चपराळा
चपराळा मंदिर व अभयारण्य
जिल्हा मुख्यालयापासून 70 ते 75 कि.मी. अंतरावर चामोर्शी तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. येथे कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. त्याला लागून साईबाबा, शंकर, मारोती इत्यादीचे मंदिर व शिवलिंग आहे. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. हनुमान जयंतीला येथे काला व भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
मंदिरापासून जवळच वर्धा-वैनगंगा नदीचा संगम आहे. यालाच प्रशांत धाम असे म्हणतात. नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यांचे दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोरून आजु-बाजुला घनदाट सागवानाची झाडे व काही चंदनाचे वृक्ष आहेत. या मंदिराच्या परिसरात जंगल असल्यामुळे भाविकांना व पर्यटकांना वृक्ष छायेचा आश्रय घेऊन थांबण्यास अधिक मौज वाटते.
चपराळा अभयारण्य
चपराळा हा अभयारण्य असून हा परिसर वन खात्याच्या क्षेत्रात येतो. येथे वनखात्याच्या मार्फत विकास करण्यात येत असून देखरेखीसाठी निरीक्षण कुटी तयार करण्यात आले आहे. यामुळे वन्य प्राण्याचे व वनाचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे. या अभयारण्यात वाघ, बिबटया, रानडुक्कर, निलगाय, सांबर, चित्ता, हरीण, रानमांजर, कोल्हे, ससे इत्यादी वन्यप्राणी आढळतात शिवाय
अनेक जातीचे पक्षी देखील दिसून येतात.