Jump to content

चहा

हिरव्या चहाचा पेला

चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे.(शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका  ;चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) याचा वापर करून चहा नावाचे पेय तयार केले जाते. जगभरात चहा पिण्याच्या आणि तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असल्याचे दिसून येते.

प्रस्तावना

चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे.[] चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे.

चहाचा एक कप


चहाचे प्रकार

१.बदाम पिस्ता चहा, २.बिरयानी चहा, ३.गुलाबी चहा, ४.ईराणी चहा, ५.बुरंश चहा, ६.हाजमोळा चहा, ७.सुलेमानी / लेबु चहा ८.शीर चहा. ९.उलांग चहा १०.आसाम चहा ११.दार्जिलिंग चहा १२.निलगिरी चहा १३.तंदुरी चहा. १४.कहवा काश्मिरी चहा. १५.चॉकलेट चहा १६.गुळाचा बासुंदी चहा

चॉकलेट चहा

बदाम पिस्ता चहा

अमृतसर हे बदाम पिस्ता चहासाठी फार प्रसिद्ध आहे. साहित्यः १/२ कप पाणी १ कप मलई दूध साखर २ चमचे चहा पावडर ३-४ केशर बदाम आणि पिस्ता १ चमचा २ ईलायची.

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकतात. उकळी आल्यावर केशर टाकतात. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घालतात, नंतर साखर घालून पुन्हा उकळतात. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला देतात.

ईराणी चहा[]

साहित्यः ६ कप पाणी ६ चमचे आसाम चहा पावडर ६ चमचे साखर २ १/२ कप मलईदार दूध. कृती: १.जाड बूड असलेल्या भांड्यात दूध घट्ट आणि मलई फुटेल इतके गरम करतात. २.वेगळ्या भांड्यात पाणी, साखर आणि चहा पाने उकळवतात. ३.भांडे झाकणाने बंद करतात आणि कपड्याने गुंडाळतात. ४.नंतर चहा कपात घेतात आणि त्यामध्ये घट्ट केलेले दूध टाकतात. ५.भरपूर ढवळून प्यायला देतात. मुंबईत प्रत्येक कोपऱ्यावर ईराणी हॉटेलमध्ये हा चहा प्यायला मिळतो. उस्मानिया बिस्किटाबरोबर किंवा बनमस्का,टोस्टबटर बरोबर हा चहा उत्तम लागतो.

बुरंश चहा

देहरादून हे बुरंश चहासाठी फार प्रसिद्ध आहे.

साहित्य : १ कप पाणी १ चमचा नैसर्गिकरीत्या वाळवलेली बुरंश /हायडोडेन्ड्राॅनची पाने १/२ चमचा ग्रीन चहा पावडर १/२ चमचा पुदिण्याची पाने चवीनुसार मध साखर तुळशीची पाने (हवी असल्यास)

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाकतात. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिण्याची पाने टाकतात. उकळल्यावर मध किंवा साखर घालतात. हवी असल्यास तुळशीची पाने घालतात. हा चहा गरम किंवा थंड पिता येतो. सूचना : नैसर्गिकरीत्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास टिकतात. बुरंश किंवा रोडोडेन्ड्राॅन चहा हा उत्तराखंडात आणि हिमाचल प्रदेशामध्ये पाहुण्यावे स्वागत करताना देतात. कॅंफीनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे. बुरंश पाने चहाची चव वाढवतात आणि त्यापासून शरीराला होणारे फायदेहीमिळतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्य-झाड आहे. शेरपा आणि तिबेटियन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.

फायदे : हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त आहे. बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेशात आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.

शीर चहा

पाटणा हे शीर चहासाठी फार प्रसिद्ध आहे. साहित्य : ५ कप पाणी २ कप दूध १ चमचा शीर चहा पाने १/४ चमचा बेकिंग सोडा चिमूटभर मीठ चिमूटभर पिस्ता चिमूटभर वेलदोडे चिमूटभर बदाम १ चमचा मलई

कृती : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकतात. कमी विस्तवावर उकळी येऊ देतात. बेकिंग सोडा टाकून जोपर्यंत लाल तपकिरी होईपर्यंत ढवळत राहतात चिमूटभर (शक्यतो सागरी) मीठ टाकतात आणि उकळी आणतात. दूध आणि सुकामेवा टाकतात. गुलाबी होईपर्यंत ढवळत राहतात. मलई आणि कुटलेल्या सुकामेव्याने चहाला सजावट करता येते. अशा प्रकारे सुंदर मलईदार मसालेदार चहा पिण्यासाठी तयार होतो. सूचना : हा चहा बनविण्यासाठी ६ तास लागतात. ३ तास चहा पाने उकळून पुन्हा बेकिंग सोडा टाकल्यावर २ तास चहा गुलाबी होईपर्यंत उकळावा लागतो हा चहा पाटणा शहरात १९९० सालापासून मिळतो. सुरुवातीला हा फक्त रमझान महिन्यात मिळत असे. आता तो वर्षभर मिळतो. पाटण्यामध्ये सब्जीबागेत 'शाही शीर चहा' म्हणून चहाचा स्टॉल आहे. फायदे : हा चहा थंडीच्या मोसमात जास्त प्रमाणात पिला जातो, कारण त्यामुळे माणूस दिवसभर उबदार राहू शकतो.

उलांग चहा

कँमेलिया साईनेन्सिस झाडाच्या पाने, कळी आणि खोडापासून हा बनविला जातो. त्यासाठी थोडासा आंबवला आणि प्राणवायुकरण केला जातो. ह्यामध्ये फार जाती असल्यातरी चीनच्या फुजीयानमधून येणारा चहा प्रसिद्ध आहे. उलांग चहा हा पारंपरिक पद्धतीने गोल गुंडाळून पिळून त्याचे घट्ट चेंडू बनविले जातात. गुंडाळल्यामुळे चहाचा रुप, रंग आणि सुगंध बदलून जातो. उलांग चहाचे प्राणवायूकरण वेगवेगळ्या पायरीवर होत असल्याने त्याची चव पूर्णपणे फुलाची ते गवताची, तर मधुर तर भाजलेली अशी बदलू शकते. रंगसुद्धा हिरवा ते सोनेरी ते तपकिरी होऊ शकतो. टीप : चहा २-३ मिनिटे उकळावा लागतो..

आसाम चहा

भारतातील आसाम राज्यात पिकविला जाणारा चहा आसाम चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा त्याच्या काळा रंग, कडक आणि मादक चव, ह्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आयरिश आणि इंग्लिश सकाळच्या न्याहारी बरोबर आसामच्या काळ्या चहाचीच पाने वापरतात.आसाममध्ये ८०० चहाचे मळे आहेत.आसाम हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये मोडत.. आसाम चहा कडक हवा असेल तर २-३ मिनिटे उकळतात. उत्पादन : वर्ष २००३ पर्यंत जगामध्ये चहाचे उत्पादन ३.१५ मिलियन टन वार्षिक होते. प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत, व त्यानंतर चीनचे स्थान होते (आता चीन ने भारताशी या क्षेत्रात बाजी मारली आहे) अन्य प्रमुख उत्पादक देशांत श्रीलंका आणि केन्या या स्थानावर आहेत. चीनच आता एकमात्र असा देश आहे जो सुमारे प्रत्येक प्रकारच्या चहाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन करताे.[]

दार्जिलिंग चहा

भारतातील पश्चिम बंगाल राज्यात दार्जिलिंगमध्ये होणारा हा चहा जगातील सर्वात महाग चहा म्हणून ओळखला जातो. []ह्याची नैसर्गिक चव अवीट आणि दुसरी कुठेही निर्माण होत नाही. हा चहा पोषक घटकानी संपन्न आणि त्याच्या गोडस, फलस्वरूप चवीमुळे चहामध्ये शँम्पेन म्हणून समजला जातो.वसंत ऋतूत होणारा चहा जो मार्च, एप्रिल, मे महिन्यात खुडला जातो तो हलका, नितळ,आणि कडक तुरट चवीचा असतो तर ग्रीष्म ऋतूत खुडला जाणारा चहा हा मधुर,आणि आगळी तुरट चव असलेला मलईदार चहा असतो त्यामुळे चहाशौकीन त्यामध्ये दूध किंवा साखर न टाकता त्याची लज्जत घेतात. टीप : चहा दोन मिनिटे उकळून लिंबाची फोड टाकून साखरेशिवाय पिल्यास छान लागतो.

निलगिरी चहा

आसाम आणि दार्जिलिंग चहा नंतर निलगिरी चहाचा नंबर लागतो. समुद्रसपाटीपासून १००० ते २५०० मीटर उंचीवर हा निलगिरी पर्वतरांगावर उगवला जातो. रंग, कडकपणा आणि तुरटपणा ह्यांचा सुंदर संगम असलेला हा चहा उष्ण कटिबंधातील फुलाफळांचा मोहक सुगंध आपल्या चवीत आणतो. हिवाळ्यात दवबिंदूत होणाऱ्या चहाला एक वेगळीच चव असते.हिरवा, सफेद, आणि उलांग ह्या खास चहाच्या जाती सुद्धा निलगिरीच्या पर्वतरांगावर होतात. टीप : ३ ते ५ मिनिटे उकळल्यास उत्तम होतो.

तंदुरी चहा

तंदुरी चहा

साहित्यः १ कप पाणी १/२ कप दूध १ चमचा चहा पाने १ चमचा साखर २ मातीची भांडी. १ दालचिनी २-३ वेलची १/४ चमचा वाटलेले आले कृती : १.चुलीवर मातीचे भांडे ठेवतात आणि १० मिनिटे मध्यम ज्योतीवर गरम करतात. २.पाणी गरम करून आले, वेलची, दालचिनी, साखर आणि चहाची पाने टाकून चहा बनवून घेतात. ३.पाणी उकळायला लागल्यावर लगेच दूध टाकतात आणि पुन्हा दोन मिनिटे उकळत ठेवतात. ४.मोठ्या भांड्यात गरम केलेले मातीचे भांडे ठेवतात.मातीच्या भांड्यात तयार केलेला चहा ओततात. ५.थोड्या वेळात चहा फसफसून बाहेर यायला लागला की तो दुसऱ्या मातीच्या भांड्यात ओततात. हा चहा दिल्ली व आजुबाजूच्या प्रदेशात फारच प्रसिद्ध आहे. पुण्यातील एका शास्त्र पदवीधर असलेल्या चहा उपाहारगृह असलेल्या माणसाने आपल्या आजीच्या हळदीदूध बनविण्याच्या पाककृती वरून ही प्रक्रिया शोधली.हा चहा गरमागरम असेल तेव्हा बनपाव मस्का बरोबर फार चांगला लागतो.

कहवा काश्मिरी चहा

साहित्य

४ चमचे काश्मिरी चहापाने. ४ केशर. ४-५ वेलदोडे. मध किंवा साखर (वैकल्पिक). मुठभर तुकडा बदाम. ३-४ दालचिनी.

कृती

१.भांड्यात तीन कप पाणी घेतात. २.केशर, वेलदोडे, दालचिनी टाकून १० मिनिटे उकळवतात. ३.चहा पाने टाकून बारीक ज्योतीवर उकळत ठेवतात. ४.साखर किंवा मध आवश्यक असल्यास टाकतात. ५.चहा गाळून घेतात. ६.वर बदाम पावडर आणि केशर टाकून सजवून देतात.

काश्मिरी संस्कृतीचा कहवा अविभाज्य भाग आहे.कुठल्याही सणासमारंभाला कहवा हा असतोच.[] पारंपरिक पद्धतीत कहवा पितळी भांड्यात(समोवर) बनवितात. प्रत्येक प्रसंगी कहवा असतो -क्लासिक कहवा, दूध कहवा, शांग्री कहवा. कहवा बनविणे ही एक कला आहे. वेलदोडे आणि दालचिनीचा सुगंध सुटला म्हणजे कहवा तयार झाला.जास्त उकळत ठेवला तर तो कडू लागतो म्हणून तो ३० सेकंदापेक्षा जास्त उकळवित नाहीत. कहवा मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि तो अँटीअॉक्सिडंट सुद्धा आहे.पहिल्या दुसऱ्या शतकात कुशकाळात ह्याची सुरुवात झाली.

==चहा तयार करण्याची भारतीय पद्धती== : सामग्री

२ प्पेले पाणी २ चमचे चहा पत्ती २ चमचे साखर ऐच्छिक सामग्री: २ वेलदोड्याची पूड आणि एक छोटे बारीक केलेले आले.

कृती :

पाण्यात चहापत्ती टाकून भांड्यात उकळतात. दुसरीकडे दूध उकळतात. चहाला एकदा उकळी आल्यावर वेलदोड्याची पूड व आले टाकतात. २ मिनिटापेक्षा जास्त वेळा उकल्यास चहा कडू होतो.

चहा पिण्याचे फायदे

  • चहा मध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो.
  • चहा मध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात.
  • चहा मध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो.
  • चहा मध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो.
  • चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढीचे नुकसाना पासून वाचवतो.
  • चहा शरीरातील एंटी- ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो. आणि खूप साऱ्या आजारांना दूर ठेवतो.

पर्यटन स्थळे

संदर्भ

साचा:सांदर्भयादी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "Definition of TEA". www.merriam-webster.com (इंग्रजी भाषेत). 2021-06-14 रोजी पाहिले.
  2. ^ Faulkner, Rupert (2003). Tea: East & West (इंग्रजी भाषेत). Harry N. Abrams. ISBN 978-1-85177-398-5.
  3. ^ Hanley, Maurice P. (1928). Tales and Songs from an Assam Tea Garden (इंग्रजी भाषेत). Thacker, Spink.
  4. ^ Muthalaly, Shonali (2021-06-09). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  5. ^ "How To Make Kashmiri Kahwa Tea For Good Immunity And Weight Loss". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-06-15 रोजी पाहिले.