Jump to content

जगन्नाथ कुंटे

जगन्नाथ केशव कुंटे (जन्म : १५ मे १९४३; - पुणे, ४ मार्च २०२१): ऊर्फ स्वामी अवधूतानंद हे त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. इ.स.२०१० सालापर्यंत त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. ही परिक्रमा अतिशय खडतर असते. या परिक्रमांच्या अनुभवांवर आधारलेली ’नर्मदेऽऽ हर हर’ आणि ’साधनामस्त’ ही दोन पुस्तके कुंटे यांनी लिहिली.

जगन्नाथ कुंटे हे कतार येथे काही वर्षे वास्तव्यास होते. त्यांनी बरेच लिखाण केले; पण ते प्रकाशित झाले नाही. तीन नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी 'नर्मदे हर हर' हे पहिले पुस्तक लिहिले. प्राजक्त प्रकाशनाने २००५ मध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला अफाट लोकप्रियता मिळाली. कुंटे यांच्या ओघवत्या आणि भारावून टाकणाऱ्या लेखनशैलीचे हजारो चाहते निर्माण झाले. पुढच्या परिक्रमेनंतर त्यांनी 'साधनामस्त' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर २००६मध्ये त्यांनी संन्यास घेतला. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य वाचक व साधक यांच्या घरी, नदी किनारी किंवा आश्रमात असे.

'नर्मदे हर हर' पुस्तकाची आता (२०२१ साली) २४ वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या 'साधनामस्त', 'नित्यनिरंजन', 'कालिंदी', 'धुनी' या पुस्तकांच्या प्रत्येकी दहापेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत. नऊ वर्षांच्या खंडानंतर २०१९ मध्ये 'प्रकाशपुत्र' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. पहिले पुस्तक नागिणीच्या पिल्लासारखे असेल, हे त्यांचे शब्द 'नर्मदे हर हर' पुस्तकाच्या लोकप्रियतेने खरे ठरले. पुरस्कारासाठी पुस्तक पाठवण्याला त्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्या एकाही पुस्तकाला पुरस्कार मिळाला नाही. कुंटे यांनी महाराष्ट्रात राज्यभर व्याख्याने दिली, ती खूप गाजली. एक पुस्तक वाचले की सगळी पुस्तके विकत घेणारा वाचक वर्ग त्यांनी वेगळ्या लेखन शैलीने तयार केला. त्यांच्या पुस्तकांना आजही जगभरातून मागणी आहे.

'अक्षरधारा बुक गॅलरी'तर्फे २०११ साली पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात कुंटे यांची मुलाखत झाली होती; तिला इतकी गर्दी झाली होती की, काही प्रेक्षक टिळक रस्त्यावर थांबून होते.

त्यांची पाचही पुस्तके पुण्याच्या ’प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत.

जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • कालिंदी
  • धुनी (अध्यात्म व साधना या विषयावर)
  • नर्मदेऽऽ हर हर (नर्मदा परिक्रमेतील अनुभवांवर आधारित)
  • नित्य निरंजन (हिमालयातील साधनेवर आधारित)
  • साधनामस्त (नर्मदा परिक्रमेतील अनुभवांवर आधारित)
  • प्रकाशपुत्र