जनार्दन महाराज वळवी
जनार्दन महाराज वळवी | |
---|---|
जन्म | जनार्दन मुंदलवड नंदुरबार |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | समाज सेवक |
जनार्दन महाराज वळवी' हे शिक्षणाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात आदिवासींच्या सर्वांगीण विकास साधणारे व्यक्ती होत.
चरित्र
जनार्दन महाराज वळवी यांचा जन्म गरीब आदिवासी कुटुंबात, नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड या छोट्याशा गावात झाला. त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत, संघर्षमय वातावरणात, प्रसंगी उपासमार सोसून जिद्दीने व चिकाटीने शिक्षण घेतले. नोकरीची आस न धरता समाजसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले; कारण लहान वयातच त्यांनी आदिवासी समाजावर होणारे अन्याय, त्यांचे अज्ञान, दारिद्रय, त्यांच्या अंध: श्रद्धा हे सर्व जवळून पाहिले व प्रत्यक्ष अनुभवलेदेखील होते.
आदिवासींचा विकास होण्यासाठी, अनिष्ट रूढी मुळापासून नष्ट करण्यासाठी शिक्षण हेच माध्यम असल्याचे ओळखून त्यांनी प्रत्येक वाडीपर्यंत, झोपडीपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. साने गुरुजींचे शिक्षणविषयक विचार, गांधीजींचे सामाजिक विचार यांचा प्रभाव जनार्दन महाराजांवर असल्याचे दिसून येते. त्यामुळेच आयुष्यभर खादी वापरण्याचा वसा त्यांनी गांधीजींकडून घेतला.
प्रसंगी स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून इ.स. १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सत्याग्रहींसोबत आंदोलने केली, इंग्रजांच्या लाठ्याही खाल्ल्या. बुलेटिन वाटप, गुप्त बैठका यातही ते सक्रिय सहभागी असत. आदिवासी भागात कार्य करणाऱ्या उच्च शिक्षितांचे कार्य पाहून जनार्दन महाराजांनाही कार्य करावेसे वाटू लागले. याच प्रेरणेतून इ.स. १९४५ धडगाव येथील सभेत त्यांनी समाजसेवेचा संकल्प सोडला व तो संकल्प ते आजतागायत अनुसरत आहेत. बाळुभाई मेहता, नानासाहेब ठकार, जयवंतराव नटावदकर ही त्यांची प्रेरणास्थाने होत. तसेच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांना पी. के. अण्णा पाटील, मधुकरराव चौधरी आदींचेही सहकार्य लाभले आहे.
जनार्दन महाराजांनी वेठबिगार पद्धतीस आळा घातला. जातिभेदांविरुद्ध आवाज उठवला. आदिवासींमध्ये नवऱ्या मुलाने मुलीला हुंडा देण्याची पद्धत होती. ही पद्धत बंद करण्याचा प्रयत्न इ.स. १९५३ पासून महाराज करीत आहेत. हुंड्याची रक्कम कमी करण्यात त्यांना यश मिळाले आहे. आदिवासी समाजात एकोपा व बंधुभाव निर्माण होण्यासाठी, आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या संस्कृतीची ओळख होण्यासाठी धडगाव येथे गणेशोत्सव व पोळा हे सण साजरे करण्यास त्यांनी सुरुवात केली. दिवाळीच्या काळात रेडा (हेला) बळी देण्याची आदिवासींमध्ये असलेली प्रथा बंद करण्यात त्यांना यश मिळाले आहे. सावकारांकडून होणारे शोषण, उद्योजकांकडून होणारे आदिवासींचे शोषण रोखण्यातही त्यांना यश मिळाले आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीतच, अतिशय लहान वयात आमदार होण्याची संधी त्यांना मिळाली. विधानसभेत त्यांनी आदिवासींची घरे, शिक्षण, दळणवळणाच्या सुविधा या प्रश्नांवर आवाज उठविला. इ.स. १९५५ पासून त्यांनी आश्रमशाळा स्थापन करण्यास सुरुवात केली. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांनी आश्रमशाळा सुरू केली होती. यांपैकी अनेक आश्रमशाळा आजही कार्यरत आहेत.
सातपुड्यासारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी, दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीकरिता जनार्दन महाराजांनी नोव्हेंबर, इ.स. १९६३ मध्ये आदिवासी सातपुडा शिक्षण मंडळाची स्थापना केली. काही काळ त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, आदिवासींचे प्रश्र्न लेखनातून समाजासमोर मांडले.
जनार्दन वळवी यांच्या विधायक कार्याकरिता शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार बहाल केला. आदिवासी सेवक संस्था पुरस्कार (इ.स. १९८६), फोर्ड फाउंडेशनचा मॅन ऑफ दी इयर पुरस्कार (इ.स. १९९४), वीर बिरसा मुंडा पुरस्कार आदि पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. आदिवासी लोक त्यांना साधुसंतच समजतात आणि म्हणूनच धुळे परिसरातील आदिवासींनी जनार्दन वळवी यांना आदराने ‘महाराज’ ही उपाधी बहाल केलेली आहे.
जनार्दन महाराज प्रसिद्धीच्या वलयापासून नेहमीच दूर राहिले आहेत. एक निरपेक्ष, निस्पृह व सहनशील कार्यकर्ता; ध्येयवादी, कार्यनिष्ठ व तळमळीचा समाजसुधारक; दऱ्याखोऱ्यांतून शिक्षणाचा मंत्र-जागर करणारा ऋषीऱ्या शब्दांत त्यांचे वर्णन करता येईल. पारदर्शी, नावीन्याचा ध्यास असलेले व्यक्तिमत्त्व लाभलेला हा सातपुड्याचा कर्मयोगी आजही आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत.
बाह्य दुवे
- लोकसत्ता मधील लेख[permanent dead link]