Jump to content

जहाल मतवादी चळवळ


पट्टाभि सीतारामय्या यांनी आपल्या “दि हिस्ट्री ऑफ दि इंडियन काँग्रेस ” या ग्रंथात मवाळपंथीय व जहालपंथीय यांच्यातील फरक दाखवताना दोघांच्या मतवादांचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, “गोखल्यांना आहे त्या शासनसंस्थेत सुधारणा पाहिजे होत्या तर टिळकांना शासनाची पुनर्बांधणी करावयाची होती....ब्रिटिश नोकरशाहीशी सहकाय करणे गोखल्यांना आवश्यकच वाटत होते, तर या नोकरशाहीशी दोन हात करणे आवश्यक अशी टिळकांची धारणा होती.... शक्य असेल तेथे ब्रिटिशांना सहकार्य द्यावे व आवश्यक असेल तेथे फक्त विरोध करावा असे गोखल्यांना वाटे तर टिळक प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशाची वाट अडवायला अस्तन्या सावरून बसलेले ! .... परकीय पाहुण्यांची मने जिंकण्यात गुंतलेले, तर त्यांना हाकलून लावण्याची टिळकांना घाई झाली होती.... काही बुद्धिमान मोजकी मंडळी हा गोखल्यांचा आधार तर, लाखोंचा अफाट जनसागर हे टिळकांचे बळ.”

कार्याचे मूल्यमापन

सामान्यतः इ.स. १९०५ ते १९२० हा जहालमतवादी विचारांचा कालखंड मानला जातो. मात्र, या काळात काँग्रेसवर केवळ जहालमतवादी विचारांच्या नेत्यांचे पूर्ण नियंत्रण होते, असे म्हणता येत नाही. याउलट यातील काही वर्षे काँग्रेस संघटना मवाळमतवादी नेत्यांच्या प्रभावाखाली होती. इ.स. १९०७ मध्ये सुरत येथे जहालमतवादी व मवाळमतवादी यांच्यात फूट पडल्यावर मवाळमतवादी नेत्यांनी लोकमान्य टिळक व अन्य जहाल नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली; तरीही हा कालखंड ' जहालमतवादी कालखंड ' म्हणूनच ओळखला जातो. कारण या काळात देशाच्या सर्व भागात जहालमतवादी विचारांचा प्रभाव होता. लोकमानसात या नेत्यांना अत्यंत आदराचे स्थान होते. राष्ट्रीय चळवळीची सूत्रे या काळात जहालमतवादी नेत्यांच्या हाती होती, ही गोष्ट बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत या नेत्यांनी बजाविलेल्या मोलाच्या भूमिकेतून स्पष्ट होते. जहालमतवादी नेत्यांनी राष्ट्रीय चळवळीला परिस्थितीनुसार नवा आशय व नवी दिशा देण्याचे मौलिक कार्य केले. भारतीय समाजातील वाढता असंतोष कृतीतून व्यक्त करण्याचे, किंबहुना, शब्दांना कृतीची जोड देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.

जहालमतवादी चळवळीचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे भारतीय जनतेत या चळवळीने नवा आत्मविश्वास निर्माण केला. इंग्रजी सत्तेचे खरे स्वरूप जनतेपुढे स्पष्ट करून इंग्रजी सत्ता भारतीय जनतेच्या शोषणावरच आधारलेली आहे; आपली साम्राज्यवादी उद्दिष्टे साध्य करण्यापुरताच इंग्रजांना भारताच्या राज्यकारभारात रस असल्याने या राज्यकर्त्याकडून भारतीयांना कदापिही न्याय मिळणार नाही, ही बाब या नेत्यांनी जनतेपुढे स्पष्टपणे मांडली. जहालमतवादी नेत्यांच्या या चळवळीमुळे भारतीय जनता साम्राज्यसत्तेविरोधी लढ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहाने पुढे आली. राजकीय हक्क मागून मिळत नसतात, त्यासाठी संघर्षच करावा लागतो; म्हणूनच जनतेने आत्मनिर्भर राहून स्वराज्यप्राप्तीसाठी निर्णायक संघर्ष करण्यास सिद्ध झाले पाहिजे, अशी शिकवण या नेत्यांनी भारतीय जनतेला दिली. स्वतःच्या उदाहरणाने मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च त्याग करण्याचा व वाटेल ते कष्ट सोसण्याचा आदर्श त्यांनी जनतेला घालून दिला.