चंदू डेगवेकर
चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर (१६ जानेवारी, इ.स. १९३४:श्रीवर्धन, रायगड जिल्हा, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्यअभिनेते आणि गायक आहेत. ते संगीत नाटकांमध्ये विनोदी भूमिका करतात.
यांचे यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेग्वेकर यांचा जन्मही तेथेच झाला.. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेग्वेकर हे त्यांचे वडील. त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.
सुरुवात
चंडू डेग्वेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले. त्यांची ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली आणि त्याणी डेग्वेकरांचे नाव नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेत डेग्वेकरांना बोलाविले आणि ते ‘ललितकलादर्श’शी कायमचे जोडले गेले . 'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखॉंच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.पंडितराज जगन्नाथमध्ये कलंदरखॉंची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेग्वेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्नाथ या नाटकातली भूमिका वठवली.
त्यानंतर
पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेग्वेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते. 'दुरितांचे तिमिर जावो'मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.
चंदू डेग्वेकर हे मा. दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत.
डेग्वेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्सांमधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटिक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेग्वेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतून तसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या.
नाटके आणि (त्यातील भूमिका)
- अपराध मीच केला
- उद्याचा संसार (शेखर)
- एकच प्याला (भगीरथ, शरद)
- एखाद्याचे नशीब
- करीन ती पूर्व (बाजीप्रभू-खाशाबा)
- खडाष्टक (कवीश्वर)
- संगीत जय जय गौरी शंकर (शृंगी)
- दुरितांचे तिमिर जावो (बापू)
- संगीत देव दीनाघरी धावला (नारद)
- संगीत पंडितराज जगन्नाथ (कलंदर खॉं)
- प्रेमा तुझा रंग कसा (प्रो.बल्लाळ)
- संगीत बावनखणी (मोरशास्त्री)
- बेबंदशाही (कबजी)
- संगीत भावबंधन (प्रभाकर व कामणा)
- मत्स्यगंधा (भीष्म)
- संगीत मदनाची मंजिरी (चक्रदेव)
- संगीत मंदारमाला (सावकारांचे चेले भैरव)
- संगीत मानापमान (लक्ष्मीधर)
- मुंबईची माणसं
- संगीत मृच्छकटिक (शकार आणि मैत्रेय)
- ययाती आणि देवयानी
- रक्त नको मज प्रेम हवे (नायक-)
- वरात
- वल्लभपूरची दंतकथा
- संगीत शारदा (कांचनभट)
- संगीत संशयकल्लोळ (फाल्गुनराव)
- साष्टांग नमस्कार
- संगीत सुवर्णतुला (नारद)
- संगीत सौभद्र (बलराम, वक्रतुंड)
- संगीत स्वरसम्राज्ञी (भय्यासाहेब)
संगीतिका
- गीत सौभद्र
- महाश्वेता
पुरस्कार
- गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार
- रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार
- नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार
- गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार (१४-६-२०१६)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार (२०१३)
- महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार (२०१६)