चक्रधरस्वामी
जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. लीळाचरित्र या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामी च आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
प्रारंभिक जीवन
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव माल्हणदेवी (माल्हाईसा) होते. सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरिपाळदेव असे होते.
तारुण्यात आल्यावर हरिपाळदेव यांचा विवाह कमळादेवी (कमळाईसा) यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.[१] पुढे हरिपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरिपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्रीचांगदेव राऊळ यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरिपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरिपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.[२] ही अवतारधारणाची घटना शक संवत्सर ११४२ भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.[२]
या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकऱ्याचे पैसे परत केले.[३] या घटनेमुळे हरिपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.
गृहत्याग करण्यासाठी हरिपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरिपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.[४]
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरिपाळदेव ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभू दिसले. श्रीगोविंदप्रभूंपासून हरिपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.[४] याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.[५]
एकाकी भटकंतीचा काळ
गोविंदप्रभूंपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डी पासून आठरा कि.मी. अंतरावर येळी या गावी "लीळाचरित्र" या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात काही काळ चक्रधरस्वामी येळी या ठिकाणी वास्तव्यास आल्याचा उल्लेख "लीळाचरित्र" या ग्रंथात करण्यात आला आहे, येळी या ठिकाणी नदी किणारी महानुभाव पंथीय मंदिर आहे.या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले.[६] यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. एका प्रसंगी तर ते गाईच्या गोठ्यात जाऊन झोपले.[७] एका प्रसंगी वरंगळ येथील एका घोड्याच्या व्यापाऱ्याने आपल्या हंसांबा नामक मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले.[८] गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादी शिष्यपरिवार मिळाला.
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.[९] अशा तऱ्हेने ऋद्धिपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण पैठण येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.
एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली.[९]
संदर्भ व नोंदी
- अध्यात्म दर्शन -महानुभाव (जयकृष्णी) (हिंदी, पं. राजू सवार)
- श्रीचक्रधर प्रभू की छिन्नस्थली (महंत डोळसकर बाबा)
- प्रतिष्ठान वर्णन (पंडित नागराज बास कृत)
- महानुभाव अन्वयस्थळ (योगिराज शास्त्री)
- महानुभाव तत्त्वज्ञान (डाॅ. वि.भि. कोलते)
- महानुभाव पंथ : प्रकाशक - चक्रधर स्वामी सेवा समिती नेरी बु॥
- महानुभावांचा आचारधर्म (डाॅ. वि.भि. कोलते)
- संकपाळ, बापूजी; श्रीचक्रधर (२००९); नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया; आय. एस. बी. एन. ९७८-८१-२३७-२५९०-१
- लीळाचरित्र : एकांक; संपादक - भालचंद्र सोहोनी (२००४); श्रीप्रसाद प्रकाशन, पुणे
- विदेह प्रबोध (संपादक - महंत नागराज बाबा)
- ^ संकपाळ (२००९) पृ. ८. देवगिरीच्या यादवांनी गुजराथवर स्वारी केली असता हरिपाळदेव यादवांचा पाठलाग करत वेरूळपर्यंत आले होते. या युद्धात त्यांच्या कपाळावर जखम झाली होती.
- ^ a b संकपाळ (२००९) पृ. ९-१० आणि १३. पंचावतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरिपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. अन्य मतांनुसार चांगदेवांचा आत्मा मुक्त झाला; हरिपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.
- ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा ६
- ^ a b लीळाचरित्र, एकांक, लीळा ७
- ^ संकपाळ (२००९) पृ. १२
- ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा ११ आणि १४
- ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा ११
- ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा १६
- ^ a b संकपाळ (२००९) पृ. २६-२७