Jump to content

चार्ल्स प्रोटिअस स्टेनमेट्झ

चार्ल्स प्रोटिअस स्टाइनमेट्स हे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन विद्युत् अभियंते. उलट-सुलट दिशेत वाहणाऱ्या ⇨ प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहावर आधारलेल्या प्रणालींविषयी त्यांच्या असलेल्या कल्पनांमुळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील विद्युतीय युगाची सुरुवात होण्यास मदत झाली.

स्टाइनमेट्स यांचा जन्म ९ एप्रिल १८६५ रोजी प्रशियातील ब्रेस्लॉ येथे झाला. जन्मत:च त्यांना कुबड हे शारीरिक व्यंग होते. लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धि- मत्तेचे होते. तरुणपणी त्यांना गणित, भौतिकी व अभिजात वाङ्मय या विषयांत असाधारण गती होती. पदवी परीक्षा सन्मानपूर्वक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी १८८३ मध्ये ब्रेस्लॉ विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे ते स्टुडंट सोशॅलिस्ट क्लब या संघटनेत दाखल झाले. ही संघटना जर्मन सोशल डेमॉक्रॅट्सबरोबर संलग्न झाल्यावर सरकारने तिच्यावर बंदी घातली. त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांना अटक झाली, तेव्हा त्यांनी त्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या द पीपल्स व्हॉइस या वृत्तपत्राचे संपादक पद स्वीकारले. यात त्यांनी लिहिलेला एक लेख स्फोटक असल्याने पोलिसांनी सदर वृत्तपत्रावर कडक निर्बंध लादले. त्यामुळे त्यांना ब्रेस्लॉ येथून पलायन करणे भाग पडले (१८८८). थोडा काळ झुरिक येथे राहून त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले (१८८९). थोड्याच अवधीत त्यांना रूडॉल्फ आइकमायर यांच्या याँकर्स ( न्यू यॉर्क ) येथील विद्युत् कंपनीत नोकरी मिळाली. याच सुमारास त्यांनी आपले कार्ल आउगुस्ट रूडॉल्फ स्टाइनमेट्स हे नाव बदलून चार्ल्स प्रोटिअस स्टाइनमेट्स हे नाव स्वीकारले.

आपल्या मालकाच्या मार्गदर्शनाखाली स्टाइनमेट्स विद्युत् अभि-यांत्रिकीच्या व्यावहारिक बाबींमध्ये अधिकाधिक रस घेऊ लागले. त्यांनी त्या कारखान्यातच एक लहान प्रयोगशाळा उभारून तेथेच आपले बहुतेक संशोधन केले. विद्युत् यंत्रसामग्रीत वापरण्यात येणाऱ्या चुंबकीय द्रव्यांत होणाऱ्या शक्तिक्षयावर त्यांनी प्रयोग केले. यांतून त्यांचे पहिले महत्त्वाचे संशोधन म्हणजे मंदायनाचा नियम ( चुंबकीय क्षेत्र बदलत असताना त्यात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात द्रव्याच्या चुंबकीकरणातील बदल मागे पडण्याला चुंबकीय मंदायन म्हणतात ) पुढे आला. जेव्हा चुंबकीय क्रियेचे अस्थिर उष्णतेत परिवर्तन होते, तेव्हा सर्व विद्युतीय प्रयुक्त्यांमध्ये शक्तिक्षय घडतो आणि मंदायनाचा नियम या शक्तिक्षयाशी निगडित आहे. तोपर्यंत विद्युत् जनित्रे, चलित्रे, रोहित्रे व इतर विद्युत् चलित यंत्रे यांतील होणारे शक्तिक्षय ही यंत्रे उभारल्यावरच ( बनविल्यानंतरच ) लक्षात येत असत. स्टाइनमेट्स यांनी शक्तिक्षयाचे नियमन करणारा मंदायन नियम शोधून काढल्यामुळे विद्युत् अभियंत्यांना यंत्रविषयक अभिकल्पातील ( आराखड्यातील ) चुंबकत्वामुळे होणारे विद्युत् शक्तिक्षय आकडेमोडीद्वारे काढता येऊ लागले व ते किमान करणे शक्य झाले.

प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहविषयक विद्युत् मंडलांच्या आकडेमोड करण्या-साठीची व्यावहारिक पद्धती तयार करणे, ही त्यांची संशोधनविषयक दुसरी कामगिरी आहे. यंत्रसामग्री व विद्युत् वाहक तारा यांसारख्या अभि-यांत्रिकीय कामांसाठी गणितीय मदतीचा वापर करण्याची ही पद्धती हे एक अन्य उदाहरण आहे. यामुळे विद्युत् प्रणालीच्या कार्यमानाविषयी आगाऊ भाकीत करणे शक्य झाले. ही पद्धती मुख्यतः प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह-विषयक साहित्य व्यापारी उपयोगांत वापरण्यात आलेल्या जलद प्रगतीला कारणीभूत ठरली.

नव्याने स्थापन झालेल्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीने १८९३ मध्ये आइकमायर यांची कंपनी खरेदी केली आणि स्टाइनमेट्स यांची नेमणूक तेथील नवीन गणनक्रिया ( आकडेमोड ) विभागात झाली. १८९४ मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने आपली कर्मभूमी न्यू यॉर्क राज्यातील शेनेक्टडी येथे हलविली आणि स्टाइनमेट्स तेथे गणनक्रिया विभागाचे प्रमुख झाले. विद्युतीय क्षणिक क्षोभ म्हणजे विद्युत् मंडलांतील अतिशय अल्पकालीन बदलांविषयी विद्युत् मंडलातील विद्युत् प्रवाहाच्या व विद्युत् दाबाच्या तात्पुरत्या क्षुब्ध घटकांविषयीच्या सिद्धांतामधील स्टाइनमेट्स यांचे संशोधन ही त्यांची तिसरी महत्त्वाची कामगिरी आहे. ⇨ तडित् ( आकाशातील वीज ) हे या आविष्काराचे मुख्य उदाहरण आहे. तडित् या आविष्काराचे स्टाइनमेट्स यांनी अनुसंधान ( बारकाईने संशोधन ) केले. यातून त्यांचा प्रगामी तरंगांचा ( या तरंगांत माध्यमाच्या एका भागातून ऊर्जा दुसऱ्या भागात वाहून नेली जाते ) सिद्धांत पुढे आला आणि तडिताघातापासून ( वीज पडण्यापासून ) उच्च शक्ती प्रेषण तारांचे संरक्षण करण्यासाठीच्या प्रयुक्त्या विकसित करण्याचा त्यांचा मार्ग खुला झाला.

आयुष्याच्या अखेरीस स्टाइनमेट्स यांनी सार्वजनिक कामांतही रस घेतला. त्यांनी शेनेक्टडीच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष व सिटी कौन्सिलचे ( नगरसभेचे ) अध्यक्ष म्हणून काम केले. ते अमेरिकन इन्स्टि-ट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनिअर्स याचेही अध्यक्ष होते (१९०१-०२). स्टाइनमेट्स यांना विद्युत् जनित्र व विद्युत् चलित्र यांमध्ये केलेल्या सुधारणांसह २०० पेक्षा अधिक शोधांची एकस्वे ( पेटंट ) मिळाली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : रेडिएशन, लाइट अँड इल्युमिनेशन (१९०९) एंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स (१९१०) अमेरिका अँड द न्यू इपोच (१९१६) इत्यादी.

स्टाइनमेट्स यांचे २६ ऑक्टोबर १९२३ रोजी शेनेक्टडी येथे निधन झाले.