चैत्र
चैत्र हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला (गुढी पाडव्याला) सुरू होतो. पौर्णिमान्त पंचांगात हा १५ दिवस आधीच सुरू होतो. भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाची) २१ मार्च ही त्या महिन्याची पहिली तारीख असते.
चैत्र महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च आणि एप्रिल महिन्यांत येतो.
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर काही दिवसांनी संपतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.
पौर्णिमान्त पंचांगानुसार फाल्गुन महिन्यानंतर चैत्रातला कृष्ण पक्ष येत असला, तरी त्या महिन्यात नववर्ष सुरू होत नाही. त्यांचे नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशीच सुरू होते.
जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो. त्यादिवशी शकाचा अनुक्रमांक एकाने वाढतो. पौर्णिमान्त आणि अमावास्यान्त्य ह्या दोन्ही प्रकारांत अधिक मासाचे दोन्ही पक्ष एकाच कालावधीत येतात. मात्र, चैत्र महिना हा अधिक मास असण्याचे प्रसंग फार थोडे आहेत. उदा० इसवी सनाच्या १९०१ सालापासून ते २०५० सालापर्यंत सन १९४५, १९६४ आणि २०२९ ह्या तीनच वर्षी अधिक चैत्र होता.. गुढी पाडवा, उगादी आदी सण निज चैत्राच्या पहिल्या दिवशी असतात, अधिक महिन्यात सण नसतात.
चैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या
- चैत्र शुद्ध प्रतिपदा
- गुढीपाडवा
- चेटी चांद (चैत्री चंद्र)
- चैत्र नवरात्रारंभ
- कृष्णाजी महाराज यात्रा, सावंगा (अमरावती)
- गौतम ऋषी जयंती
- भगवान झुलेलाल जयंती
- दादा ठणठणपाळ आनंद महोत्सव
- निंबादेवीची यात्रा, निंबोळा (बुलढाणा)
- बाबाजी महाराज पुण्यतिथी, लोधीखेडा (छिंदवाडा)
- महालक्ष्मी पालखी यात्रा (मुंबई)
- माधवनाथ महाराज जन्मोत्सव, चित्रकूट-इंदूर
- छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी
- सीतारामबाबा उंडेगावकर जन्मोत्सव, उंडेगाव-परांडा (उस्मानाबाद)
- डाॅ. हेडगेवार जयंती
- चैत्र शुद्ध द्वितीया
- अक्कलकोट महाराज प्रकट दिन
- सिंधारा दोज
- हरिहर महाराज (त्याडी) पुण्यतिथी, अमरावती
- चैत्र शुद्ध तृतीया-(गण)गौरी तृतीया; मत्स्य जयंती; सौभाग्यसुंदरी व्रत;
- चैत्र शुद्ध चतुर्थी :
- गुरू अनंगदेव पुण्यतिथी
- गोमाजी महाराज यात्रा, नागझरी-बुलढाणा जिल्हा
- चैत्र शुद्ध पंचमी
- गुहराज निषाद जयंती
- गुरू गोविंदसिंग पुण्यतिथी
- जगदंबा यात्रा, आष्टा (नांदेड)
- जगदंबा यात्रा, गोडेगाव (श्रीरामपूर)
- पहाडसिंग महाराज पुण्यतिथी, खामगाव (बुलढाणा)
- पहाडसिंग महाराज पुण्यतिथी, पारखेड (बुलढाणा)
- पुंडलिकबाबा जयंती, मूर्तिजापूर (अकोला)
- मीना अवतार (मीना समाज)
- राम राज्योत्सव
- श्री पंचमी
- श्री लक्ष्मी पंचमी
- सटरफटर महाराज पुण्यतिथी, धालेवाडी, पुरंदर (पुणे)
- चैत्र शुद्ध अष्टमी
- सम्राट अशोक जयंती
- अशोकाष्टमी
- साईबाबा महोत्सव प्रारंभ (शिर्डी)
- चैत्र शुद्ध नवमी
- अवधिया दिवस
- चैत्री नवरात्र समाप्ती
- राम नवमी
- स्वामिनारायण जयंती
- चैत्र शुद्ध दशमी
- जवारे विसर्जन
- शिर्डी साईबाबा उत्सव समाप्ती
- चैत्र शुद्ध एकादशी
- कामदा एकादशी
- चैत्री यात्रा (पंढरपूर)
- भाऊ महाराज साल्पेकर पुण्यतिथी (नागपूर)
- शंभूमहादेव यात्रा (शिखर शिंगणापूर)
- साधू महाराज पुण्यतिथी, उमरखेड (पुसद)
- चैत्र शुद्ध द्वादशी
- मदन द्वादशी
- चैत्र शुद्ध त्रयोदशी
- अनंग त्रयोदशी
- आसरादेवी यात्रा, दोनद खुर्द (अकोला)
- महावीर जयंती
- चैत्र शुद्ध चतुर्दशी
- दानक चतुर्दशी
- चैत्र पौर्णिमा
- व्रत पौर्णिमा
- शिरकाईदेवी यात्रा (शिरकोली, पुणे जिल्हा). कोल्हापूर जिल्ह्यातील तारदळ गावी शिरकाई देवीची यात्रा माघ महिन्यातल्या वद्य चतुर्दशीला असते.
- हनुमान जयंती
- हाटकेश्वर जयंती
- चैत्र वद्य द्वितीया
- आसों दोज
- खरमास समाप्ती
- श्रीधरस्वामी पुण्यतिथी
- चैत्र वद्य तृतीया
- विशू
- चैत्र वद्य पंचमी
- गुरू तेगबहादुर जयंती
- वैशाख वद्य सप्तमी
- गुरू अर्जुनदेव जयंती
- चैत्र वद्य एकादशी
- वरुथिनी एकादशी
- चैत्र वद्य द्वादशी
- सेन जयंती (सेन समाज)
- चैत्र अमावास्या
- सतुवाई अमावास्या
चैत्र महिन्यातली विशिष्ट व्रते
अजादान
अजा= शेळी. चैत्र मासी कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस नक्त (पाणी न वापरता शिजवलेले अन्न) भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. भोजनापूर्वी चंदनाने पार्वतीची दशभुज प्रतिमा रेखतात. ज्वालामुखी या नावाने तिची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी पाच दुधाळ शेळ्या ब्राह्मणास दान देतात. दानाचे फल-मोक्ष.
आनंदव्रत
या व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते. व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पान्ती राजपद.
तिथिपूजन
प्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथिस्वामीची पूजा करून हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे- प्रातःस्नान उरकून वेदीवर अथवा चौरंगावर लाल वस्त्र पसरून त्यावर अक्षतांचे अष्टदल काढतात. ज्या दिवशी जी तिथी असेल त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्या मध्यभागी स्थापन स्थापन करून तिची पूजा करतात.
निरनिराळ्या तिथींचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत :
प्रतिपदा-अग्निदेव; द्वितीया-ब्रह्मा; तृतीया-गौरी; चतुर्थी-गणेश; पंचमी-सर्प; षष्ठी-कार्तिकस्वामी; सप्तमी-सूर्य; अष्टमी-शिव (भैरव); नवमी-दुर्गा; दशमी-अन्तक (यमराज); एकादशी-विश्वेदेवा; द्वादशी-हरी (विष्ष्णू); त्रयोदशी-कामदेव; चतुर्दशी-शिव; पौर्णिमा-चंद्र; अमावस्या-पितर. या तिथिस्वामींचे पूजन त्या त्या तिथीला करतात, म्हणजे हर्ष, उत्साह आणि आरोग्य यांची अभिवृद्धी होते, अशी मान्यता आहे.
चैत्रगीते
चैत्र हा कवींचा आवडता महिना आहे. चैत्रावर अनेक कवींनी कविता/गीते लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :
- नटली चैत्राची नवलाई (चित्रपटगीत, चित्रपट : पहिली मंगळागौर (१९४२); कवी : बाबुराव गोखले; अभिनेत्री आणि गायिका : लता मंगेशकर, स्नेहप्रभा प्रधान; संगीत : दादा चांदेकर)
- भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे | वसंत वनात जनात हसे, सृष्टीदेवी जणु नाचे उल्हासे | गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट (चित्रगीत, चित्रपट : कुंकू; कवी : शांताराम आठवले; गायिका : वासंती; संगीत : केशवराव भोळे; राग : देस)
हिंदू पंचांगानुसार बारा महिने | |
← चैत्र महिना → | |
शुद्ध पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा |
कृष्ण पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या |
भारतीय महिने |
---|
चैत्र · वैशाख · ज्येष्ठ · आषाढ · श्रावण · भाद्रपद · आश्विन · कार्तिक · मार्गशीर्ष · पौष · माघ · फाल्गुन |