Jump to content

चेतापेशी

प्राण्यांच्या चेतासंस्थेतील पेशी. या विद्युत स्वरूपात माहिती साठवून ठेवतात, ती इकडून तिकडे पाठवतात व माहितीवर प्रक्रियासुद्धा करतात.

एका सर्वसाधारण चेतापेशीचे तीन अवयव असतात मुख्य शरीर (सोमा),चेतातंतू आणि चेताक्ष. चेतापेशीचा विकास होत असतानाच्या अवस्थेमध्ये चेतातंतू आणि चेताक्ष, हे वेगवेगळे दाखवता येत नाहीत त्या अवस्थेमध्ये त्यांना एकत्रितपणे "चेतागर्भ" असे म्हणतात. चेतातंतू हे नावाप्रमाणेच तंतूमय असतात आणि ते चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेले असतात. त्यांची लांबी शेकडो मायक्रोमिटर एवढी असू शकते. चेतातंतू हे एकसलग नसतात, त्यांचे अनेक ठिकाणी विभाजन झालेले असते, अशा विभाजनामुळे त्यांचा आकार एखाद्या वृक्षासारखा दिसतो. चेताक्ष हा चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेला दंडगोलाकार भाग असतो. मुख्य शरीर आणि चेताक्षाच्या जोडणीच्या जागेला चेताधार म्हणतात. चेताक्षाची लांबी मनुष्यामध्ये जास्तीत-जास्त १ मीटर एवढी असू शकते (इतर काही प्राण्यांमध्ये याहीपेक्षा लांब चेताक्ष सापडतात). चेतापेशीच्या मुख्य शरीराला अनेक चेतातंतू जोडलेले असतात, परंतु चेताक्ष एकच असतो. अर्थात या एकाच चेताक्षाच्या शेकडो शाखा असू शकतात. एका चेतापेशीच्या दुसरीशी असलेल्या विद्युत जोडणीला "चेतन बिंदू" असे म्हणतात. चेतापेशींमधील संदेशवहन चेतन बिंदू मार्फत होते, सहसा एका चेतापेशीच्या चेताक्षातून दुसरीच्या चेतातंतू मध्ये हे संदेश पाठवले जातात. अर्थात या नियमाला काही अपवाद आहेत, उदाहरणार्थ काही चेतापेशींमध्ये चेतातंतू नसतात तसेच काहींमध्ये चेताक्ष नसतो, अशा परिस्थिती मध्ये "चेताक्ष ते चेताक्ष" किंवा "चेतातंतू ते चेतातंतू" अशी जोडणी असू शकते.

चेतापेशी