घाटकोपर
घाटकोपर हे उत्तर मुंबईच्या पूर्व भागातील एक उपनगर आहे. घाटकोपर मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक वर्दळीचे स्थानक आहे. २०१४ साली घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणारा मुंबई मेट्रोचा मार्ग १ उघडण्यात आला. घाटकोपर मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाच्या जवळच असून ही दोन्ही स्थानके पादचारी पुलाने जोडली गेली आहेत.
मुंबईच्या अनेक इतर उपनगरांप्रमाणे घाटकोपर दोन भागांत विभागलेले आहे - घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम. घाटकोपर पूर्व भागात उत्तरेच्या दिशेला रशियन कामगार वसाहतीच्या धर्तीवर म्हाडाने (तेव्हाचे हाउसिंग बोर्ड) १९६० च्या दशकात एक वसाहत उभारली. भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या नावावरून या वसाहतीला पंतनगर हे नाव मिळाले. कामगारांसाठी ही वसाहत असल्याने गिरणी कामगार, खाण कामगार आणि गोदी कामगारांची संख्या मोठी होती. त्याचबरोबर एक मोठी पोलीस वसाहतदेखील पंतनगरमध्ये आहे. कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे घर आणि दवाखाना या वसाहतीत होता. दवाखान्यात येणाऱ्या कामगाराच्या समस्या जाणून घेता-घेता त्यांनी कामगार चळवळ उभारली. यामुळे पंतनगरमध्ये अनेक कामगार चळवळींचे रणशिंग फुंकले गेले. पुढे मुंबईतील खाणी बंद झाल्या आणि खाण कामगारही कमी झाला. गिरण्यांच्या ऐतिहासिक संपानंतर गिरणी कामगारही पंतनगरमधून बाहेर पडला. सुरुवातीला मराठी पाठोपाठ दाक्षिणात्य लोकसंख्या जास्त होती. मात्र कामगार संपल्यावर येथील मराठी लोकसंख्या कमी होऊन सन २०००पासून गुजराती लोकसंख्या वाढत गेली.
पंतनगरमधील शैक्षणिक संस्था
पंतनगरमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचे मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल, मराठी विद्यालय व महाराष्ट्र मंडळ या तीन खासगी मराठी शाळा तर डॉमनिक हायस्कूल ही खासगी इंग्रजी शाळा आहे.
त्याच बरोबर महापालिकेच्याही मराठी आणि हिंदी भाषिक शाळा आहेत. पंतनगरमधील दोन पिढ्या या शाळांमध्ये शिकल्या असून शिवसेनेचे खासदार, दैनिक सामनाचे (शिवसेना या संघटनेचे मुखपत्र) कार्यकारी संपादक संजय राऊत हे पंतनगरचे रहिवासी होते.
राजकीय
डॉ. दत्ता सामंत यांनी पंतनगरमध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना करून येथील मराठी कामगारांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. डॉ. दत्ता सामंत हे पंतनगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ. विनीता सामंत यादेखील काही काळ नगरसेविका होत्या. त्यांच्यानंतर या परिसरात शिवसेनेचे वर्चस्व आले. पुढे राष्ट्रवादी कॉंग्रसच्या राखी जाधव या पंतनगरच्या नगरसेविका झाल्या आणि भाजपचे प्रकाश महेता हे आमदार.
मैदाने
सुभाषचंद्र बोस हे पंतनगरमधील सर्वात मोठे उद्यान असून आकाशातून पाहिल्यावर हे उद्यान कासवाच्या पाठीसारखे दिसते. याशिवाय आचार्य अत्रे मैदान आणि जनरल अरुणकुमार वैद्य मैदान ही दोन क्रीडांगणे पंतनगरमध्ये आहेत.