Jump to content

चारुचंद्र बोस

चारुचंद्र बोस या क्रांतिकारकांचा जन्म इ.स. १८९२ साली बंगालमधील फुलना या गावी झाला. घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताचीच असल्याने लहानपणी ते शिक्षणासाठी कोलकातात गेले आणि तेथील हितैन्सी प्रेसमध्ये नोकरी करून आपली शिक्षण सुरू ठेवले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या चारूचंद्र बोस यांना इंग्रजांच्या अन्यायाची चीड होती. तरुण वयात चारूचंद्रांनी अनुशीलन समितीचे सदस्यत्व स्वीकारले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक हेमचंद्र दास यांना बाॅम्ब तयार करण्यासाठी चारूचंद्र आवर्जून साहाय्य करीत.

कोलकात्यामधील ॲडव्होकेट आशुतोष विश्वास हे इंग्रज सरकारचे विश्वासू आणि एकनिष्ठ वकील म्हणून सर्वांना परिचित होते. अलिपूर आणि माणिकतळा येथील बाॅम्ब केसमध्ये सहभागी असलेल्या क्रांतिकारकांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या उद्देशाने आशुतोष विश्वासने खोटे साक्षीदार तयार केले होते. त्यामुळे अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांनी आशुतोष विश्वास यांची हत्या करण्याचे ठरवले.

१० फेब्रुवारी, १९०९ रोजी भर न्यायालयात चारुचंद्र बोस यांनी आशुतोष विश्वासला यमसदनी पाठविले व स्वतःला पोलिसांच्या हवाली केले. इंग्रज सरकारने चारुचंद्र बोस यांच्यावर खटला भरवला. अपेक्षेप्रमाणे न्यायाधीशांनी चारुचंद्र बोसांना फाशीची शिक्षा ठोठावली. त्याप्रमाणे १९ मार्च, १९०९ रोजी या क्रांतिकारकाला फाशी दिली गेली.