जर्मनीच्या दहशतीत करपलेले बाल्य
जर्मनीच्या दहशतीत करपलेले बाल्य हे पुस्तक आहे.
- .पुस्तक : चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट,
- .अनुवादक : सिंधू विजय जोशी,
- .प्रकाशन : मेहता, पुणे,
- .पृष्ठे : ६ + १९० ,
- .मूल्य : १३० रुपये,
- .आवृत्ती : फेब्रुवारी २००५.
‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ हे पुस्तक आता मराठीत उपलब्ध झाले आहे. हे पुस्तक मराठी वाचनमनाला खूप आवडेल. कारणं प्रत्यक्ष जगण्याचे संदर्भ असलेल्या अनुभवांना मराठीत चांगले दिवस आले आहेत. पण ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ हे आत्मचरित्र नाही. आठ-चौदा वय वर्षात अनुभवलेल्या मरणाचे, अत्यंत भेदरलेल्या मनःस्थितीतील हे कथन आहे. ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ कथात्मक कादंबरी आहे. ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ वाचताना ‘एक्झोडस’ ही भाषांतरित कादंबरी आठवते. ज्यूंची हत्या हाच दोन्हीतील विषय आहे. ज्यूंनी ख्रिस्ताला सुळावर चढविले. त्याचा सूड घेण्याकरिता ज्यूंचे हत्यासत्र सुरू झाले, असे या कथानकाचे आशयसूत्र आहे. ज्यूंना किडयामुंग्याप्रमाणे चिरडून टाकले, त्याच वेळी जर्मन-रशियन युद्ध चालू होते. जर्मन रशियन सैनिकाना धरून, त्यांचा छळ करून ठार करत. ही कादंबरी म्हणजे संथगतीने बर्फावरून चालण्याचा अनुभव होय.बर्फामुळे चालण्याची वेदना कळू नये तसे दुःखतिरेकाने अश्रू गळू नये असे काहीसे. ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्टचा लेखक कोणत्याही घटनेचे सारांश वर्णन करून डोळ्यात पाणी आणीत नाही; किंवा त्यातून वातावरणनिर्मिती करत नाही. अत्यंत थंडपणे वर्णन करतो, उदाहरणार्थ – यांकली- म्हणजे जक याच्या ओळखीच्या साशा या रशियन सैनिकाची जर्मनांनी हत्या केली. हातांच्या बोटांची नखे काढली पायांच्या बोटांची नखे उखडली, मग डोळे फोडले आणि शेवटी मारून टाकले. या छळाचे हृदयद्रावक असे वर्णन नाही. मग हे प्रेत यांकली पैझयाकबाईच्या मुलीने पाहिले. या बीभत्स्य क्रौर्याला पाहून ती आठ-नऊ वर्षाची पोर भयभीत झाली नाही, टाहोही फोडला नाही. तर तिने शांतपणे खड्डा करून हे प्रेत मातीत झाकल. अशी अनेक दृश्ये या मुलांनी पाहिलेली , तेव्हा अश्रू थिजलेले, वर्ननाकारिता शब्द नाहीसे झालेले असतात. चांगल्या कालाकृतीत भावनेचा आगडोंब टाळला जातो. हे टाळून लिहिणे निव्वळ नैरेटीव्ह नसते. दृश्य वाचत असताना जाणीवेतून पोटात खड्डाच पडतो. तसेच भाषिकदृष्ट्या निरतिशय साधेपणाही असतो. अलंकार, उपमा, उपमान हे येताच नाही. तिथे स्वतंत्र जितेजागते विश्वच असते. त्यात अलंकरनाला जागा नसते. कृत्रिम आणि निर्जीव शैलीत अलंकाराचा सोस असतो. तसे होताना हे मुद्दलात नग्ग्रच असते. नाग्ग्रतेला कुठली आली अलंकाराची वासना ? जे सांगायचे आहे ते सांगून पटकन त्या यातनातून बाजूला व्हावे अशीच आविष्कारकर्त्यांची भावना असते. ...होलोकॉस्टमधून जाक कुपरची ही अवस्था ध्यानी येते.
यांकली –जाक आठ-नऊ वर्षाचा होता. हत्त्यासत्रास सुरुवात होते. त्याच्या आईने त्याला पैझाक नावाच्या बाईकडे ठेवले. आपल्या बंशाचा दिवा राहावा एवढीच तिची भावना असते. त्याच्या पापभिरू आजोबाला उचलून नेतात. नंतर आईही लुप्त होते, मग त्याचा मोशेमामा... एकेक करत सगळेच आधार गळतात. त्या प्रचंड क्रौर्यात यांकलीला आधार मिळतो तो पैझाकबाईचा. ही बाई आपली लेक गिनिया आणि यांकली यांच्यात फरक करत नाही. त्या बर्फाळ क्रौर्यात माणुसकीचा मंद दिवा पैझाकबाईच्या रूपात तेवत असतो. ही बाई यांकलीला स्नान घालते. थंडीत अंगावरून गरम-गरम ५-६ बदल्या पाणी घेण्याचे सुख त्याला मिळते.
जर्मनीच्या दहशतीचा जोर वाढतो. ज्यूंना गावागावातून शोधून मारले जाऊ लागते. यांकलीला तशातच मोशेमामा भेटलेला. दोघांचे संरक्षण करणे अवघड होते. समजूत घालून पैझाकबाई त्याना पुढे जायला सांगते. कारण त्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न होता.
यांकली चुणचुणीत, हरहुन्नरी असतो. त्याचे रूपही चमकदार. आपली मिंडशी भाषा सोडून पोलिश सफाईदार बोलू लागतो. त्याच्या चालण्या, बोलण्या, दिसण्या, वागण्यात ज्युपण उठून दिसत नसे. पैझाकबाईच्या घरातून पडल्यानंतर त्याला मरनयातना भोगाव्या लागतात. गवताच्या गंजीत लप, बर्फावरून चालत राहा, त्यातच झोप, पोटात भुकेची आग, अंग ऊवालिखांनी बरबटलेले. हात खरूज होऊन नासलेले. लघवीवरील नियंत्रण सुटलेले. मनात आई-आजोबा यांच्या आठवणीची, ते कधीतरी भेटतील या आशेची ऊब त्यानंतर अंघोळीची सुखद आठवण यांकलीला पैझाकबाईच्या घरी ओढून आणते;पण बाईचा मुलगाच गेस्त्पो झालेला ! नंतर त्याला आणखी दोन ठिकाणी आश्रय मिळतो. गोलेबेक हे सहृदयी गृहस्थ भेटतात. त्याचे खरजाळलेले हात पाहून त्याला चार रात्री स्वतः साबण लावून स्नान घालून स्वतः औषधपाणी करतात.अशी भली माणसे यांक्लीला भेटतात.
यांकली आपल्यावर दया दाखवणाऱ्यांवर दिलखुलास बोलतो. आपल्या अनेक आठवणीही मोकळेपणाने सांगतो. रात्री अंथरून ओले करण्याची सवय, ज्यूंमध्ये सुंथा करण्याची पद्धत असते.सुंथा आहे की नाही दाखविण्यासाठी चड्डी काढणे, गोलेबेक स्नान घालताना सुंथा दिसू नये म्हणून सारखे फिरणे. नदीवर इतर मुले पोहताना त्याचा हिरमोड व्हायचा. कारण चड्डी काढून पोहावे लागे. मग सुंथा ! एक ज्यू दिसला. गावातील जर्मन पोर ज्यू ज्यू म्हणून त्याच्या मागे लागली. आपण ज्यू नव्हेत हे दाखवण्याकरिता यांक्लीही ज्यू ज्यू करीत ज्यू मागे पळतो. या गोष्टी मोकळेपणाने सांगितलेल्या आहेत.हे यांकलीचे नशीब आहे का ? नाही. हे तर ज्यूंच्याच नशिबी आले होते. परंतु यामुळे निरागस बाल्य जर्मनीच्या दहशतीत करपून गेले.