चिंचणी
चिंचणी | |
जिल्हा | पालघर |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | १३४३५ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२५२८ |
टपाल संकेतांक | ४०१ ५०३ |
चिंचणी हे महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील एक प्रमुख गाव आहे.
भौगोलिक स्थान
चिंचणी हे १९.८७° उत्तर अक्षांश आणि ७२.७°पूर्व रेखांशावर अरबी समुद्राच्या किनारी वसले आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ९ मीटर (२९ फूट) इतकी आहे. चिंचणी हे रस्त्याने आजूबाजूच्या गावांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. हे परिसरातील महत्त्वाचे शैक्षणिक आणि आर्थिक केंद्र आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुंदर नैसर्गिक अन् प्रदूषणापासून दूर राहिलेला समुद्रकिनारा या गावाला लाभला आहे. मराठा साम्राज्याचा इतिहासाचा दाखला देणारे स्थळ.
लोकजीवन
२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, चिंचणीची लोकसंख्या १३४३५ इतकी आहे. पुरुषांचे प्रमाण ५१% तर स्त्रियांचे प्रमाण ४९% आहे. चिंचणीतील सरासरी साक्षरता प्रमाण ७९% असून ते देशाच्या सरासरी (५९.५%) प्रमाणापेक्षा जास्त आहे.ज्वेलरी डायमेकींग हा शतकापेक्षा जुना असलेला गृहउद्योग इथे पिढ्यानपिढ्या चालू आहे.हा भारत देशाबरोबरच दुबई, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशातील सोने व्यापाऱ्यांचे मुख्य आकर्षण आहे. सोन्याच्या दागिन्यांवर आकर्षक आणि नाजूक नक्षीकाम करण्याचे कसब लाभलेले असे शेकडो डायमेकर्स आजुबाजूच्या परिसरात आहेत.
स्थानिक संस्कृती
भारतीय कालमानानुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठिकठिकाणी यात्रांना प्रारंभ होतो. ह्या गावात गुढीपाडव्याच्या दिवशी येथील गावदेवी मंदिरात यात्रेला प्रारंभ होतो. ही यात्रा तीन दिवस चालते.[१]
गावदेवी मंदिर
या मंदिरात दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवसापासून तीन दिवस गावजत्रा भरत असते.हे मंदिर समुद्रकिनारी स्थित आहे. हे मांगेला समाजाचे श्रद्धास्थान आहे. ह्या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरण झालेले आहे. मंदिराच्या सभागृहाचे उद् घाटन येथील एकशे तीन वर्षे वयाचे निवृत्त शिक्षक श्री. भास्कर हरी वझे ह्यांच्या हस्ते संपन्न झाले. ह्या मंदिराच्या जत्रेला भक्तगणांची भरपूर गर्दी होते. मुंबई ते गुजरात मधील हजारो भाविक यात्रेला येतात. ही डहाणू तालुक्यातील पहिली जत्रा आहे. स्थानिक लोक ह्या जत्रेच्या माध्यमातून आपला शेतमाल,खाद्यपदार्थ, करमणुकीचे साहित्य विकत असतात त्यामुळे रोजगार उपलब्ध होतो.[२]
दशावतारी उत्सव
ह्या गावात दरवर्षी दशावतारी उत्सव साजरा केला जातो.उत्सवात दैवी आणि राक्षसी मुखवटे नाचवतात. मुखवटे नाचवणे म्हणजे सोंगे घेणे असते.गणपती बाप्पा, शंखासूर-मत्स्यावतार, भीम-बकासूर, हनुमान-त्राटिका, गजासूर-श्रीशंकर, दक्ष-वीरभद्र,मणिमल्ल-खंडेराय, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशी सोंगे वाजंत्रीच्या तालावर नाचतात.भवानी मातेची मिरवणूक झाल्यावर दशावतारी उत्सवाची समाप्ती होते. ह्या उत्सवाला दीडशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. हा उत्सव श्री जय भवानी दशावतारी उत्सव मंडळ, चिंचणी साजरा करीत असते. दशावतारी उत्सवाला येथील लोक बोहाडा उत्सव म्हणतात.[३]
बाह्य दुवे
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, शुक्रवार २४ मार्च २०२३
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, शुक्रवार दिनांक २४ मार्च २०२३
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी,शुक्रवार दिनांक १२ मे २०२३