Jump to content

जागतिक मधुमेह दिवस

मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (International Diabetes Federation, IOF) या संस्थेद्वारे १९९१ मध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. १९२२ मध्ये चार्ल्स बेस्ट (Charles Best) यांसोबत सर फ्रेडरिख बँटिंग (Sir Frederick Banting) यांनी इन्शुलीनचा शोध लावला. सर बँटिंग यांच्या शंभराव्या जन्मदिनादिवशी जागतिक मधुमेह दिवस या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

नीलवलय (Blue circle) हे जागतिक मधुमेह दिवसाचे संबोधचिन्ह (Logo) म्हणून ठरवण्यात आले. मधुमेह या आजाराविरुद्ध सामाजिक मोहिमेमध्ये सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होणे, या संदेशाचे हे चिन्ह द्योतक आहे.

मधुमेह हा चयापचयसंबंधित विकार आहे. हा चिरकालीन आजार आहे म्हणजेच हळूहळू विकसित होतो. यामध्ये रक्तातील शर्करेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.

मधुमेह प्रकार-१ हा प्रामुख्याने अल्पवयीन (Juvenile) गटातील व्यक्तींमध्ये दिसून येतो. यामध्ये इन्शुलीनच्या उत्पादनात घट दिसून येते. प्रकार-१ हा प्रतिबंधात्मक नाही, परंतु अंतःक्षेपणाद्वारे त्याचे ‍नियंत्रण करता येते. तर मधुमेह प्रकार-२ मध्ये स्वादुपिंडाद्वारे तयार झालेले इन्शुलीन शरीरातील पेशींद्वारे योग्य प्रमाणात वापरले जात नाही. दीर्घकालीन मधुमेहामुळे अंधत्व, वृक्क निष्क्रियता, हृदय विकार असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, नियंत्रित वजन आणि धूम्रपान निषेध यांद्वारे मधुमेह या आजाराला प्रतिबंध घालता येतो.

जागतिक मधुमेह दिवसाचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि मधुमेह तपासणी शिबिर यांचे आयोजन केले जाते. तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. निळ्या रंगाचे कपडे परिधान करून मिरवणूक किंवा सामूहिक व्यायामांचे आयोजन केले जाते. जागतिक मधुमेह दिवसानिमित्त रूपरेखा (Theme) आखल्या जातात, त्यांपैकी काही महत्त्वाच्या रूपरेखा पुढीलप्रमाणे : सुरक्षित भविष्य : मधुमेहसंबंधी शिक्षण आणि प्रतिबंध (२०१३); आरोग्यपूर्ण आहार (२०१५); स्त्रिया आणि मधुमेह : आरोग्यपूर्ण भविष्य, आपला अधिकार (२०१७); कुटुंब आणि मधुमेह (२०१८-१९). आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरणाने २०२० सालाकरिता ‘परिचारिका आणि मधुमेह’ (Nurses make the difference) ही रूपरेखा ठरवली आहे. यानुसार मधुमेहग्रस्त व्यक्तींच्या देखभालीमध्ये परिचारिकांच्या (Nurse) भूमिकेबद्दल जागृती करण्यात येणार आहे.