Jump to content

घबाड मुहूर्त

सू्र्यनक्षत्रापासून दिवसाच्या चंद्रनक्षत्रापर्यंत आकडे मोजतात. उत्तराची तिप्पट करून येणाऱ्या अंकात त्या दिवशीची शुक्ल प्रतिपदेपासून मोजलेली तिथी मिळवतात. बेरजेला 7ने भागून बाकी ३ आली तर घबाड मुहूर्त आहे असे समजतात. घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास सुरुवात झाली तर ते कार्य सफल होऊन मोठा लाभ होतो असे सांगितले जाते.

उदा०
सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा
चंद्र नक्षत्र : स्वाती
तिथी : वद्य दशमी, १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासून मोजलेल्या म्हणजे २५ तिथी मिळवल्या : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागितले. ९४ / ७ = १३ बाकी ३
बाकी ३ म्हणून घबाड.

बाकी जर शून्य उरली तर त्या मुहूर्ताला अर्धघबाड म्हणतात.

घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास सुरुवात केल्यानंतर कार्य सफल होऊन मोठा लाभ होत असल्याने, अचानक मोठा लाभ झाला तर 'घबाड' हातात आले/हातास लागले/मिळाले/सापडले असे म्हणायची पद्धत आहे..

पंचागात घबाड मुहूर्त दिलेले असतात.

अन्य मुहूर्त

अभिजित मुहूर्त, गोरज मुहूर्त, चौघडिया मुहूर्त, ब्राह्म मुहूर्त, साडेतीन मुहूर्त, वगैरे,

विवाहासाठीचे मुहूर्त

विवाह मुहूर्तांचे पुढील चार प्रकार होत--

१) गोपाल मुहूर्त -- सूर्योदयास असणारा मुहूर्त

२) दिवा मुहूर्त -- सूर्योदयानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत

३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत

४) गोरज मुहूर्त -- सूर्यास्ताच्या समयी अथवा लगेच त्यानंतर.( संध्यासमयी )

ग्रंथ

मुहूर्तशास्त्रावर धर्मसिंधु, निर्णयसिंधु, मुहूर्तगणपति, मुहूर्त चिंतामणि, मुहूर्त पारिजात, मुहूर्त मार्तण्ड, मुहूर्त प्रकरण आदी ग्रंथ आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात १७व्या शतकात लिहिलेला दैवज्ञ श्रीरामाचार्य लिखित 'मुहूर्त चिंतामणि' विशेष प्रसिद्ध आहे.