Jump to content

घांगळी

घांगळी हे वारली समाजाचे पारंपरिक वाद्य आहे. हे वाद्य रुद्रवीणेसारखे दिसते. वारली समाजात नृत्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळी, शिमगा यांसारखे सण लग्नसमारंभात तसेच प्रार्थना करताना वारली स्त्री-पुरुष शरीर शृंगारून निरनिराळी नृत्ये करतात. त्यावेळी हे वाद्य प्रामुख्याने वाजविले जाते. आपल्याला घांगळी हे वाद्य भू-मातेने दिले आहे, अशी वारली लोकांची श्रद्धा होती. हे वाद्य वाजविणाऱ्यांना घांगळी भगत असे म्हणत. डाव्या हाताने छातीपाशी घट्ट धरून उजव्या हाताने तारांना छेडून भगत हे वाद्य वाजवितो तेव्हा त्याला इतर दोन भगत साथ देतात.

घांगळी हे वाद्य सहजासहजी कोणीही वाजवू शकत नसे. घांगळी भगत होण्यासाठी खास शिक्षण घ्यावे लागते. अनुभवी भगत ही विद्या तरुण मुलांना शिकवितात. याचे शिक्षण पावसाळ्याच्या प्रारंभी सुरू होते व दिवाळीपर्यंत पूर्ण होते. या काळात शिकाऊ भगतांना काही व्रते कडकपणे पाळावी लागतात. जो भगत ही व्रते व्यवस्थित आचरणात आणणार नाही, त्यास शिक्षा केली जात असे. तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही तर त्याला शिक्षण देणे बंद केले जाते. त्यामुळे भू-मातेने दिलेले हे वाद्य वाजविण्याची कला अवगत करण्यासाठी प्रचंड तपश्चर्येचीच आवश्यकता असते.

घांगळी वाद्य बनविण्याचे कौशल्य मोजक्या लोकांनाच प्राप्त असे. त्यामुळे समाजात त्यांना भगतांइतकेच स्थान असे. बहुतेक भगत स्वतःच हे वाद्य बनवितात. घांगळी हे वाद्य बनविण्यासाठी दोन सुकलेल्या भोपळ्यांचा वापर केलेला असतो. दोन्ही भोपळ्यांना जोडण्यासाठी उत्तम प्रतीच्या बांबूंचा उपयोग केला जातो. नाद निर्माण करण्यासाठी या बांबूवर तारा बसविलेल्या असतात. या तारा छेडून जो नाद निर्माण होतो त्याच्या तालावर घांगळी भगत भू-मातेची प्रार्थना करणारे गाणे म्हणतो. त्याला पालघर असे म्हणतात. या गाण्याबरोबर भगत कथाही सांगतो. हे वाद्य मोरपिसे, काचेच्या रंगीत बांगड्या, आरसा किंवा बोटांच्या सहाय्याने वाजविले जाते. एका अर्थाने घांगळी हा तंतुवाद्याचा आद्य प्रकार असावा.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ ची कॅश आहे. 22 Oct 2009 01:07:02 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. भाग १ वरून[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती

हे सुद्धा बघा