ग्रंथालय संमेलन
शतायु ग्रंथालय संमेलन नावाने, महाराष्ट्रातील शंभराहून अधिक वर्षांच्या जुन्या आणि चालू ग्रंथालयांच्या प्रतिनिधींचे एक एकदिवसीय संमेलन २९ एप्रिल २०१२ रोजी मुंबईत मुलुंड येथे झाले. महाराष्ट्रात आज(२०१२साली) एकूण ८३ शतायु ग्रंथालये आहेत. त्यांच्यापैकी ४५ शतायु ग्रंथांचे प्रतिनिधी संमेलनाला हजर होते. नागपूर, कागल, कुरुंदवाड, कुडाळ, भंडारा, ब्रह्मपुरी (चंद्रपूर), सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बांदा असे अगदी चांद्यापासून ते बांद्यापर्यंतच्या महाराष्ट्राचे प्रतिबिंब या संमेलनात उमटले होते. हे संमेलन महाराष्ट्र सेवा संघाच्याअमृत महोत्सवानिमित्त त्या संस्थेने आयोजित केले होते. महाराष्ट्र सेवा संघाचे न. चिं. केळकर ग्रंथालय अवघे ३६ वर्षांचे, पण शतायु ग्रंथालयांना सन्मान आणि एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम स्वतःच्या खिशाला खार लावून केला. या सर्वाचा परिणाम असा की शतायु कारकिर्दीजवळ पोहोचलेली काही ग्रंथालयेदेखील या संमेलनास उपस्थित राहिली होती.
संमेलनाध्यक्ष दैनिक लोकसत्ताचे गिरीश कुबेर होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. प्रतिभा गोखले होत्या.
संमेलनात ‘ग्रंथ व्यवहार आणि माध्यमे’ आणि ’ग्रंथालयांचे संगणकीकरण’ हे दोन महत्त्वाचे परिसंवाद झाले.
महाराष्ट्र सेवा संघाने, महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान दिलेले अरविंद टिकेकर यांच्या स्मृतीस हे संमेलन अर्पण केले होते. टिकेकरांनी लिहिलेले ‘रिफ्लेक्शन ऑफ लायब्ररी’ हे पुस्तक त्यांच्या पत्नींनी ग्रंथालय प्रतिनिधींना भेट दिले.
पहा :महाराष्ट्रातील साहित्य संमेलने