जांग त्सो-लिन
जांग त्सो-लिन : (? १८७३–? १९२८). मँचुरियाचा युद्धजीवी सरदार. सुरुवातीला तो दरोडेखोर होता. पुढे त्याने चिनी सैन्यात प्रवेश केला व १९०४-०५ च्या रूसो-जपानी युद्धात त्याने जपानच्या बाजूने लढा दिला. १९११ साली मांचू राजवटीच्या अस्तानंतर कँटन येथे सन-यत्-सेनच्या राष्ट्रीय पक्षाची हुकमत सुरू झाली त्याच सुमारास उ. चीनमध्ये युद्धजीवी सरदारांच्या आपापसांतील लढाया चालू झाल्या. जांग त्सो-लिनने सरदार वू पे-फूचा पराभव करून मँचुरियावर आपली अधिसत्ता घोषित केली. १९२६ मध्ये ईशान्य चीनमधील जपानच्या वाढत्या धोक्यामुळे जपानधार्जिण्या जांग त्सो-लिनला मान्यता देण्याचा रशियाने मनसुबा केला. १९२७ च्या सुरुवातीला त्याने पीकिंग येथील रशियाच्या राजदूतावासावर हल्ला केला. त्यात बरेच कम्युनिस्ट व माओ-त्से-तुंगचे गुरू व चिनी कम्युनिस्ट पक्षाचे एक संस्थापक लिटा-चाव हे ठार झाले. १९२८ च्या उन्हाळ्यात क्वोमिंतांग पक्षाचे नेते चँग कै-शेक यांनी युद्धजीवी सरदारांच्या निःपाताची मोहीम सुरू केली. त्यात लिनचा पराभव झाला, तेव्हा त्याने पीकिंग सोडून मँचुरियात आश्रय घेतला. १९२८ मध्ये जांग त्सो-लिन प्रवास करीत असलेल्या आगगाडीला उडवून देण्यात आले. या अपघातात तो ठार झाला. या प्रकरणात जपानचा हात होता असे नंतर आढळून आले आणि त्यामुळे जांग त्सो-लिनचा मुलगा जांग शूलेयांग जपानचा कट्टर शत्रू बनला. १२ डिसेंबर १९३६ रोजी जांग शूलेयांगने चँग कै-शेकला पकडले आणि जपानविरोधी लढ्यात कम्युनिस्टांबरोबर लढण्यास भाग पाडले.