Jump to content

जयशंकर सुंदरी

जयशंकर सुंदरी हे गुजराती रंगभूमीवरील लोकप्रिय गायक-नट आहेत. यांचे नाव जयशंकर भोजक. जयशंकर ‘ सुंदरी’ या टोपणनावाने विशेष प्रसिद्घ आहेत. त्यांचा जन्म ३० जानेवारी १८८९ रोजी झाला. २२ जानेवारी १९७५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

जयशंकर यांनी १९०१ मध्ये वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ‘ मुंबई गुजरात नाटक मंडळी ‘मध्ये प्रवेश केला. मूलशंकर हरिनंद मुलाणी (१८६८–१९५७) यांच्या सौभाग्य सुंदरी या नाटकात त्यांनी ‘सुंदरी’ या नायिकेची प्रमुख भूमिका केली. सुंदरी ही मध्ययुगीन राजपूत घराण्यातील राजकन्या होती. सौभाग्य सुंदरी या नाटकाचे प्रयोग प्रत्येक आठवड्यात दोनदा याप्रमाणे सलग तेरा वर्षे तुफान गर्दीत चालले व या नाटकातील जयशंकर यांची सुंदरीची भूमिका अफाट लोकप्रिय झाली, त्यामुळे ‘ सुंदरी ‘ या स्त्रीपात्राच्या टोपणनावानेच ते ओळखले जाऊ लागले. या नाटकाला लाभलेल्या अभूतपूर्व यशामुळे जयशंकर सुंदरी यांना नाटककंपनीमध्ये भागीदारीही देण्यात आली. सुंदरी यांनी जवळजवळ तीस वर्षे गुजराती रंगभूमीवर स्त्रीभूमिका केल्या व त्या विलक्षण गाजल्या. १९३२ मध्ये त्यांनी शेवटची स्त्रीभूमिका केली, ती मोगल सम्राज्ञी नूरजहान हिची होती. त्यानंतर त्यांनी स्त्रीभूमिका करणे सोडले व ते पुरुष पात्रांच्या भूमिका करु लागले. गुजरातमधील एक प्रतिष्ठित, प्रमुख व्यावसायिक नाट्यसंस्था म्हणजे अहमदाबाद येथील ‘ नट मंडळ ‘ या संस्थेची स्थापना १९५२ मध्ये जयशंकर सुंदरी व रसिकलाल सी. पारीख या दोघांनी मिळून केली. जयशंकर सुंदरी यांनी वृद्घापकाळात आपल्या मुलाला–दिनकर भोजक यांना–आत्मकहाणी सांगितली व त्यांनी ती लिहून घेतली, ती थोडा आंसू , थोडा फूल या नावाने प्रसिद्घ आहे. भारत सरकारने जयशंकर सुंदरी यांना १९७१ मध्ये ‘ पद्मभूषण ‘ पुरस्कार देऊन गौरविले. जयशंकर सुंदरी यांच्या जीवनावर व रंगभूमीवरील कारकिर्दीवर ॲन ॲक्टर प्रीपेअर्स हा चित्रपट काढण्यात आला.


जयशंकर सुंदरी यांच्या स्त्रीभूमिका त्यांच्या प्रगल्भ, सफाईदार व प्रभावी अभिनयामुळे विलक्षण गाजल्या. त्यांच्या वेगवेगळ्या स्त्रीभूमिकांमध्ये सूक्ष्म, विविधांगी भावभावनांचे प्रत्ययकारी दर्शन घडते. सौंदर्य व मोहकता यांचा आदर्श मानदंड त्यांच्या स्त्रीभूमिकांनी निर्माण केला. १९३० व ४० या दोन दशकांत जयशंकर सुंदरींनी ⇨ भवाई या पारंपरिक गुजराती लोकनाट्याचे पुनरुज्जीवन घडवून त्यास आधुनिक रूप दिले. कथकळीच्या संदर्भात वळ्‌ळत्तोळ यांनी व भरतनाट्यम्‌च्या संदर्भात रुक्मिणीदेवी यांनी जे पुनरुज्जीवनाचे व आधुनिक रुपपरिवर्तनाचे कार्य केले, त्याच तोडीचे कार्य भवाईच्या संदर्भात सुंदरींनी केले. सुंदरी हे गुजराती रंगभूमीवरील जुनेजाणते, अनुभवी व मुरब्बी नट होते. त्यांनी भवाईचा रुपबंध वापरून आधुनिक गुजराती नाटके सादर केली व त्यांत स्वतः स्त्रीभूमिकाही केल्या. नंतरच्या काळात त्यांना दीना गांधी या नामवंत अभिनेत्रीची समर्थ साथ लाभली व त्या दोघांनी संयुक्त रीत्या मीना गुर्जरी या नाटकाचे प्रयोग १९५० च्या दशकाच्या आरंभकाळात केले. हे नाटक भवाईच्या पुनरुज्जीवनाचे व त्याला दिलेल्या आधुनिक रुपबंधाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून गुजराती रंगभूमीच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरले. पारंपरिक भवाईच्या बीभत्स, अश्लील रस्तानाटकाच्या स्वरूपात क्रांतिकारक बदल घडवून त्याला आधुनिक, जोमदार व चैतन्यपूर्ण रूप देण्याचे श्रेय जयशंकर सुंदरी यांना दिले जाते.


जयशंकर सुंदरी यांच्या संगीतनाटकांचा प्रभाव मराठी संगीत रंगभूमीवरही पडला. मुंबईतील ‘ गेइटी थिएटरा ‘त त्यांच्या नाटकांचे प्रयोग होत असत. पारशी रंगभूमीच्या प्रभावातून गुजराती नाट्यसंगीतात चमत्कृतिजन्य, उडत्या, चटकदार चालींचे प्राबल्य निर्माण झाले होते. हा गुजराती नाट्यसंगीताचा प्रभाव जयशंकर सुंदरी यांच्या संगीतनाटकांमुळे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या संगीतनाटकांवर पडला. १९०५–११ पर्यंत मराठी नाट्यसंगीतात कोल्हटकरी संप्रदायाचे जे नाट्यसंगीत रुळले होते, त्यावर जयशंकर सुंदरी यांच्या गुजराती संगीत नाटकांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या प्रेमशोधना पर्यंतच्या (१९११) संगीत नाटकांत तो जसा जाणवतो तसाच तो वरेरकरांच्या कुंजविहारी (१९१४) व गडकऱ्यांच्या पुण्यप्रभाव (१९१७), या नाटकांतील संगीतातही जाणवतो. गुजराती नाट्यसंगीताची–विशेषतः जयशंकर सुंदरी यांच्या गाण्याची–छाप या नाटकांवर प्रकर्षाने दिसून येते. मराठी संगीत रंगभूमीवर बालगंधर्वांना जे महत्त्वाचे स्थान आहे, तेच त्यांचे समकालीन असलेल्या जयशंकर सुंदरी यांना गुजराती संगीत रंगभूमीवर प्राप्त झाले आहे, असे म्हणता येईल.

संदर्भ

  1. https://vishwakosh.marathi.gov.in/25921/