चातक
चातक (शास्त्रीय नाव:क्लेमेटर जेकोबिनस; इंग्लिश:पाईड क्रेस्टेड कुकू) हा एक छोटा पक्षी आहे.
साधारण ३३ सेमी आकारमानाचा हा पक्षी पावसाळ्यात भारतात स्थलांतरित होतो.
मुख्यत्वे झाडांवर राहणे पसंत असले तरी कधीकधी कीटकांच्या शोधार्थ चातक जमिनीवरही उतरतो. याच्या विणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असून याचे स्वतःचे घरटे नसते. इतर सर्व प्रकारच्या ककू पक्ष्यांप्रमाणे चातकाची मादी आपले अंडे दुसऱ्या एखाद्या पक्ष्याच्या घरट्यात टाकून निघून जाते. चातकाच्या पिलांची देखभाल ते उसने आई-वडील करतात.
प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य, म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले असते. अर्थात ही एक कविकल्पना आहे. इतर पक्ष्यांप्रमाणेच चातकही जमिनीवर साठलेले पाणीसुद्धा पितो. काळ्यापांढऱ्या चातक पक्ष्याच्या डोक्यावर काळा तुरा असतो. हा भर पावसात म्हणजेच साधारण जून-सप्टेबरमध्ये दिसणारा पक्षी आहे. ’पियू पियू ‘ अशा आवाजात वरुणराजाला आळवणारा चातक कोकिळेच्या परिवारात गणला जातो. आणि म्हणूनच आपली अंडी दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात घालण्याची कला यालाही अवगत असते.
साळुंकीच्या आकाराचा चातक जेव्हा उडू लागतो तेव्हा त्याच्या पंखांवर रुपयाएवढे पांढरे ठिपके स्पष्ट दिसतात. आपल्या देशात चातकाच्या दोन उपजाती आहे. उत्तर भारतात दिसणारी एक जात फक्त पावसाळ्यात दिसते. चातकी (मादी) तिची अंडी सातभाईच्या घरट्यात घालते. विणीच्या हंगामात सातभाईच्या अंडी जमिनीवर पडून फुटलेली आढळतात. हे काम चातकीचे असते. ती स्वतःचे अंड सातभाईच्या घरट्यात घालण्यापूर्वी सातभाईचे एक अंडे चोचीत उचलून घरट्याबाहेर फेकते. त्यामुळे अंड्याच्या संख्येच्या बदलाचा प्रश्न उद्भभवत नाही. चातकीचे अंडे रंगाने सातभाईच्या अंड्यासारखेच दिसते.
पी-पी-पियू,पी-पी-पियू असा धातूसारखा खणखणणारा आवाज काढून एकमेकांचा पाठलाग करणारे चातक भर पावसात बघायला मिळतात.
हा पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो अशी दंतकथा आहे. चातक पावसाळ्यात दिसतो म्हणून ही कथा रचली असावी. नैर्ॠत्य मोसमी पावसावर त्याच्या हालचाली अवलंबून असतात. हा पक्षी ज्या काळात आपल्याकडे स्थलांतर करून येतो त्या पावसाळ्यात लक्षावधी किडे जन्माला येतात. पावसाच्घ्या पाण्यावर झाडझाडोरा चांगलाच तरारलेला असतो. चातक पक्षी या परिस्थितीचा फायदा घेतो. सातभाई आणि रानभाई ह्या पक्ष्याची वीण जवळजवळ वर्षभर सुरू असते. त्यामुळेच चातकाला सातभाईच्या घरट्यात अंडे घालायची संधी मिळते.
दरवर्षी चातक पक्षी सर्वात पहिल्यादा आणि सर्वात शेवटी दिसल्याच्या तारखा वहीत लिहून ठेवल्यास पावसाळ्याचा अदाज बांधायला उपयोगी पडतात.
चित्रदालन
संदर्भ
दोस्ती करू या पक्ष्याशी (किरण पुरंदरे)