चायनीज फॅन पाम
चायनीज फॅन पाम हा ताडासारखा वृक्ष आहे. उद्यानांचे व घराभोवातालचे सौंदर्य वाढविण्यात याचा उपयोग केला जातो. याची उंची साधारण ३० फूट असते. तैवान आणि दक्षिण चीनच्या समुद्रातील बेटांवर यांची उंची ५० फुटापेक्षा जास्त होऊ शकते. याचे खोड फिकट तपकिरी रंगाचे असून पाने फिकट हिरवी, पंख्याच्या आकाराची साधारण ५ फुटापर्यंत व्यास असलेली,लांब देठांची असतात. पानांच्या देठावर करवतीसारखे काटे असतात. संपूर्ण पाने वृक्षाच्या टोकांवर आणि काहीशी खाली लोंबकळणारी असतात. जुनी झालेली पाने खोडाला चिकटून खोडाचा काही भाग झाकून टाकतात. काही पक्षी याचा उपयोग घरट्यासाठी करतात. या वृक्षाची वाढ अतिशय हळू होते.वृक्षाला येणारे पुष्प तुरे सामन्यत: पर्णसंभारात लपलेल्या असतात. फुले पांढरी, अप्रिय वासाची असून जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुलतात. फळे बोराच्या आकाराची,लंबगोल सुरुवातीला हिरवी,पिकल्यावर जांभळ्या रंगाची असून भरभरून लगडतात. बियांद्वारे पुनरुत्पत्ती होते. या वृक्षाचे शास्रीय नाव इंग्लिश उद्यानतज्ञ पॅट्रिक मुरे, बॅरन ऑफ लीव्हीस्टोन यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. यांनी एडिनबरोच्या वनस्पती उद्यानाची आखणी केली. पानांचा पंखा तयार करता येतो.उगविण्यासाठी जागेबाबत फारसे नखरे नसलेले हे वृक्ष मुंबईत अनेक उद्यानात आहेत.जिजामाता उद्यान, सागर उपवन,मलबार हिल,विज्ञानसंस्था उद्यान,म्युझियमचे उद्यान, या सर्व ठिकाणी आणि अनेक खाजगी बागांमध्ये चायनीज फॅन पामचे अनेक वृक्ष पाहायला मिळतात.
संदर्भ
- वृक्षराजी मुंबईची - मुग्धा कर्णिक