Jump to content

घोणस

उदयोन्मुख लेख
हा लेख २० मार्च, २०१० रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता.२०१०चे इतर उदयोन्मुख लेख
घोणस

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरिसृप
कुळ: वायपरीडे
(Viperidae)

उपकुळ: वायपरीने
(Viperinae)

जातकुळी: डाबोया (Daboia)
जीव: डाबोया रसेली
(Daboia russelii)

शास्त्रीय नाव
डाबोया रसेली

घोणस (शास्त्रीय नाव : Daboia, उच्चार: डाबोया; इंग्लिश: Russell's viper) हा आशिया खंडातील भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, दक्षिण चीन, तैवान या भूप्रदेशांमध्ये आढळणारा विषारी साप आहे. हा महाराष्ट्रामधील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक साप आहे.

वास्तव्य

घोणस मुख्यत्वे जंगले तसेच ग्रामीण भाग पसंत करतो.

रचना

घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात.

घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात.

प्रजनन

घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.

विषाचे परिणाम

घोणस

घोणसाचे विष अतिशय जहाल असते.त्याचे विष Vasculotoxic प्रकारचे आहे. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍ऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.

उपचार

घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे. त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये.

संदर्भ