Jump to content

जलसंधारण दिन

जलसंधारण दिन[] 10 मे रोजी जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वत्र साजरा केला जातो. दुष्काळावर मात करण्यासाठी आणि अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी क्रांतिकारी व दूरगामी स्वरूपाचे धोरणे माजी मुख्यमंत्री व जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ सुधाकरराव नाईक यांनी आखले. जलसंधारणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे 'पाणीदार नेता' म्हणून सुधाकरराव नाईक यांची ओळख आहे. 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा मूलमंत्र त्यांनी दिला. पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंट होईल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाची देशभर चळवळ सुरू केली. सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे हा दिवस जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून सर्वत्र 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो. हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी प्रभावशाली कामगिरी बजावली. जलक्रांतीचा पाणीदार लढवय्या, 'जलनायक' या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरक कार्याचे वर्णन केले आहे. [][][]

पाणी अडवा पाणी जिरवा

"पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर झाली नाही, तर या महाराष्ट्राला वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही." असे जलनायक सुधाकरराव नाईक म्हणत.जलसंधारण चळवळीसाठी त्यांनी स्वतःला एवढे झोकून दिले की, कोकणातील दौऱ्यात तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही‌. आणि १० मे २००१ रोजी त्यांचे प्राणपाखरू उडून गेले. जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणाच्या क्रांतिकारी कार्याचे स्मरण म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी विविध उपक्रमही हाती घेतले.

  'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा जलक्रांतीचा मूलमंत्र देत सुधाकरराव नाईक यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महानायक वसंतराव नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र 'सुजलाम् सुफलाम्' तर केलाच ; पण त्याचबरोबर राज्यात पहिल्यांदाच जलसंधारण चळवळीची मुहुर्तमेढ केली. दुष्काळ आणि पाणी टंचाईने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी त्यांनी राज्यात जलक्रांती घडवून आणली. दुष्काळ आणि जल दूर्भिक्षतेच्या संकटावर योद्धा प्रमाणे लढले.[] 


स्वतंत्र जलसंधारणाच्या कामांत गती देत राज्याला जलसमृद्ध केले. पाणलोट क्षेत्रात विकास हे नवे सूत्र नाईकांनी प्रभावीपणे वापरले. त्यातूनच जलसंधारण हे खाते निर्माण केले. त्यामुळे वसंत बंधारे व पाझर तलाव, नाला बल्डींग निर्मितीस चालना मिळाली. याबरोबरच महाराष्ट्रात विनाअनुदानीत तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाहता पाहता महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची क्रांती घडून आली. जोपर्यंत मुलगी शिकणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही ; हे ते जाणून होते म्हणून त्यांनी मुलींचे शिक्षणशुल्क माफ करण्याचे ठरविले. महिला आणि बाल सुरक्षेचा प्रश्न पाहता त्यांनी स्वतंत्र महिला व बालकल्याण या विभागाची स्थापना केली. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यामुळे त्यांची संपूर्ण देशभरात प्रशंसा झाली. जलसंधारणाच्या बाबतीत ते अतिशय आग्रही व तज्ञ होते. त्यामुळे सुधाकरराव नाईक यांनी पहिल्यांदा स्वतंत्र जलसंधारण खात्याची निर्मिती देखील केली. [][]

संदर्भ

  1. ^ गुल्हाने, प्रा. दिनकर (२०१९). "आजच्या दुष्काळात आठवतात सुधाकरराव नाईक". पुणे: एग्रोवन सकाळ. 2021-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-26 रोजी पाहिले.
  2. ^ लोखंडे, संजय (२०२१). "जलसंधारणाचे मूल्य अमूल्य". पुणे.
  3. ^ "मुख्यमंत्री राहिलेला माणूस". मुंबई: टिम बोलभिडू. २०२१.
  4. ^ पवार, एकनाथराव (२०२२). "जलनायक सुधाकरराव नाईक". नागपूर: सकाळ वृत्तपत्र.
  5. ^ नगरी, टीम इये मराठीचिये (2023-05-10). "जलक्रांतीचा योद्धा जलनायक सुधाकरराव नाईक". इये मराठीचिये नगरी (इंग्रजी भाषेत). 2023-05-11 रोजी पाहिले.
  6. ^ "जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक". मुंबई: मॅक्स महाराष्ट्र. २०१८.
  7. ^ "जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक". मुंबई: The Voice of Mumbai. २०२०. 2021-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-26 रोजी पाहिले.