Jump to content

चिंतामणी केतकर

भाऊसाहेब केतकर
मूळ नावचिंतामणी केतकर
जन्मसन १८४७
निर्वाणसन १९३९
संप्रदायसमर्थ संप्रदाय
गुरूगोंदवलेकर महाराज
भाषामराठी
संबंधित तीर्थक्षेत्रेगोंदवले
व्यवसायइंजिनिअरिंग खात्यात अधिकारी
अपत्येतात्यासाहेब केतकर

भाऊसाहेब केतकर : (चिंतामणी केतकर) ( सन १८४७ - निधन: सन १९३९)
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रेष्ठ शिष्य. तात्यासाहेब केतकर यांचे वडील. प्रपंचात राहूनही गुरूची पूर्ण कृपा संपादन करणारा शिष्योत्तम.


भाऊसाहेब केतकर यांना गोंदवलेकर महाराजांची प्रथम भेट वयाच्या पंचविसाव्या वर्षी गोंदवल्यासच झाली. भाऊसाहेबांची बदली सन १८८० ते सन १८९० च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात इंजिनिअर खात्यात झाली होती. पगार वाटण्यासाठी त्यांना दर महिना म्हसवडला जावे लागे. त्यावेळी ते रात्रीचे मुक्कामास गोंदवल्यास उतरत असत. असेच एकदा ते धर्मशाळेत उतरलेले असताना महाराजांनी त्यांची भेट घेतली.

यानंतर भाऊसाहेब केतकरांना गोंदवलेकर महाराजांची भेट पंचवीस वर्षांनतर एप्रिल १९०१ मध्ये झाली. श्रीब्रह्मानंदमहाराज यांच्या विनंतीवरून गोंदवलेकर हे बेलधडी (कर्नाटक) येथील श्रीराममंदिरात रामनवमीच्या उत्सवासाठी येणार होते. श्रीब्रह्मानंद यांची तपश्चर्या, गुरूनिष्ठा यांमुळे कर्नाटकात त्यांच्याविषयी फार आदर होता. ब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार होणार म्हणून मोठमोठे सरकारी अधिकारी, वकील, डॉक्टर त्यांच्या दर्शनासाठी गदग रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यांत भाऊसाहेबही होते. भाऊसाहेबांनी गोंदवलेकर महाराजांना ओळखले नाही. परंतु महाराजांनीच त्यांना पूर्वीच्या भेटीची आठवण करून दिली. रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर महाराज व त्यांची शिष्यमंडळी काही दिवस गदग येथील भाऊसाहेबांच्या बंगल्यावर मुक्कामी होती.

भाऊसाहेबांचे चिरंजीव तात्यासाहेब केतकर यांचा विवाह गोंदवल्यासच महाराजांच्या उपस्थितीत झाला (मार्च १९०४). सप्टेंबर १९०४ मध्ये भाऊसाहेबांनी पेन्शन घेतली व महाराजांच्या सहवासासाठी ते सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. भाऊसाहेबांचा स्वभाव अत्यंत सौम्य होता. गोंदवलेकर महाराजांचे वचन त्यांच्यासाठी वेदवाक्य होते. महाराजांच्या निर्वाणानंतर भाऊसाहेब गोंदवल्यास बारा वर्षे राहिले, व सन १९३९ मध्ये वृद्धापकाळाने निधन पावले.