घोलवड
?घोलवड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १.१३७९५ चौ. किमी |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | ४,४०३ (२०११) • ३,८६९/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | रवींद्र बुजड[१] |
बोलीभाषा | वाडवळी,भंडारी,वारली. |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०१७०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
घोलवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
डहाणू बस स्थानकापासून डहाणू-बोर्डी सागरी महामार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.पश्चिम रेल्वेचे महाराष्ट्र राज्यातील शेवटचे स्थानक घोलवड ह्याच गावात आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
व्यवसाय
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने घोलवड गाव हे राज्यातील तिसरे मधाचे गाव म्हणून निवड केले आहे.चिकू, सफेद जाम, रंगीत जाम, नारळ, आंबा, लिची इत्यादी फळांच्या बागा येथे आहेत.शेती, पर्यटन, व्यापार हे येथील मुख्य व्यवसाय आहेत.इसवी सन २०१६ मध्ये चिकू फळाला डहाणू घोलवड चिकू हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे. [२]
लोकजीवन
हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९९४ कुटुंबे राहतात. एकूण ४४०३ लोकसंख्येपैकी २१९१ पुरुष तर २२१२ महिला आहेत. गावाची साक्षरता ८२.५९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.०२ आहे तर स्त्री साक्षरता ७६.२० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४३५ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ९.८८ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी,पारसी, ईराणी आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती-बागायती आणि पर्यटन हा व्यवसाय असून चिकू, लिची, तसेच तत्सम फळांच्या बागा आहेत. चिकूची वाईन करण्याचेही काही कारखाने आहेत. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालनसुद्धा केले जाते. येथील खालील लोकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता व तुरुंगवास ही भोगला होता.
- वामन रामचंद्र अमृते,
- त्रिभुवन गोकुळदास भन्साळी,
- वसंत भास्कर चाफेकर,
- जनार्दन रामचंद्र जोशी,
- दत्तात्रय नारायण जोशी,
- विनायक गणपत भट्टे,
- गणेश रामचंद्र अमृते.
इसवी सन १९१६ ची होमरूल लीग चळवळ,१९२२ ची असहकार चळवळ,१९३० चा मीठाचा सत्याग्रह,१९३२ ची सत्याग्रह चळवळ, आणि १९४२ चे चले जाव आंदोलन ह्या सर्व चळवळीत येथील ग्रामस्थांनी भाग घेतला होता.येथील काही समाजात घोर नृत्य उत्सव साजरा केला जातो.[३]
येथे घोर नृत्य उत्सव भरवला जातो.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. डहाणूवरून रिक्षाही उपलब्ध असतात. घोलवड रेल्वे स्थानक मुंबई अहमदाबाद रेल्वेमार्गावर आहे. येथे टोकेपाडा भागात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.ह्या शाळेतील प्राथमिक शिक्षक दीपक देसले ह्यांनी दोन वर्षापासून सिडबॉल निर्मितीचा स्तुत्य समाजोपयोगी उपक्रम चालू केला आहे.हे उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. ह्यावर्षी १२३२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि सव्वा लाख सिडबॉल तयार केले गेले. ह्या उपक्रमात सतरा पर्यावरणप्रेमी सदस्यांनी सदाहरित, औषधी गुणधर्म असलेल्या झाडांच्या बिया गोळा केल्या. झाडांमध्ये आपटा, रिठा, साग, चिंच, फुलकेसर, विलायती चिंच, अभय, टेंबरून, सीताफळ, बेहडा, खैर, बहावा, गुंज, देवदार, बोर, काजू, भेंड, करंज, रक्तचंदन, रामफळ, बिबवा, हिरडा इत्यादी झाडांच्या बिया गोळा केल्या आहेत.झाडाच्या शेंगा फोडून बिया काढून त्या झाडाखाली सुकविण्यात आल्या. नंतर त्या बिया शेण व मातीचे गोळे करून त्यामध्ये रोपण करून सिडबॉल बनविण्यात आले. ह्या उपक्रमात खालील शाळांनी भाग घेतला.
- जिल्हा परिषद शाळा लिलकपाडा.
- जिल्हा परिषद शाळा आंबेमोरा
- जिल्हा परिषद शाळा झारली
- जिल्हा परिषद शाळा चिरे
- जिल्हा परिषद शाळा रानशेत वरखंडपाडा
- जिल्हा परिषद शाळा डोंगरी
वनखात्याच्या सहकार्याने जून महिन्यात हे सिडबॉल जंगल व ओसाड माळरानात शाळा व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत.[४]
जवळपासची गावे
जळवाई, जांभुगाव, अस्वाळी,खुणावडे, रामपूर, विकासनगर, चिखळे, नारळीवाडी, चिंबावे, नरपड ही जवळपासची गावे आहेत.घोलवड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.घोलवड ग्रामपंचायतीची स्थापना १९५५ साली झालेली आहे.[५]
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७. https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक २३ मार्च २०२४
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक २३ मार्च २०२४
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक २३ मार्च २०२४
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक ७ मे २०२४.
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक २३ मार्च २०२४