Jump to content

जगन्नाथ महाराज पवार

जगन्‍नाथ महाराज पवार नाशिककर हे विष्णुबुवा जोगांचे प्रशिष्य मामासाहेब दांडेकर यांचे शिष्य होत. जगन्नाथ महाराज हे गुरे वळणारे, खेडेगावातले शेतकरी होते. दीर्घ प्रयत्‍नांनी ते वेदान्तवाचस्पती आणि काव्यतीर्थ झाले.चेउत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर गाजलेल्या जगन्नाथ महाराजांचं स्वरयंत्र कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निकामी होऊन त्यांची कीर्तनसेवाच खंडित झाली. तेव्हा त्यांनी जिद्द न सोडता लेखणी हातात धरली व ग्रंथरचनेस सुरुवात केली.

जगन्‍नाथ महाराजांनी आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘वटवृक्ष’ नामक ग्रंथच प्रसिद्ध केला आहे. (इ.स. २०१६). विष्णूसहस्रनामावर दहा खंडांचे मराठी भाष्य प्रसिद्ध करून त्यांनी एक विक्रमच केला आहे. ‘वटवृक्ष’ ही त्यांची साठावी कृती आहे. वटवृक्ष या ग्रंथात जगन्‍नाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर हे या वटवृक्षाचे बीज असून जोग महाराज त्याचा बुंधा आहेत; जोग महाराजांचे शिष्य चतुष्टय-बंकटस्वामी, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, मारोतीबुवा गुरव आणि सोनोपंत दांडेकर म्हणजे वटवृक्षाच्या मुख्य शाखा असल्याचे सांगून त्या शाखांना फांद्या, डहाळ्या, पाने, पारंब्या व वृक्षावर विहरणारे पक्षी आहेत, असे सगळे रूपक रचले आहे.[]

फडांच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायाचा विचार करणाऱ्यांची परंपरा स्पष्ट करताना जगन्नाथ महाराज ती ऐतिहासिक दृष्टीने करतात. ’संतवाङ्‌मय व समाज यांच्या समन्वय प्रक्रियेचा प्रारंभ साखरे घराण्यापासून झाला पण तो सनातनी वृत्तीतून वेदान्ताच्या परिभाषेत व त्यांच्याकडे शरणागत अशा अधिकारी श्रोत्यांपर्यंतच असल्याने काहीसा मर्यादितच राहिला. ही कोंडी जोग महाराजांनी फोडली’, असे जगन्नाथ महाराजांनी लिहिले आहे.

१८ फेब्रुवारी २००९ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जगन्नाथ महाराजांना राज्य शासनाचा २००९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार एक परिपत्रक काढून जाहीर केला. यात त्यांना एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह अशा स्वरूपात पुरस्कार दिला. हा पुरस्कारदेण्याचा निर्णय राज्य सरकारची एक समिती ठरवते, जो की आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला पंढरपूर किंवा मुंबई येथे देण्यात येतो.[]

जगन्नाथ महाराज पवार यांनी माघ वद्य द्वितीया दि. १२ फेब्रुवारी २०१७ श्रीक्षेत्र देवगिरी (दौलताबाद) येथे देह ठेवला. त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यांची प्रकल्प, प्रबंध आणि प्रबोधन परंपरा त्यांचे पट्टशिष्य आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज हे चालवित आहेत. त्यांचे नेतृत्वात संतधाम, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जगन्नाथ महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक साकारणार आहे.

जगन्‍नाथ महाराजांना मिळालेले पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कार[]


(अपूर्ण)

  1. ^ a b "जगन्नाथ महाराज पवार नाशिककर". 2022-06-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  2. ^ "जगन्नाथ महाराज - पवार, नाशिककर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर" (PDF).