरल पण अचूक पद्धतीने लक्ष वेधणाऱ्या या दोन कथा आपल्याला अंतर्मुख करतात.

"सत्कार" ही कथा विदर्भातील जैन समाजाचे मनोवेधक चित्रण करणारी आहे. बहुसंख्य हिंदू समाजात मिळून मिसळून राहणाऱ्या, आणि तरीही आपली वेगळी पूजा पद्धती, अहिंसक जीवनशैली जपून मुख्यत्वे समाजाचे भले चिंतणाऱ्या जैन समाजाचे हे चित्र मनोरंजक तर आहेच, पण कथेला शेवटी येणारे वळण माणसाला शेवटी आपल्या नाळेशी जोडून राहणे किती आवश्यक वाटते तेही सांगणारे आहे. "हा माझा मार्ग एकला" ही कथा तर विदर्भातील जैन समाजाचा इतिहास आणि भूगोल या दोन्हींचा मागोवा घेत "क्षमा" या जैन धर्मातील मुख्य तत्त्वाकडे आपल्याला घेऊन जाते. आत्मा आणि परमात्मा ह्या गोष्टी निव्वळ चर्चेच्या नसून तत्त्वज्ञान हे आचरणात आणता आले तरच ते कामाचे आहे हे एक शेतकऱ्याच्या कथेतून आपल्याला दिसते.

जैन समाज सधन आहे असा सर्वसाधारण समज आहे. मात्र ती वस्तुस्थिती नाही. विशेषतः लहान गावांमध्ये तर दिगंबर जैन समाज हा कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. पण समाजातील पुरोहित आणि साधुवर्गाची मंदिरे आणि पूजापाठ यांच्यावर अवाढव्य खर्च करण्याची वृत्ती वाढत आहे. त्यातून जैन समाज हा श्रीमंत आहे ही प्रतिमा समाजासाठी किती घातक होते आहे हे "मान महाविषरूप" आणि "लोभ पाप को बाप बखाना" या दोन कथांमधून दिसते. समाजातील विसंगतीकडे लक्ष वेधतानाच "मार्दव" आणि "आर्जव" या जैन तत्त्वज्ञानातील दोन मुख्य तत्त्वांची गुंफण या कथांमध्ये होते. या कथा काल्पनिक आहेत, पण जैन आणि जैन समाजाच्या अवतीभवती असणारे जैनेतर वाचक या कथांचे सूत्र आणि व्यक्ती प्रत्यक्षात आहेत असेच म्हणतील अशा या कथा आहेत. या कथांचे हेच वैशिष्ट्य आहे. या कथा नसून खरोखर घडलेल्या गोष्टींची ही वर्णने आहेत असेच वाचकाला या कथा वाचतांना वाटते.

समाजातील विसंगतीकडे बोट दाखवतानाच त्यातील तत्त्वज्ञानाच्या खरेपणाकडे, आणि त्यायोगे येणाऱ्या  चांगुलपणाच्या रुपेरी कडांकडेही या कथा आपल्याला खेचून नेतात. सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील विसंगतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत चांगले ते अंगीकारणे हेच माणसाचे माणूसपण आहे हे "जाण" या कथासंग्रहातून जाणवते.

  1. ^ Joharapurkar, Amit (2023). Jaan (Kathasangrah), Excel Publications Bhopal, ISBN 978-93-91708-08-5. India: Excel Publications. pp. 1–99. ISBN 978-93-91708-08-5.