जागतिक तत्त्वज्ञान दिन
ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी सॉक्रेटीस ( इ. स. पू. सुमारे ४७०–३९९) याच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.[१][२]. तथापि संयुक्त राष्ट्रसंघाने १९ नोव्हेंबर हा दिवस '‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून जाहीर केला आहे.[३]
पहिला जागतिक तत्त्वज्ञान दिन
पहिला जागतिक तत्त्वज्ञान दिन २१ नोव्हेंबर २००२ रोजी साजरा झाला, अशी नोंद इंग्लिश विकिपीडियावर आहे, तथापि त्याचा संदर्भ दिलेला नाही. [४]
जागतिक तत्त्वज्ञान दिनाची पार्श्वभूमी
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे २००२पासून 'तत्त्वज्ञान दिन' राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आणि इतर ठिकाणी नोव्हेंबरच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा केला जात असे. मोहम्मद आचारी यांनी १९ मे २००४ रोजी दिलेल्या प्रस्तावानुसार त्यास जागतिक दर्जा देण्याचे मान्य करण्यात आले. हा प्रस्ताव १३ जानेवारी २००५ रोजी राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडला गेला. आचारी यांच्यातर्फे त्यांच्या प्रतिनिधी मिस अझीझा बेन्नानी यांनी ०७ फेब्रुवारी २००५ रोजी राष्ट्रसंघाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष हान्स हाईनरिश व्रेदे यांना प्रस्ताव सादर केला. त्यानंतर 'असा दिवस साजरा करणे शक्य आहे का ? ' यासाठीची अभ्यास समिती नियुक्त झाली. त्यासाठी २००२, २००३ आणि २००४ साली जगात ठिकठिकाणी साजऱ्या झालेल्या 'तत्त्वज्ञान दिना'च्या कार्यक्रमांचा अभ्यास करण्यात आला. या दिनास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याविषयी जगातील नामवंत विचारवंत आणि सामान्य नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रसंघाच्या ७९ सदस्य देशांमधील ९५ तत्त्वज्ञानविषयक संस्थांनी 'जागतिक तत्त्वज्ञान दिन' साजरा करण्यासाठी मोठी तयारी दर्शविली. त्यांत आफ्रिकेतील २२ संस्था होत्या. त्यापैकी सहा अरब प्रांतातील होत्या. १७ आशिया आणि पॅसिफिक, २२ युरोप आणि उत्तर अमेरिका आणि १२ लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन प्रांतांतील होत्या. २००२ साली या सर्वांमधील ५३ राष्ट्रांनी २००२ मध्ये आपापल्या राष्ट्रात 'तत्त्वज्ञान दिन' साजरा केला होता.[५]
संयुक्त राष्ट्रसंघाचे नेतृत्व
जागतिक तत्त्वज्ञान दिन सुरू करणे, त्यास मान्यता देणे ही कामे संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहेत, पण या दिनावर मालकी प्रस्थापित केलेली नाही, तत्त्वज्ञानाची काळजी वाहणाऱ्या प्रत्येकाचा हा दिन असून कुणीही कुठेही कोणतीही तत्त्वज्ञानप्रेमी व्यक्ती हा दिवस आपापल्यापरीने साजरा करू शकतात, अशी संयुक्त राष्ट्रसंघाची भावना आहे. [६]. व्यक्ती आणि समाज यांच्यासाठी मुक्त आणि खुले अवकाश प्राप्त करून देणाऱ्या जगात कुठेही होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक चिंतनाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे धोरण राष्ट्रसंघाने ठरविले आहे. त्यासाठीच नोव्हेंबर मधील तिसरा गुरुवार हा जागतिक तत्त्वज्ञान म्हणून साजरा करण्याचा निर्णय राष्ट्रसंघाने त्यांच्या जाहीरनाम्यात व्यक्त केला.[७]
जागतिक तत्त्वज्ञान दिनाचा प्रस्ताव
जागतिक तत्त्वज्ञान दिन संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर करावा, त्यास मान्यता द्यावी आणि त्याचा जगभर पुरस्कार करावा, असा प्रस्ताव मोरोक्को या आफ्रिकन देशाच्या संस्कृती मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री मोहम्मद आचारी यांनी राष्ट्रसंघास दिला. त्याचा विचार करून राष्ट्रसंघाने हा दिवस मुक्रर केला.[८]
संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका
लोकांनी आपला तत्त्वज्ञानात्मक वारसा इतरांपर्यंत पोहोचवावा, नव्या कल्पनांना सामोरी जाण्यासाठी आपली मने खुली करावीत, त्याचप्रमाणे आपला समाज ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्यांविषयी सर्वसामान्य नागरी समाज आणि समाजातील बुद्धिमंत वर्ग यांच्यात सार्वजनिक संवाद साधला जावा, असा संवाद साधण्यासाठी त्यांनी उद्युक्त व्हावे, हा हेतू या दिनाच्या प्रवर्तनामागे आहे.[९] दरवर्षी जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा करण्यातून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्कृती आणि मानवी विचार यांचा विकास यांच्यात निहित असलेले तत्त्वज्ञानाचे चिरकाल मूल्य संयुक्त राष्ट्रसंघ अधोरेखित करते. संयुक्त राष्ट्रसंघ नेहमीच तत्त्वज्ञानाशी जोडले गेलेले आहे; पण स्वैरकल्पनाधारित तत्त्वज्ञान अथवा आदर्शात्मक तत्त्वज्ञान यांच्याशी ते संबंधीत नाही, तर आंतरराष्ट्रीय संदर्भात प्रत्येक मानवी कृतीला आणि जीवनाला अर्थ देऊ शकणाऱ्या चिकित्सक, प्रश्नार्थक अभिवृत्तीला अभिवादन करण्यासाठी हा दिन संयुक्त राष्ट्रसंघ साजरा करते.[१०]
जागतिक तत्त्वज्ञान दिनाची उद्दिष्टे
तत्त्वज्ञान दिनास जागतिक दिनाचा दर्जा देण्यामागे संयुक्त राष्ट्रसंघाने काही विशिष्ट उद्दिष्टे निश्चित केली आहेत. ती त्यांच्या जाहीरनाम्यात दिली आहेत.[११] ती अशी:
- तत्त्वज्ञानाबद्दल प्रत्येक सदस्य राष्ट्रात राष्ट्रीय स्तरावर, त्या राष्ट्रातील विविध प्रांत, तसेच उपप्रांतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बांधिलकीचे पुनरुज्जीवन करणे.
- मानवतेला आज भेडसावत असलेल्या विविध प्रकारच्या आव्हानांवर परिणामकारक उपाय सुचवू पाहणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक अभ्यासास, संशोधनास आणि विश्लेषणास प्रोत्साहन देणे.
- तत्त्वज्ञानाच्या महत्त्वाविषयी आणि विशेषतः अनेक समाजांना आधुनिकतेत प्रवेश करताना कराव्या लागणाऱ्या निवडीमुळे उद्भवत असणाऱ्या परिणामांना आणि जागतिकीकरणाच्या परिणामांना तोंड देताना उद्भवणाऱ्या समस्यांची निवड करताना तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक उपयुक्ततेविषयी व्यापक जनजागरण करणे.
- संपूर्ण जगातील तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन करणे; विशेषतः तत्त्वज्ञान शिकण्याची संधी समानतेने उपलब्ध करून देणे
- भावी पिढ्यांसाठी तत्त्वज्ञान शिकण्याचे जागतिक सार्वत्रिकीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे.
अपेक्षित साध्ये
या उद्दिष्टांना अनुसरून संयुक्त राष्ट्रसंघाने काही साध्येही जाहीरनाम्यात नमूद केली आहेत. [१२] ती अशी:
- व्यापक आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त, चिकित्सक आणि जबाबदार तत्त्वज्ञानात्मक चिंतनाची गरज आहे, याची जाणीव निर्माण करणे.
- तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी विचारवंत, धोरणकर्ते, शैक्षणिक संस्था आणि माध्यमे यांना पुढाकार घ्यायला प्रवृत्त करणे.
- सामाजिक आणि मानव्य विज्ञाने, नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याची सुरुवात करणे आणि सहकार्य वाढवणे.
- तत्त्वज्ञानाचे शिक्षण आणि त्याचे व्यावहारिक उपयोजन करण्यात नव्या दृष्टिकोनांचे आणि नव्या पद्धतींचे विस्तृत विवेचन लोकांसमोर आणणे.
- या संदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघाची प्रवर्तकाची भूमिका, त्यांचे सारे प्रयत्न, त्यांचे अधिकार आणि त्यांची बौद्धिक चळवळ सर्वत्र पोहोचवणे.
भारतातील जागतिक तत्त्वज्ञान दिन
भारतात प्रामुख्याने विद्यापीठ स्तरावर आणि काही प्रमाणात महाविद्यालयीन पातळीवर जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा होतो. इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च ही तत्त्वज्ञानविषयक शिखरसंस्था या दिनासाठी अनुदान देते. या संस्थेने नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात हा दिवस निश्चित केला आहे. २०१५ या वर्षाकरिता या संस्थेने रु. २०,०००=०० (वीस हजार फक्त) अनुदान दिले.[१३]. अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर काही निकषांनुसार अर्जांची छाननी होऊन निवडक अर्जांना मान्यता देण्याची संस्थेची प्रथा आहे.
हेही वाचा
संदर्भ
- ^ [१] मराठी विश्वकोश हे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ
- ^ लोकशाही मूल्यांचा आद्य प्रणेता, श्रीनिवास हेमाडे, "दिव्य मराठी, दि. ३० नोव्हेंबर २०१३,[२]
- ^ http://www.un.org/en/events/philosophyday/
- ^ https://en.wikipedia.org/wiki/World_Philosophy_Day
- ^ जागतिक तत्त्वज्ञान दिनाची उद्घोषणा,http://unesdoc.unesco.org/images/0014/001402/140277E.pdf
- ^ http://www.un.org/en/events/philosophyday/
- ^ http://unesdoc.unesco.org/images/0014/001402/140277E.pdf
- ^ जागतिक तत्त्वज्ञान दिनाची उद्घोषणा,http://unesdoc.unesco.org/images/0014/001402/140277E.pdf
- ^ http://www.un.org/en/events/philosophyday/
- ^ https://en.wikipedia.org/wiki/World_Philosophy_Day
- ^ जागतिक तत्त्वज्ञान दिनाची उद्घोषणा,http://unesdoc.unesco.org/images/0014/001402/140277E.pdf
- ^ जागतिक तत्त्वज्ञान दिनाची उद्घोषणा,http://unesdoc.unesco.org/images/0014/001402/140277E.pdf
- ^ ICPR PL Grants 2015 for Selected Applicants, http://www.icpr.in/WPD-2015.pdf Archived 2016-01-28 at the Wayback Machine.