चिं.गं. भानू
प्रा. चिंतामण गंगाधर भानू (२४ जुलै, इ.स. १८५६:मेणवली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - ३० डिसेंबर, इ.स. १९२९:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक, भाषांतरकार, चरित्रलेखक, कादंबरीकार, कीर्तनकार आणि वक्ते होते. त्यांचा जन्म नाना फडणीस ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला.
शिक्षण आणि नोकरी
चिं.गं. भानू यांनी पुणे येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात काही वर्षे ओव्हरसियरची नोकरी केली. पुढे स्वकष्टाने ते एम.ए. झाले. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सुरुवातीपासून आजीव सदस्य होते. इ.स. १९१८पासून भानू फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ’तत्त्वज्ञानमंदिर’ नावाचे नियतकालिक सुरू केले.(इ.स. १९१९). चिंतामणराव भानूंचा महाराष्ट्र नाटक मंडळीशी घनिष्ट संबंध होता. अनेक नटांना त्यांनी अभिनयाचे, नाट्यतंत्राचे शिक्षण दिले. नटाचे काम मनोरंजन करणे आहे, शिकवणे हा मुख्य उद्देश नसला तरी नटाचे वर्तन नीतीला साजेसे असावे असे मत ते मांडीत.
चिं.गं. भानूंनी लिहिलेली पुस्तके
- भगवद्गीता (१९०९, १९१०, १९२५), ईश-कठ-केन आदी उपनिषदे आणि बादरायणप्रणीत चतुःसूत्री या तत्त्वज्ञानपर ग्रंथांची मराठी भाषांतरे (१९१२). ही भाषांतरे गुरू-शिष्य संवाद पद्धतीने लिहिली असून दृष्टांतादी अलंकारांच्या साहाय्याने कठीण विषय सोपा करून सांगितला आहे.
- ईशावास्योपनिषद (द्वैत-अद्वैत भाष्याच्या भाषांतरासह - १९११)
- उपनिषदांचे भाषांतर करताना त्या ग्रंथांवरील शांकरभाष्याचे सुलभ मराठीत विवरण
- ऐतरेय व त्तैत्तरीय उपनिषद ((१९१४)
- स्वतः शांकरमतवादी असताना या ग्रंथांच्या प्रस्तावना/उपसंहारांत रामानुज, मध्व, वल्लभ इत्यादी आचार्यांच्या मतांचा, ज्ञानेश्वर, वामनपंडित या टीकाकारांच्या मतांचा आणि आधुनिक ग्रीक-युरोपियन मतांचा परामर्श घेतला आहे.
- डेमॉस्थेनिस -चरित्र (१८९१)
- नाट्यशास्त्र (भरतमुनीच्या संस्कृत नाट्यशास्त्राचे मराठी भाषांतर, १९१७)
- नाना आणि महादजी यांची तुलना (’केसरी’मध्ये प्रकाशित झालेली लेखमालिका-इ.स. १८९५)
- नाना फडणीस यांचे अल्पचरित्र (१८९०)
- नीतिमीमांसा अथवा नीतिशास्त्राची मूलतत्त्वे (रसाळ मराठीत रूपांतरित-१८९१, मूळ इंग्रजी लेखक हर्बर्ट स्पेन्सर)
- नीतिमीमांसा अथवा न्यायतत्त्वे (रसाळ मराठीत रूपांतरित-१८९२, मूळ इंग्रजी लेखक हर्बर्ट स्पेन्सर)
- मराठ्यांच्या इतिहासातील काही गोष्टी (१८९७)
- मांडुक्योपनिषद (१९१२, १९१३)
- मुंडकोपनिषद (१९१३, १९१३)
- मुद्गलपुराण (१९१५)
- रिचर्ड कॉब्डेन -चरित्र (१८९०)
- शृंगेरीची लक्ष्मी (कादंबरी, १९२४)
- हंबीरराव (इंग्रजीवरून अनुवादित केलेली कादंबरी, १९२८), वगैरे वगैरे.
सन्मान
पुणे येथे १९१० साली भरलेल्या ६व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद चिंतामणराव भानू यांनी भूषविले होते.