Jump to content

चाणक्यनीति

चाणक्य नीती : मूर्खपणा आणि जवानीपेक्षाही घातक आहे ही गोष्ट

कष्ट, दुःख, अडचणी या सतत येत असतात. या प्रकारच्या काही गोष्टींवर आपले काहीही नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामे करतो की भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्य म्हणतात...

कष्टंच खलु मूर्खत्वं कष्टंच खलु यौवनम्।

कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्।।

श्लोकाचा अर्थ : पहिले कष्ट किंवा अडचण आहे मूर्ख असणे, दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. आणि या दोन्ही अडचणींपेक्षा अधिक गंभीर अडचण आहे दुसऱ्यांच्या घरी राहाणे.

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठी दुःखाची गोष्ट आहे मूर्ख असणे. एखादा माणूस मूर्ख असेल तर त्याला जीवनात कधीही सुख मिळणे शक्य नाही. त्याला जीवनात पावलो पावली दुःख आणि अपमान सहन करत जगावे लागते. बुद्धीअभावी माणूस कधीही उन्नती करू शकत नाही.

दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. तारुण्यही दुःखदायी होऊ शकते. कारण या वयात माणसात अत्याधिक जोश असते आणि क्रोधही असतो. तारुण्यात हा जोश योग्य मार्गी लागला तर जीवनात उत्तुंग शिखर गाठता येते. मात्र दिशा चुकली तर जीवन दुःखमय बनते.

मूर्खपणा आणि तारुण्य या दोन्हीही अवस्थांहून अधिक घातक अवस्था कोणती असेल तर ती दुसऱ्यांच्या घरी राहाणे ही होय असे आचार्य सांगतात. एखादा माणूस परक्या घरात राहात असेल तर त्याच्यासमोर अडचणीच अडचणी असतात. दुसऱ्यांच्या घरी राहिल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होते. अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही. स्वातंत्र्य हरवून बसणे ही गोष्ट अधिक घातक असल्याचे आचार्यांना वाटते.