चंद्रप्रभा बोके
चंद्रप्रभा नरेंद्र बोके या महाराष्ट्रातील प्रगत महिला शेतकरी आहेत.[१]४ जानेवारी १९३७ रोजी त्यांचा जन्म अमरावती येथे झाला.त्यांच्या सासरी आणि माहेरी कुटुंबात शेतीची पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रभाव त्यांच्या शेतीच्या कामावर आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे-या महाराष्ट्रातील प्रगतीशील महिला शेतकरी म्हणून त्या ओळखल्या जातात.[२]
शैक्षणिक अर्हता
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले . त्यांनी एम.ए.बी.एड. या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
कौटुंबिक माहिती
त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी अपत्ये आहेत.
कारकीर्द
कृषिक्रांतीचे जनक मानले जाणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या संपर्कात त्या राहिल्या व त्यांनी आपली शेतीची आवड जोपासली. संत्र्याच्या बागांचे पुनर्वसन व ऊस लागवडीची व्याप्ती वाढवणे आदी कार्यक्रम त्यांनी घडवले आहेत. त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये सेंद्रिय खते वापरून कापूस, तूर व गहू, हळद व भाजीपाला पिके घेतली आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खते वापरण्याविषयी प्रवृत्त केले आहे. त्यांनी तिवसा येथे संत्रा बागायतदार शेतकऱ्यांची एक सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत त्या संत्रा बागायतदारांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात व बागायतदारांच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये ऊस लागवडीसाठी प्रयत्न केले आणि २००३ साली विदर्भ शुगर मिल स्थापण्याचा उपक्रम केला. त्यांच्या कारखान्याची गाळप क्षमता ५० हजार मेट्रिक टनपर्यंत पोहोचलेली आहे. ग्रामीण क्षेत्रातील अल्पभूधारक, निराश्रित महिलांना केंद्र तथा राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर करण्याचे कार्य त्या करतात.
पुरस्कार
त्यांच्या कृषी विकासकार्याची दखल घेऊन त्यांना
- क्रांतिज्योती सावित्रीबाई पुरस्कार (१९९३-९४)
- पंडिता ताराबाई शिंदे पुरस्कार (१९९९)
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्य पुरस्कार (२००२)
- सेंद्रिय शेती शिल्पकार पुरस्कार (२००३)
- तेजस्विनी पुरस्कार (२००७)
- शारदा उद्योग मंदिर पुरस्कार (२००९)
- माता जिजाबाई पुरस्कार (२०१४)[३]
हे पुरस्कार मिळाले आहेत.
अन्य
अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी जिजामाता स्त्रीमंडळ व समाधान मंडळ, जागृत महिला मंडळ व मायबाई महिला मंडळाची स्थापना केलेली आहे. अमरावती येथे त्यांनी शारदा उद्योग मंदिर संस्थेमार्फत गृह उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमामुळे अनेक महिलांना दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व विविध गृह उद्योगांतून स्वावलंबन प्राप्त झाले आहे.
संदर्भ
- ^ Appropriate Technology (इंग्रजी भाषेत). Intermediate Technology Publications. 2003.
- ^ Bhattacharya, Prosun (2004). Organic Farming: A Ray of Hope for Indian Farmer (इंग्रजी भाषेत). V. B. Foundation.
- ^ Group), Sam Samayik Ghatna Chakra Group (SSGC (2015-03-16). Dristi-2015: Yearly Current Affairs (हिंदी भाषेत). Sam Samyik Ghatna Chakra.