Jump to content

जपमाळ

जपा माला,अग्रभागाने प्रमुख मणी असलेली तुळशीच्या लाकडापासून बनवलेली आहे

जपमाळ ही कोणत्याही देवाचे किंवा दैवताचे नाम जपण्यास वापरण्यात येणारी वस्तू आहे. जप करण्याने ईश्वरप्राप्ती होते असा सर्व धर्मीयांमध्ये प्रचलित समज आहे. जपमाळेत १०८ मणी असून त्यांतला एक मेरुमणी असतो. मेरूमण्याच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात केली आणि ती मेरुमण्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाली असे समजते.

काही जपमाळा कमी मण्यांच्याही असतात. एखादी जपमाळ २३ किंवा २७ मण्यांची असू शकते. हिंदू धर्माव्यतिरिक्त मुसलमान, यहुदी, ख्रिश्चन या धर्माच्या लोकांमध्येही जपमाळेचा वापर होतो.

जपमाळ किंवा माळ (संस्कृत: माळ; माळ म्हणजे हार []), हिंदू, बौद्ध, जैन आणि काही शीख लोकांद्वारा संस्कृतमध्ये जाप म्हटल्या जाणाऱ्या धार्मिक रिवाजासाठी सामान्यपणे वापरला जाणारा मण्यांचा एक धागा असतो. हा सहसा १०८ मण्यांचा बनलेला असतो, पण इतर संख्येतही मणी असतात. पठण करताना, मंत्र म्हणताना किंवा मनात मंत्र म्हणताना किंवा देवदेवतांच्या नावांचा जाप करताना मोजण्यासाठी माळा वापरल्या जातात.

हिंदू संप्रदाय

हिंदू धर्मात बनविण्यात आलेली जपमाळ ही रुद्राक्ष, तुळस स्फटिक, मोती, रत्न अथवा वैजयंतीच्या झाडाचे चोपडे मणी याची बनलेली असते. यात रुद्राक्षाची माळ पुरुषाने वापरावी व तुळशीची माळ ही स्त्रियांनी वापरावी असा समज आहे.

मुस्लिम

मुसलमान या अशा जपमाळेस तसबी म्हणतात. ही जपमाळ शंभर मण्यांची असते. तिच्यात तेहतिसाव्या मण्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा मणी घातलेला असते, त्यास 'ईमाम' असे म्हणतात.

ख्रिश्चन

ख्रिश्चन लोकांमध्ये जपमाळेस रोझरी म्हणतात. सध्या जप करण्याचे मोजणी यंत्रही आले आहे, त्याद्वारे किती जप केला हे कळू शकते.

वापर

विशेष करून मंत्रांची शेकडो वेळा किंवा अनेकदा हजारो वेळा पुनरावृत्ती केली जाते. ही माळ अशासाठी वापरली जाते, जेणेकरून त्याच्या आवृत्तीना मोजण्यावर लक्ष केंद्रित न होता त्या मंत्राच्या अर्थावर किंवा ध्वनीवर लक्ष केंद्रित होईल. घड्याळाच्या काट्याच्या दिशेत प्रत्येक मणीभोवती अंगठा फिरविताना सहसा एक आवृत्ती गणली जाते, पण काही परंपरा किंवा रिवाजानुसार घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेत किंवा एखाद्या विशिष्ट बोटाने त्यांना फिरविले जाते. मुख्य मणीवर पोहोचल्यावर त्या माळेची एक फेरी पूर्ण झालेली होते, आणि त्याला विरुद्ध दिशेत पुन्हा सुरू केले जाते. प्रत्येक मणीच्या मध्ये विशिष्ट अशी गाठ असते. यामुळे माळ वापरणे सोपे होते आणि त्या धाग्यावर ते घट्ट वाटत नाहीत.

१०८ पेक्षा जास्त आवृत्त्या करावयाच्या असतील, तर काही वेळा काहीवेळा तांदळाच्या दाण्याच्या तिबेटीयन परंपरेचा वापर केला जातो, ज्यात मंत्रोच्चार सुरू करण्यापूर्वी त्यांना मोजले जाते आणि दर १०८ आवृत्यांसाठी एक दाणा वाडग्यात ठेवला जातो. प्रत्येक वेळी जेव्हा आवृत्त्यांची एक पूर्ण माळ होते, तेव्हा त्या वाडग्यातून तांदळाचा एक दाणा काढून खाली ठेवला जातो. सहसा, नेहमी मंत्रोच्चार करणारे त्यांच्या माळांवर खुण ठेवतात, सामान्यपणे दहाच्या संख्येत. यांना परंपरेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाऊ शकते; उदाहरणार्थ काही परंपरांमध्ये दर दहाव्या मणीनंतर ते ठेवले जाते. मोठ्या संख्येचा माग ठेवण्यासाठी ही एक पर्यायी पद्धत असते, काही वेळा तो हजारो तर काही वेळा लाखांमध्ये देखील.

माळेवरील १०९ व्या मणीला सुमेरू, बिंदू, स्तूप किंवा गुरू मणी असे म्हणतात. नेहमी सुमेरूच्या पुढील मणीनंतर गणती सुरू केली जाते. हिंदूंमध्ये, वेदिक परंपरेत एकापेक्षा अधिक माळांची पुनरावृत्ती करायचे असेल, तर सुमेरूपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला पार न करता दिशा बदलली जाते.

१०८ मणी का असतात, या बद्दल अनेक स्पष्टीकरणे आहेत. ज्यात हिंदू आणि बौद्ध लोकांच्या अनेक परंपरांमध्ये १०८ संख्येस विशेष धार्मिक महत्त्व आहे.

  • २७ तारकापुंज x ४ पद (भाग ) = १०८
  • राशीचक्रातीची १२ घरे x ९ ग्रह = १०८
  • उपनिषद किंवा वेदांचे धर्मग्रंथ = १०८

अशा प्रकारे, जेव्हा आपण १०८ वेळा पठन करतो किंवा गणना करतो, तेव्हा वास्तविक रूपाने आपण संपूर्ण ब्रम्हांडाची आठवण करत असतो. हे आपल्याला विश्व हे सर्वव्यापी असलेल्या गोष्टीची आठवण करून देते, म्हणजेच स्वतःचे स्वाभाविक स्वरूप होय.[]

वापरातील विविधता

काही हिंदू परंपरा सांगतात की माळ वापरण्याची अचूक पद्धत उजव्या हाताने पकडणे आहे, ज्यात अंगठा एका मणीनंतर दुसऱ्या मणीकडे ढकलला जातो, आणि माळ मधल्या बोटावर आणली जाते. तर्जनीला अहंकाराचे, म्हणजेच स्वतःला ओळखण्यात सर्वात मोठा अडथळ्याचे प्रतिक मानले जाते, त्यामुळे माळेचा जाप करताना याला टाळणे सर्वोत्तम मानले जाते.

भारताच्या पूर्वोत्तर भागात, खास करून पश्चिम बंगाल आणि आसाममधील शक्त परंपरेत, माळेला उजव्या हाताच्या अनामिकेवर सहसा ठेवले जाते, ज्यात मणी अंगठ्याच्या सहाय्याने मधल्या बोटाद्वारे पुढे ढकलले जातात आणि तर्जनी टाळली जाते. तथापि, मणी ढकलण्यासाठी अंगठ्याचा वापर करीत मधल्या बोटावर आणणे या प्रदेशांमध्ये स्वीकृत असते.

साहित्य

माळेचे मणी बनविण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ वापरले जातात. शंकराचे भक्त, शैव रुद्राक्षाच्या झाडांच्या बियांना पवित्र मानतात, तर तुळशीच्या लाकडापासून बनविलेल्या मणींना विष्णूचे भक्त, वैष्णवांद्वारा पवित्र मानले आणि वापरले जाते.[] इतर सामान्य मणींमध्ये चंदनाच्या झाडाचे किंवा बोधीच्या झाडाचे लाकूड किंवा बिया सामील असतात आणि कमळाच्या झाडाच्या बिया असतात. काही तिबेटीयन बौद्ध परंपरेमध्ये पशूंच्या हाडांचा (खास करून याक) वापर केलेला असतो, त्यातही पूर्वीच्या लामांचे मणी अत्यंत मौल्यवान समजले जातात. रक्ताश्म आणि नीलमणीसारख्या मध्यम अनमोल अशा खड्यांचा देखील वापर करण्यात येतो. हिंदू तंत्र आणि तसेच बौद्ध तंत्रामध्ये (किंवा वज्रायन) देखील, मणीचे साहित्य आणि रंग यांचा विशेष हेतूशी संबंध असू शकतो.

संदर्भ

  1. ^ आपटे 1965, p. 758.
  2. ^ "पवित्र माला मणी".
  3. ^ "जपमाळ". रुद्राक्ष-रत्ना.कॉम. 2018-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-28 रोजी पाहिले.