जनार्दन बाळाजी मोडक
जनार्दन बाळाजी मोडक (३१ डिसेंबर, इ.स. १८४५:पंचनदी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - १९ मार्च, इ.स. १८९२:ठाणे, महाराष्ट्र) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच इ.स. १८७०पासून ते मेजर थॉमस कॅन्डी यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर जनार्दन बाळाजी मोडक ठाणे शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.
विविधज्ञानविस्तार (स्थापना-इ.स. १८६८) या नियतकालिकाशी जनार्दन बाळाजी मोडक यांचा संबंध सन १८७४पासून आला, तो थेट १८९०पर्यंत. या काळात मोडकांनी ज्योतिष व गणिताविषयी अनेक लेख मासिकात लिहिले. भास्कराचार्यांच्या लीलावतीचे भाषांतरही प्रसिद्ध केले. शिवाय संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यांतील सौंदर्य, आणि पुस्तकपरीक्षणे आदी विषयांवर मोडक विविधज्ञानविस्तारात लिहीतच होते. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधी लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’ ‘शालापत्रक’, ठाण्याचे ‘अरुणोदय’, मुंबईचे ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होते. त्यांच्या या काव्याच्या व्यासंगामुळेच ‘काव्येतिहाससंग्रह’ व नंतर ‘काव्यसंग्रह’ या मासिकांच्या संपादनाची जबाबदारी जनार्दन बाळाजी मोडक यांच्यावर पडली, आणि त्यांनी ती उत्तमपणे पार पाडली.
काव्येतिहास मासिक
प्राचीन मराठी हस्तलिखित काव्ये, जुन्या बखरी, जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हे अप्रसिद्ध साहित्य प्रकाशात आणण्यासाठी जनार्दन बाळाजी मोडक यांनी काशिनाथ नारायण साने यांच्या सोबत इ.स. १८७८मध्ये ‘काव्येतिहास’ नावाचे मासिक सुरू केले. त्यांच्या या कार्यात त्यांना विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि शंकर तुकाराम शाळिग्राम आदींचे साहाय्य झाले. पुढे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी ‘काव्येतिहास’शी संबंध तोडल्यामुळे, जनार्दन बाळाजी मोडक त्या मासिकातील संस्कृत काव्यविभागाचे कामही पाहू लागले. हे मासिक १८८८पर्यंत चालले. त्यात मोडकांनी संपादन करून प्रकाशित केलेली काव्ये आणि लेख :
- मुक्तेश्वरकृत महाभारत-वनपर्व (१८७९)
- वामनपंडितकृत प्रकरणे (१८८२)
- रामदासस्वामीकृत रामायण व इतर प्रकरणे (१८८२)
- मोरोपंतांचे कृष्णविजय-पूर्वार्ध (१८९१)
जनार्दन बाळाजी मोडक यांचे अन्य साहित्य
- जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण (१८७२)
- भास्कराचार्य व तत्कृत ज्योतिष (१८७७)
- वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर (१८८५)
निधन
या प्रकांड पंडित असलेल्या काव्येतिहासकाराचे निधन ठाण्यात वयाच्या अवघ्या सत्तेचाळिसाव्या वर्षी झाले.