Jump to content

जयंती कठाळे

सौ. जयंती कठाळे 'पूर्णब्रम्ह'च्या व्यवस्थापकीय संचालिका (एम.डी.) आहेत. पूर्णब्रम्ह हा 'मनस्विनी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड'चा प्रकल्प असून जगभरात मराठी खाद्यपदार्थांची गुणवत्तापूर्ण उपहारगृहे उभारणे व मराठी खाद्यसंस्कृती सर्वदूर पोहचविणे हे त्यांचे संकल्पित कार्य आहे.

पूर्वायुष्य[]

जयंती कठाळे या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यांनी 'एम.सी.ए.'ची पदवी घेतली आहे व त्या एक सॉफ्टवेर इंजिनिअर आहेत. 'माहिती तंत्रज्ञान' (आयटी) क्षेत्रात 'इन्फोसिस' या कंपनीमध्ये त्या कार्यरत होत्या. सन २०१२ पर्यंत १३ वर्षे त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केले आहे. नोकरीनिमित्त सन २००० साली बंगळूरू येथे बदली झाल्यावर मराठी पदार्थांची कमतरता त्यांना भासली. हाच अनुभव त्यांना विमानप्रवासातही आला. परप्रांतात, विमानतळावर व विमानातील दीर्घ प्रवासात मराठी पूर्णान्न न मिळाल्याने मराठी माणसांची होणारी अडचण लक्षात घेऊन त्याचेच निवारण करण्याचे स्वप्न त्यांनी पहिले. एकत्र कुटुंबात वाढलेल्या जयंती कठाळे यांना बालपणीपासूनच स्वयंपाकाची आवड होती. मराठी खाद्यसंस्कृतीत 'अन्न हे पूर्णब्रम्ह' असते असा प्रसार करून स्वतः मराठी उपाहारगृह उभारण्याचा त्यांनी निश्चय केला. बंगळूरूमध्ये व्यावसायिक संशोधन करून, खाद्य-पदार्थांची मागणी व पुरवठा लक्षात घेऊन, प्रत्येक प्रदेशाची वेगळी अशी चव चाखून पूर्णब्रम्हचा आराखडा त्यांनी तयार केला.

'पूर्णब्रम्ह'ची सुरुवात[]

सन २०१२ साली २० जणांना बसता येईल असे पहिले उपहारगृह त्यांनी ६० स्क्वेअरफुटच्या जागेत उभारले. तेथे साधा वरण भात, पुरणपोळी, थालीपीठ यांसारखे पदार्थ त्यांनी विकण्यास सुरुवात केली. बंगळूरूमधील अमराठी लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपाक शिकवला. तेथे भाषा न समजणे, मराठी पदार्थ कसे असतात, ते कसे खातात हेही न समजणे अशा अनेक अडचणी त्यांना तेथील लोकांमध्ये जाणवल्या. कानडी पदार्थ व मराठी पदार्थ यांमधील फरक समजावून सांगून त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले. चवीबरोबरच उपहारगृहाचे वातावरण देखील मराठमोळे असावे असा त्यांचा आग्रह असतो. पूर्णब्रम्हमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी चौरंग-पाटाच्या पंगती मांडल्या जातात. सौ. कठाळे या स्वतः नऊवारी साडीत वावरतात. तेथील कर्मचारी साडी, धोतर पगडी अशाच वेशात असतात. सध्या बंगळूरूमध्ये ५७०० स्क्वेअरफुटमध्ये पूर्णब्रम्ह उभे आहे.

आगामी प्रकल्प

संपूर्ण जगभरात पूर्णब्रम्हच्या एकूण ५,००० शाखा उभारण्याचे कठाळे यांचा बेत आहे. बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद अशा शहरात; मुंबई, दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर; तसेच अमेरिका, लंडन अशा परदेशातील अनेक प्रदेशात शाखा त्या उभारणार आहेत.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  1. ^ ABP Majha (2016-11-30), Marathi Big Boss : Ladies Special : National : Jayanti Kathale, 2018-03-08 रोजी पाहिले
  2. ^ Swayam Talks (2018-02-12), I left my job to start a restaurant | Jayanti Kathale | Swayam Mumbai 2018, 2018-03-08 रोजी पाहिले