Jump to content

चिनुआ अचेबे

चिनुआ अचेबे (१६ नोव्हेंबर १९३० – २१ मार्च २०१३). नायजेरियन कादंबरीकार, कवी, प्राध्यापक आणि समालोचक. संपूर्ण नाव अल्बर्ट चिन्युलुमोगू अचेबे. अचेबे याचे लहानपण नायजेरियातील ओगीदी इग्बो (इबो) शहरात गेले. युनिव्हर्सिटी कॉलेज (आताचे इबादान युनिव्हर्सिटी) येथे इंग्रजी साहित्याचा अभ्यास केल्यावर अचेबे यांनी लागोसमधील नायजेरियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या  स्टाफमध्ये जाण्यापूर्वी थोड्या काळासाठी अध्यापन केले. तेथे त्यांनी १९६१-१९६६ मध्ये बाह्य प्रसारण संचालक म्हणून काम पाहिले. अचेबे यांनी सहकारी लेखक गॅब्रिएल ओकारा आणि सायप्रियन एकवेन्सी यांच्यासमवेत विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली. नायजेरियात परत आल्यावर त्यांची नायजेरिया विद्यापीठात संशोधक सहकारी म्हणून नियुक्ती झाली आणि १९७६ पासून ते १९८१ पर्यंत

त्यांनी नी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. अचेबे याना आफ्रिकन रायटरर्स सिरीजचे संपादक म्हणून १९७२ पर्यत काम पाहिले. आफ्रिकेतील उत्तरवसाहतवादी (पोस्ट कोलोनियल) साहित्य जगात प्रसिद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य या सिरीजमुळे झाले. १९९० मध्ये नायजेरियात झालेल्या एका अपघातानंतर अर्धांगवायू झाला म्हणून अचेबे अमेरिकेला गेला आणि तिथेच त्याने बार्ड कॉलेजमध्ये शिक्षण दिले. १९९० पासून तो हेनेमॅन एज्युकेशनल बुक्स लि. आणि नावानकॉ-इफेजिका लिमिटेड या दोन नायजेरियन प्रकाशकांचे संचालक (१९७० पासून) होता.

अचेबे यांची साहित्य संपदा : कादंबरी – थिंग्ज फॉल अपार्ट (१९५८,Things Fall Apart), नो लॉन्गर ईज (१९६०, No Longer at Ease),अ‍ॅरो ऑफ गॉड  (१९६४, Arrow of God), द मॅन ऑफ द पीपल (१९६६, A Man of the People),अ‍ॅन्थल्स ऑफ सवाना  (१९८७, Anthills of the Savannah ). अ‍ॅचेबेने लघुकथा आणि बाल साहित्याचे अनेक संग्रह प्रकाशित केले, ज्यात Leopard Got His Claws लोपर्ड गॉट हिज क्लॉज (१९७३, जॉन इरोआगनाची यांच्यासमवेत) यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरेल. सोल-ब्रदर (१९७१) आणि ख्रिसमस इन बियाफ्रा (१९७३) हे काव्यसंग्रह आहेत. अनादर आफ्रिका (१९९८), मॉर्निंग इट ऑन ऑन क्रिएशन डे, होप्स अँड इंपिडिमेन्ट्स, होम अँड एक्झाइल, द एजुकेशन ऑफ ब्रिटिश-प्रोटेक्टेड चाईल्ड (२००९) आणि आत्मकथात्मक असलेले देअर वाज अ कंट्री : अ पर्सनल हिस्ट्री ऑफ बियाफ्रा ही त्याची इतर महत्वाची पुस्तके आहेत.

थिंग्ज फॉल अपार्ट ही त्यांची पहिली कादंबरी. ही आफ्रिकन साहित्यातील सर्वांत वाचली जाणारी कादंबरी आहे. स्वभूमीमध्ये मिशनरी सरकार स्थापन केले जात आहे आणि त्याद्वारा तेथील परंपरा आणि लोकजीवन यांना विस्थापित केले जात आहे हा परात्म भाव या कादंबरीत मांडला आहे. नो लॉन्गर ईज या कादंबरीत नागरी सेवकाचे जीवन चित्रित केले आहे. अ‍ॅरो ऑफ गॉडमध्ये ब्रिटिश प्रशासनाच्या अंतर्गत खेड्यात घडत अ‍सलेल्या धार्मिक बदलाचे आणि लादलेल्या श्वेतवर्णिय परंपरांचे चित्रण आहे. नायजेरियन कादंबरीकारांनी पारंपारिक आफ्रिकन समाज यावर लादली गेलेली पाश्चात्य प्रथा आणि मूल्ये, सामाजिक व मानसिक विकृतीचे अनिर्बंध चित्रण केले आहे. श्वेतवर्णीय माणसाशी आलेल्या आफ्रिकेच्या पहिल्या संपर्कापासून ते आताच्या सुशिक्षित आफ्रिकन माणसाचा जीवन प्रत्यय हा आयाम ते त्यांच्या कादंबऱ्यात मांडतात. अचेबे यांच्या कादंबऱ्यांतून या आयामांचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. अ‍ॅन्थल्स ऑफ सवाना या कादंबरीत अचेबे यांनी भ्रष्टाचार आणि उत्तर वसाहतवादी आफ्रिकन जीवनातील इतर सामाजिक आणि राजकीय बाबींबद्दल भाष्य केले.

नायजेरियन नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड (१९७९), सेंट लुईस साहित्य पुरस्कार, डोरोथी आणि लिलियन गिश पुरस्कार (२०१०),  मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२००७) या महत्त्वाच्या पुरस्कारासोबत त्यांना राष्ट्रकूल कविता पुरस्कार, अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्स (1982) ची मानद फेलोशिप, अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (२००२) चा परदेशी मानद सदस्य, जर्मन बुक ट्रेडचा शांतता पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीमध्ये सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाली होती.

अचेबे यांना आधुनिक आफ्रिकन लेखनाचे जनक आणि आफ्रिकेचा महान कथाकार म्हणले गेले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी अल्प आजाराने त्यांचे निधन झाले.