छायानाट्य
छायानाट्य अर्धपारदर्शक कापडी अगर कागदी पडद्याच्या मागील बाजूस प्रखर प्रकाशझोत टाकून त्यावर कळसूत्री बाहुल्यांच्या छायांद्वारा सादर करण्यात येणारा एक खेळ.
कळसूत्री बाहुल्यांप्रमाणेच (कळसूत्री बाहुल्यांचा खेळ) हा प्रकार प्राचीन आहे. त्यात प्रेक्षकांच्या समोर एक स्वच्छ पांढरा पडदा ताणून लावतात आणि त्याच्या मागून हलत्या चित्रांच्या सावल्यांतून एखादा कथाभाग गुंफला जातो. या छायानाट्यातील चित्रे एकसंध नसून अनेक तुकड्यांनी बनविलेली असतात. त्यामुळे प्रकाशापासून कमीअधिक अंतरावर मागेपुढे होणाऱ्या या आकृतींच्या सावल्या दृश्य परिणामात भर टाकतात. त्याशिवाय छायानाट्यात आवाजाची साथ असल्यामुळे तलवार-युद्ध प्रसंग, हत्तीची शिकार, कुस्ती यांसारखे प्रसंग चांगले रंगतात. काही पाश्चिमात्य देशांतून पुठ्ठ्यांच्या छायाबाहुल्या बनवीत परंतु टिकाऊपणाच्या दृष्टीने पत्रा किंवा चामडे यांचा उपयोग केला जातो. तसेच पडद्यासाठी कापडाऐवजी अर्धपारदर्शक कागद, तैलदीपांऐवजी विद्युत् दीप किंवा चित्रदीप (मॅजिक लँटर्न) आणि बांबूऐवजी लोखंडी सळ्या यांचा उपयोग करतात.
सुरुवात
छायानाट्याची खरी सुरुवात प्रथम भारतातच झाली, असे म्हणले जाते. भारतामध्ये ख्रि. पू. दुसऱ्या शतकात छायानाट्याचे प्रयोग होत असल्याचा उल्लेख सापडतो. महाभारत, थेरीगाथा, अशोकाचे चौथे शिलाशासन इत्यादींतून त्याचे निर्देश आढळतात. महाभारतामध्ये छायानाट्याला ‘रूपोपजीवन’ असे संबोधले आहे. दूतांगद हे सर्वांत जुने छायानाट्य होय. त्याचा कर्ता सुभट असून अंगदशिष्टाई हा त्या छायानाट्याचा विषय आहे. मध्ययुगीन संतांच्या वाङ्मयातही ईश्वर व सृष्टी यांवर छायानाट्याचे रूपक केलेले आढळते. आजही आंध्र, मलबार, तमिळनाडू, ओरिसा वगैरे प्रदेशांतून छायानाट्याच्या खेळाची परंपरा टिकून आहे. छायानाट्याला प्रदेशपरत्वे निरनिराळी नावे आहेत. उदा., ओरिसामध्ये ‘रावणछाया’, कर्नाटक व तमिळनाडूमध्ये ‘पवाकुत्तू’ किंवा ‘चक्ल गोंबाई अट्ट’ व आंध्रमध्ये ‘थोलू बोमलट्ट’ इत्यादी. छायानाट्याचे विषय मात्र सर्वत्र रामायण–महाभारत अथवा शिवजन्मोत्सव हेच असतात.
तयारी
छायानाट्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या बाहुल्या बहुधा गाय, म्हैस, शेळी, हरिण इ. जनावरांच्या कातड्यांपासून करण्याची पूर्वापार प्रथा आहे. हरणाच्या कातड्याच्या बाहुल्या पवित्र मानतात. बाहुल्यांची उंची सर्वसाधारणतः सु. ०·७६ मी. असते. आंध्र प्रदेशातील बाहुल्या मात्र कथानकातील पात्रांनुसार लहानात लहान ३५·५६ सेंमी. पासून मोठ्यात मोठ्या सु. १·५२ मी.पर्यंतही असतात. विशेषतः देव किंवा नायकनायिकांच्या बाहुल्या मोठ्या व इतर पात्रांच्या छोट्या असतात. आंध्र प्रदेशातील या बाहुल्या जगातील सर्वांत मोठ्या आकाराच्या छायाबाहुल्या आहेत. कधी कधी या बाहुल्यांत पेंढा भरतात तर कधी त्याऐवजी कातड्याचे तीन पदर वापरून त्यांना अनुरूप आकार देतात. नंतर त्यांना भोके पाडतात व अनुरूप रंगांनी त्यांची रंगभूषा व वेशभूषा करतात. जुन्या काळी स्त्रीपात्रे पिवळा, नारिंगी, तपकिरी इ. रंगांच्या एकजीव मिश्रणाने रंगवीत असत. पुरुषपात्रे, विशेषतः राम-कृष्ण, गडद निळ्या रंगाने रंगवीत. सीतेच्या बाहुलीसाठी कोठे कोठे सोनेरी रंगछटेचा उपयोग करतात. आंध्र प्रदेशातील बाहुल्या पारदर्शक व विविध रंगांचा सुमेळ साधलेल्या असतात. या छायाबाहुल्या खांदे, कोपर, गुडघा व कंबर या ठिकाणी गाठी मारलेल्या दोऱ्या जोडून सांधलेल्या असतात. त्यामुळे त्यांची हालचाल सुलभपणे करता येते. बाहुलीच्या मध्यभागी डोक्यापासून खालपर्यंत लांब व जिचा थोडासा भाग बाहेर आलेला आहे, अशी पातळ पट्टी जोडतात. ती बांबूची किंवा ताडपत्राच्या कण्याची असते. नर्तकी म्हणून असलेल्या बाहुल्यांची सांधेजोड थोडी वेगळ्या प्रकारची असून त्यांना पायघोळ झगे घातलेले असतात. त्यांची हालचालही दोन सूत्रधारांकडून करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या नृत्यातून अभिजात नृत्यांच्या हालचाली दाखविणे शक्य होते.