Jump to content

जगदीश नानावटी

जगदीश नाणावटी (लेखनभेद: जगदीश नानावटी)(जन्म: इ.स. १९२८;मृत्यू: २९-६-२०११) हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील गिर्यारोहक होते. इ.स. १९५५ पासून ते गिर्यारोहण क्षेत्रात काम करत होते. एखादे शिखर सर केले की, नाही हे ठरविण्याची शास्त्रशुद्ध पद्धत त्यांनी भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात विकसत केली होती.[]

इ.स. १९५५ मध्ये नानावटींनी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले. नानावटींची गिर्यारोहण कारकीर्द सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रात गिर्यारोहणाचा मागमूसही नव्हता. डोंगर भटकणे येथे नवीन नव्हते पण क्रीडाप्रकार म्हणून त्याला मान्यता नव्हती. इ.स. १९५५ मधे कसौरीपास ट्रेक, इ.स. १९६१ मधे निलगिरी पर्वत मोहीम, इ.स. १९७० मधे बथर टोली मोहीम ते अगदी इ.स. १९९२च्या पंचचुली व्हॅली अशी त्यांची भ्रमंती सुरू होती. इ.स. १९६१ मधली त्यांची निलगिरी पर्वत मोहीम आजच्या तुलेनेने ही मोहीम कदाचित छोटी आणि साधी वाटू शकेल पण त्याकाळात नकाशांची व साधनांची कमतरता असतानाही त्यांनी ही मोहीम यशस्वी केली.

मोठ्या हिमालयन मोहिमा करण्यापेक्षा त्यांचा सारा भर गिर्यारोहणाचा प्रसार व प्रचार करण्यावर होता. आपल्याला मिळालेले ज्ञान सर्वत्र पोहोचावे, यासाठी इ.स. १९६० मधे त्यांनी हिमालयन क्लबच्या सदस्यांसोबत मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यात, मुंब्रा प्रस्तर परिसरात गिर्यारोहणाचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले. दार्जिलिंगहून यासाठी नवांग गोंबू आंग कामी यासारखे शेर्पा प्रशिक्षक बोलावण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात गिर्यारोहणाचे दर्जेदार प्रशिक्षण मिळू लागले.

यापूर्वी एखाद्या गिर्यारोहकाने एखादे विवक्षित शिखर सर केले की, नाही हे फक्त त्याने सांगितलेल्या माहितीवर आणि छायाचित्रांवरच अवलंबून असायचे. पण नकाशे, परिसराची माहिती, शिखरावरून दिसणारी डोंगररांग अशा विविध मुद्द्यांचा तौलनिक अभ्यास केला तर एक गणित मांडता येते आणि शिखर सर झाले की, नाही हे ठामपणे सिद्ध करता येते, हे सांगणारे पहिले गिर्यारोहक जगदीश नानावटी होते.

इ.स. १९६५ मध्ये नीलकंठ शिखर सेनादलाच्या चमूने सर केले आणि त्याच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. तेव्हा पट्टीचे गिर्यारोहक असलेल्या नानावटी यांनी सर्व तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास केला, प्रत्यक्षात शिखर परिसरात प्रचंड भटकंती केली, आणि नीलकंठ शिखर सर झालेलेच नाही हे सिद्ध केले. हे पटवून देण्यासाठी ते अगदी पार सरकारशीही लढले. नानावटी यांनी नेगी, कांगसांग, मात्री कोकथांग अशा मोहिमांचेही परीक्षण करून त्यांतील फोलपणा उघडकीस आणला.

नानावटी यांनी वापरलेली ही शास्त्रीय पद्धत आज सर्वत्र वापरली जाते. अर्थात भारतीयांना त्यावेळेस ती शास्त्रीय पद्धत फारशी रुचणारी नव्हती. पण या पद्धतीची दखल ‘लंडन अल्पाइन क्लब’ने घेतली. त्यांच्या जर्नलमध्ये नीलकंठ आरोहणावर परखड भाष्य करणारा लेख प्रसिद्ध झाला, व आणि जगदीश नानावटींच्या त्या कर्तृत्वावर जागतिक शिक्कामोर्तब झाले. लंडन अल्पाइन क्लबने त्यांना सदस्यत्व बहाल केले आणि ‘माऊंटेनिअरिंग क्लेम्स व्हेरिफिकेशन’ या जागतिक समितीवर त्यांना पाचारण केले. नंतर इंडिअन माऊंटेनिअरिंग फाउंडेशननेही अशाच प्रकारची कमिटी स्थापन केली, आणि त्यावर सल्लागार म्हणून नानावटींना नेमले.

जगभरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हिमालयन क्लबचे कार्यालय मुंबईत स्थलांतरित झाले, तेव्हापासून म्हणजे इ.स. १९७० पासून २१ वर्षे ते संस्थेचे सचिव आणि नंतर आठ वर्ष अध्यक्ष होते. गिर्यारोहणाबरोबरच ते विविध सामाजिक संस्थांचे सक्रिय सभासद होते. नानावटी हॉस्पिटल ट्रस्ट, नानावटी एज्युकेशन ट्रस्ट, कोरा केंद्र, खादी भवन आदी ठिकाणी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संग्रहित प्रत". 2011-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-06 रोजी पाहिले.