Jump to content

चंदेल्ल घराणे

चंदेल्ल घराणे हे मध्यप्रदेशातील एक क्षत्रिय घराणे होते. या घराण्यातील राजांनी खजुराहो येथे बांधलेल्या मंदिरांमुळे हे घराणे अजरामर झालेले आहे.इ.स.च्या ९ व्या शतकापासून ते इ.स.च्या १३ व्या शतकापर्यंत यांनी मध्य भारतावर राज्य केले.[]

इतिहास

यांची राजधानी महोत्सवपूर (महोबा) येथे होती. या घराण्याचा मूळ पुरुष नन्नूक हा होता. त्याचा नातू जयशक्ती वा जेज्जाक याच्या नावावरून चंदेल्लांच्या राज्याला जेजाकभुक्ती किंवा जझौती असे म्हणत. चंदेल हे सुरुवातीला कनौजच्या प्रतिहारांचे मांडलिक होते.

कामगिरी

हर्षाचा पुत्र यशोवर्मा याने कालंजर किल्ला जिंकून आपली सत्ता यमुनेपर्यंत पसरविली होती. त्याचा पुत्र धंग याने प्रतिहारांचा पराभव करून आपले स्वातंत्र्य जाहीर केले. याचे राज्य वायव्येस ग्वाल्हेर, उत्तरेस यमुना, पूर्वेस काशी आणि दक्षिणेस विदिशा येथपर्यंत पसरलेले होते. धंगानंतर गादीवर आलेला त्याचा पुत्र गंड यानेही आपल्या राज्याचा विस्तार केला. गंडाचा पुत्र विद्याधर याच्या काळात मात्र गझनीच्या मुहम्मदाने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. यांच्यानंतर आलेला देवमर्मा याला कलचुरी राजा कर्ण याने ठार करून चंदेल्लांचे राज्य आपल्या राज्याला जोडले होते पण नंतर किर्तीवर्म्याने चंदेल्लांचे राज्य परत मिळविले. किर्तीवर्माचा पुत्र मदनवर्मा याला चालुक्य राजा सिद्धराज जयसिंह आणि कलचुरी राजा गयाकर्ण यांच्याशी युद्धे करावी लागली. त्याच्यानंतर परमर्दीदेव, अजयदेव, त्रैलोक्यवर्मा, भोजवर्मा हे राजेही चंदेल्ल घराण्यात होऊन गेले. वीरवर्मा हा या घराण्यात होऊन गेलेला शेवटचा राजा होता.

संकिर्ण

  • चंदेल्लांनी आपल्या राज्यात विद्वानांना आश्रय दिला होता.
  • चंदेल्ल राजांनी आपली स्वतःची सोन्याची, चांदीचीतांब्याची नाणी पाडली होती.
  • या घराण्यातील राजांनी खजुराहो येथे सुंदर देवालये निर्माण केली.

संदर्भ

  1. ^ स्मिथ, विंसेंट. द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ८ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.

बाह्यदुवे